अभ्यासू वृत्तीचे, सेवाभावी आणि सर्वांना साहाय्य करण्यासाठी सदैव तत्पर असलेले चि. स्वप्नील नाईक अन् समजूतदार, प्रेमळ, शिकण्याची वृत्ती  असलेल्या आणि तळमळीने सेवा करणार्‍या वैद्या चि.सौ.कां. अदिती भालेराव !

चि. स्वप्नील उमेश नाईक आणि वैद्या चि.सौ.कां. अदिती भालेराव यांना विवाहाप्रीत्यर्थ सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !

माघ कृष्ण पक्ष षष्ठी (१४.२.२०२०) या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणारे चि. स्वप्नील नाईक यांचा शुभविवाह वैद्या चि.सौ.कां. अदिती भालेराव यांच्याशी होत आहे. त्यानिमित्त त्यांच्या सहसाधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

चि. स्वप्नील नाईक यांची गुणवैशिष्ट्ये !

१. लहानपणापासून साधनेचे संस्कार होणे

‘स्वप्नीलच्या आई-वडिलांनी त्याला साधनेचा मार्ग दाखवला आहे. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता तो या मार्गावरून निष्ठेने चालत आहे. यावरून स्वप्नीलचा आई-वडिलांप्रती असलेला आदरभावही दिसून येतो. तो बालपणापासून आई-बाबांच्या समवेत सत्संगाला आणि सेवेला यायचा. त्याच्यावर साधनेचे झालेले संस्कार आहेत.’ – श्री. प्रेमानंद नारुलकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१ अ. मनमोकळेपणा : ‘स्वप्नीलमधील मनमोकळेपणामुळे त्याच्या कोणत्याच कृतीत दिखाऊपणा नसतो. त्याचे वागणे मोकळेपणाचे असते.’ – श्री. देऊ गावडे आणि श्री. परशुराम पाटील, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

२. प्रेमळ

अ. ‘इतरांच्या आवडी त्याच्या लक्षात असतात. कुणी साधक रुग्णाईत असेल किंवा कुणा साधकाला त्रास होत असेल, तेव्हा तो त्या साधकांना त्यांच्या आवडीचा खाऊ देऊन त्यांची काळजी घेतो.’ – कु. गीता चौधरी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

आ. ‘तो परगावी गेला, तरी वाहनसेवा करणार्‍या साधकांसाठी आवर्जून खाऊ आणतो. वाहनसेवा करणार्‍या साधकांपैकी एखाद्या साधकाचा किंवा आश्रमातील एखाद्या साधकाचा वाढदिवस असेल, तर तो त्याच्यासाठी आवर्जून खाऊ आणतो.’ – श्री. परशुराम पाटील

३. जवळीक साधणे

अ. ‘स्वप्नीलमध्ये कौटुंबिक भावना अधिक असल्यामुळे त्याची आश्रमातील लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांशी जवळीक आहे. सर्व बालसाधकांचा तो आवडता ‘मामा’ आहे.’ – श्री. तुषार मालवणकर, श्री. महादेव नाईक, श्री. देऊ गावडे, श्री. परशुराम पाटील, सौ. वृंदा मराठे आणि कु. गीता चौधरी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

आ. ‘त्याचे गावातील मित्रांशी चांगले संबंध आहेत. तो ते संबंध सांभाळून पूर्णवेळ साधनाही करतो.

४. इतरांना साहाय्य करणे

अ. २ वर्षांपूर्वी माझा अपघात झाला होता. तेव्हा त्याने मला पुष्कळ साहाय्य केले. तो वयस्कर साधकांना किंवा कुणालाही साहाय्य करण्यास नेहमीच तत्पर असतो.

आ. वाहन चालवण्याचा परवाना घ्यायचा असेल किंवा वाहनाविषयी काहीही साहाय्य हवे असेल, तेव्हा डोळ्यांसमोर स्वप्नीलचेच नाव येते.

५. स्पष्टवक्तेपणा

अ. तो नेहमी स्पष्टपणे बोलतो. त्या वेळी ‘समोरच्या व्यक्तीला वाईट वाटेल’, असा विचार तो करत नाही.’

– सौ. वृंदा मराठे

आ. ‘कोणत्याही सूत्राविषयी त्याचे मत स्पष्ट असते. त्याच्या मनाची द्विधा स्थिती नसते. मत मांडतांना तो लहान, मोठे, अशिक्षित किंवा त्या क्षेत्रातील तज्ञ यांच्यासमोरही तेवढ्याच स्पष्टपणे स्वत:चे सूत्र मांडतो.’ – श्री. प्रेमानंद नारुलकर

६. शिकण्याची वृत्ती

‘वाहन चालवण्याची सेवा करणार्‍या सर्व साधकांमध्ये तो वयाने सर्वांत लहान असूनही तो सर्वांत आधी वाहन आणि मोठी बस चालवायला शिकला.

७. अभ्यासू वृत्ती

अ. वाहनांविषयीचा त्याचा अभ्यास चांगला आहे. त्यामुळे वाहन खरेदी करतांना साधक त्याचे मत घेतात.’

– श्री. परशुराम पाटील

आ. ‘तो एखाद्या सेवेच्या सूत्राचा सर्वांगीण अभ्यास करतो. त्यासाठी त्या सूत्राविषयी तो त्यातील तज्ञ व्यक्तींशी, त्या क्षेत्रातील अनुभवी, व्यक्तींशी बोलतो.’ – श्री. प्रेमानंद नारुलकर

इ. ‘रामनाथी आश्रमात वाहनचालक म्हणून सेवा करता करता त्याने आश्रमासाठी लागणार्‍या सर्वच वाहनांविषयीचा अभ्यास केला. हळूहळू वाहनांची दुरुस्ती, खरेदी, वाहनांविषयीची कागदपत्रे, वाहतुकीचे नियम, सरकारी वाहतूक विभागाशी समन्वय इत्यादी सर्वच गोष्टी करायला तो शिकला.’ – श्री. गौतम गडेकर

ई. ‘त्याची आई रुग्णाईत असतांना तिची काळजी घेणे, तिच्या समवेत रुग्णालयात राहणे, असे करून तो स्वतःचे कौटुंबिक दायित्व व्यवस्थित पार पाडतो.

८. नेतृत्वगुण

इतरांचे कौशल्य लक्षात घेऊन तो त्यांच्याकडून त्या सेवा करवून घेतो.’

– कु. गीता चौधरी

९. अल्प अहं

‘तो उच्च शिक्षित असूनही आगगाडीच्या स्थानकावरून आनंदाने आश्रमाचे साहित्य आणतो.’ – श्री. परशुराम पाटील

१०. सेवाभाव

अ. ‘अल्प मूल्यात चांगले वाहन मिळवण्यासाठी त्याची धडपड चालू असते.’ – श्री. परशुराम पाटील

आ. ‘त्याची रात्री-अपरात्री कधीही सेवेला जाण्याची सिद्धता असते.’ – श्री. परशुराम पाटील, श्री. प्रेमानंद नारुलकर आणि श्री. गौतम गडेकर

इ. ‘तो रात्री घरी निवासाला जातो. तो घरी असतांना त्याला भ्रमणभाष करून सेवेसाठी बोलावले, तरी त्याची लगेच आश्रमात येण्याची सिद्धता असते. थंडी, उन्हाळा किंवा मुसळधार पाऊस, काहीही असो, त्याच्या सेवेत कधीच अडथळा आला नाही. कोणत्याही गोष्टीचा त्याने कधी बाऊ केला नाही. त्या त्या वातावरणात तो आजतागायत सेवारत असतो.’ – श्री. परशुराम पाटील आणि श्री. प्रेमानंद नारुलकर

ई. ‘काही वेळा जड साहित्य आणायचे झाले तर ते जड साहित्य उचलण्याची त्याची पूर्ण सिद्धता असते.’ – श्री. परशुराम पाटील

उ. ‘दुरुस्ती करणारे विविध ‘मेकॅनिक’, ‘गॅरेज’वाले आणि विक्रेते यांच्याकडून सेवाभावी वृत्तीने सेवा करवून घेण्यासाठी त्याचे प्रयत्न सतत चालू असतात.’ – श्री. गौतम गडेकर

ऊ. ‘तो जसा खेळकर आहे, तसाच तो सेवेप्रती गंभीर आहे. त्याला सेवा परिपूर्ण करण्याचा ध्यास असतो. त्याने संतसेवेतून बर्‍याच संतांची मने जिंकली आहेत.’ – कु. गीता चौधरी

ए. ‘तो झोकून देऊन सेवा करतो. एखादी सेवा हातात घेतल्यावर तो त्या सेवेतील सर्व बारकावे संबंधित साधकांना विचारतो. त्यातून त्याची सेवा परिपूर्ण करण्याची तळमळ लक्षात येते. ’- श्री. तुषार मालवणकर, श्री. महादेव नाईक आणि श्री. देऊ गावडे

ऐ. ‘आश्रमात अनेक कार्यक्रम किंवा सत्संग असतात, कधी संत येतात, तर कधी यज्ञ असतो. कुठल्याही कार्यक्रमाच्या वेळी सेवा करण्यासाठी तो सदैव तत्पर असतो. तो कुठल्याही सेवेत सदोदित पुढेच असतो. जणू ‘मागे’ हा शब्द त्याच्या शब्दकोशातच नाही. सेवेविषयी त्याने कुठेही आणि केव्हाही तडजोड केली नाही. त्याने घेतलेले सेवेचे हे व्रत पूर्ण करण्यासाठी त्याची सदैव धडपड असते.’ – श्री. प्रेमानंद नारुलकर

११. भाव

‘स्वप्नीलमध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले आणि इतर संत यांच्याविषयी पुष्कळ श्रद्धा आणि भाव आहे. संतांनी एखादे सूत्र सांगितल्यास तो त्यावर १०० टक्के श्रद्धा ठेवून तशी कृती करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या मनात संतांप्रती असलेला आदरभाव त्याच्या कृतीतून दिसून येतो, उदा. संतांना कुठे बाहेर न्यायचे असेल, तेव्हा तो गाडी धुऊन आणि पुसून स्वच्छ करतो, स्वतः व्यवस्थित कपडे घालून त्यांच्या सेवेला येतो आणि ती सेवा तो भावपूर्ण अन् परीपूर्ण करण्याचा प्रयत्न करतो.’ – सौ. वृंदा मराठे, श्री. तुषार मालवणकर, श्री. महादेव नाईक, श्री. देऊ गावडे आणि श्री. परशुराम पाटील

१२. श्री. स्वप्नील यांच्यामध्ये जाणवलेला पालट

अ. अंतर्मुखता वाढणे : ‘पूर्वीपेक्षा स्वप्नीलदादाची सेवेतील अंतर्मुखता वाढली आहे’, असे वाटते.’ – श्री. तुषार मालवणकर, श्री. महादेव नाईक आणि श्री. देऊ गावडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.१.२०२०)

अभियंता ही पदवी मिळवल्यावर नातेवाईक आणि मित्र यांनी नोकरी करण्यास सांगूनही साधनेचा मार्ग अवलंबणे

‘चि. स्वप्नील याने अभियंता ही पदवी मिळवल्यावर त्याला आरामदायी नोकरी आणि प्रसिद्धीचे क्षेत्र मिळत होते. नातेवाईक आणि त्याचे मित्र यांनी त्याला विविध व्यावसायिक गोष्टी सांगितल्या. तेव्हा काही वेळा त्याच्या मनाचा संघर्षही झाला; पण त्या गोष्टी ऐकतांना त्याने त्यावर स्वत:चे काहीच मत कधी मांडले नाही. तो केवळ ते ऐकून घेत असे. त्याने साधनेत काहीही तडजोड केली नाही. त्याने शांतपणे साधनेचाच मार्ग अवलंबला. त्याने त्याचे सेवाव्रत कधीही सोडले नाही. मायेतील सर्व आसक्ती, लोकेषणा आणि पैसा यांपासून तो दूर राहिला आणि अविरत सेवारतच राहिला.’

– श्री. प्रेमानंद नारुलकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

चि.सौ.कां. अदिती भालेराव यांची गुणवैशिष्ट्ये !

१. आनंदी आणि उत्साही

अ. ‘मी आणि अदिती काही दिवसांपासून एका खोलीत रहात आहोत. ती नेहमीच आनंदी आणि उत्साही असते.’ – कु. सुषमा पेडणेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

आ . ‘अदिती नम्र आणि भोळी आहे.’ – सौ. वृंदा मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

२. जवळीक साधणे

अ. ‘अदिती आश्रमात नवीन असूनही तिने अल्प काळात सर्वांशी जवळीक साधली आहे.’ –  अदिती समवेत सेवा करणारे सर्व साधक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

आ. ‘ती समोरच्याशी मोकळेपणाने संवाद साधते. त्यामुळे ती माझ्या समवेत अल्प काळ राहत असूनही आमची लगेच मैत्री झाली.’

– कु. सुषमा पेडणेकर

३. मनमोकळेपणा

‘ती कुठलाही विचार मनात ठेवत नाही. ती लगेचच बोलून त्याप्रमाणे कृती करते.

४. इतरांचा विचार करणे

अ. तिला काही वस्तू खरेदी करायची असल्यास ती नेहमी तिची आई, वहिनी आणि भाऊ यांच्यासाठीही वस्तू घेते.’

– अदिती समवेत सेवा करणारे सर्व साधक

आ. ‘ताईला पुष्कळ सेवा असल्यामुळे ती ४ – ५ दिवसांचे कपडे एकाच दिवशी धुते. ती तिचे कपडे वाळत घालतांना मला कपडे वाळत घालायला जेवढी जागा लागते, तेवढी जागा सोडून कपडे वाळत घालते. त्याहून अधिकचे कपडे वाळत घालण्यासाठी ती ‘हँगर’चा वापर करते.

इ. ती माझ्या समवेत खोलीत राहत असतांना तिने माझ्याविषयी कधी प्रतिक्रिया व्यक्त केली किंवा आमच्या दोघींचे जुळले नाही, असे क्वचितच घडले असेल.

ई. मला पंखा नको असतांना तिला पंखा हवा असल्यास ती मला सांगते, ‘‘आता मी थोडा वेळ जोरात पंखा लावते. थोड्या वेळाने तू तो बंद करू शकतेस.’’ कधी तिने पंखा लावल्यावर मी डोक्यावर पांघरूण घेऊन झोपते. तेव्हा ‘मला पंखा नको आहे’, हे तिच्या लक्षात येते आणि ती लगेच पंख्याची गती अल्प करते.

५. इतरांना आनंद देणे

‘रामनाथी आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘गुरुशक्ती-प्रदान सोहळ्या’च्या दिवशी आणि नंतरही काही सोहळ्यांच्या वेळी रामनाथी आश्रमात सगळीकडे पणत्यांची वैशिष्ट्यपूर्ण रचना केली होती. ती प्रत्यक्ष पाहायला मी तिथे नव्हते. तेव्हा रात्री आम्ही भेटल्यावर ती त्याचे इतके सुंदर वर्णन करायची की, ‘मी ते दृश्य प्रत्यक्ष बघत आहे’, असेच मला जाणवायचे आणि मलाही त्याचा आनंद अनुभवता यायचा.

६. साधकांविषयीचा आदरभाव

डिसेंबर २०१९ मध्ये तिचे रामनाथी आश्रमात केळवण झाले. त्याच्या दुसर्‍याच दिवशी ती घरी जाणार होती. ती घरी जातांना मी तिला लग्नानिमित्त शुभेच्छा दिल्यावर तिने मला वाकून नमस्कार केला. मी तिला म्हणाले, ‘‘हे स्थान केवळ परात्पर गुरुदेवांचेच आहे. आपण त्यांनाच नमस्कार करायचा. तेच आपले आदर्श आहेत.’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘तू माझ्यापेक्षा मोठी आहेस ना ?’’

– कु. सुषमा पेडणेकर

७. सेवाभाव

अ. ‘ताईचे आयुर्वेदाचे वैद्यकीय शिक्षण झाले आहे; परंतु तिला अ‍ॅलोपॅथीच्या रुग्णालयात नोकरी करण्याचा अनुभवही आहे. ती  रुग्णांसाठी औषधोपचारही सेवाभावाने करते.

आ. अन्य सेवासुद्धा ती सहजतेने स्वीकारते आणि परिपूर्ण करण्यासाठी प्रयत्नरत असते. त्यामुळे साधकांना तिचा आधार वाटतो.

इ. तिला कोणतीही अडचण सांगितली, तरी ती सकारात्मक राहून उपाय काढते. ती पुढाकार घेऊन सेवा करते.’

– सेवा करणारे सर्व सहसाधक

८. शिकण्याची वृत्ती

अ. ‘तिचा विवाह ठरल्यानंतर ती रात्री खोलीत झोपायला आल्यावर आमचे सहज बोलणे झाले. तेव्हा तिने मला ‘गोवा येथे लग्नात कोणते रिती-रिवाज असतात ?’, असे विचारले.

आ. मी मराठी बोलतांना कधी कधी कोकणी शब्द बोलते. तेव्हा ती मला त्या शब्दाचा अर्थ विचारते आणि तो शब्द स्वतः वापरण्याचा प्रयत्न करते. कधी कधी ती मला ‘मला कोकणी भाषा शिकव’, असे सांगते.’

– कु. सुषमा पेडणेकर

इ. ‘तिने अल्प कालावधीत आश्रम आणि अन्य सेवा शिकून घेतल्या.

९. स्वीकारण्याची वृत्ती

अदितीताईला अकस्मात् कुठलीही सेवा आली, तरी ती तत्परतेने स्वीकारून आनंदाने करते. तिच्या सेवेत झालेला पालट ती आनंदाने स्वीकारते.’

– सेवा करणारे सर्व सहसाधक

१०. अल्प अहं

अ. ‘ती वैद्या आहे’, असे तिच्या कुठल्याही कृतीतून कधीही जाणवले नाही. तिला त्याचा अहंकार नाही. तिच्यामध्ये सहजता असून ती मनाने निर्मळ आहे. तिचे राहणीमानही साधे आहे.’

– कु. सुषमा पेडणेकर आणि सेवा करणारे सर्व सहसाधक

आ. ‘तिला शासकीय नोकरी असूनही तिने साधनेसाठी नोकरीचे त्यागपत्र दिले.

११. नामजपादी उपायांचे गांभीर्य असणे

अ. तिला एका संतांनी काही कालावधीसाठी अधिक घंटे नामजप करायला सांगितला होता. तिने लगेच सेवा आणि नामजप यांची सांगड घालून उपाय पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.’

– सेवा करणारे सर्व सहसाधक

आ. ‘ती रुग्णांना तपासतांना पूर्णपणे एकाग्रचित्त असते. ‘ती देवाला विचारून रोगाचे निदान करते’, असे मला जाणवते.’

– कु. सुषमा पेडणेकर

१२. भाव

अ. ‘प.पू. आबा उपाध्ये यांचा दैवी खल आश्रमात होता. तेव्हा ती त्या खलाची भावपूर्ण पूजा करायची. ती त्या दैवी खलात साखर कुटण्याची सेवा भावपूर्ण करायची.’ – सेवा करणारे सर्व सहसाधक

आ. तिच्या भ्रमणभाषच्या आतल्या पडद्यावर (होमस्क्रीनवर) अनेक संतवचने वाचून माझीही भावजागृती झाली. कधी कधी आम्ही परात्पर गुरुदेवांविषयी बोलायचो. तेव्हा तिच्या बोलण्याने आम्हा दोघींचीही भावजागृती व्हायची आणि दोघींच्याही मनामध्ये कृतज्ञतेचा भाव जागृत व्हायचा.

परात्पर गुरुदेवांनी मला तिच्या समवेत राहून शिकण्याची संधी दिल्याविषयी त्यांच्याप्रती कोटीशः कृतज्ञता ! ‘तिचे हे गुण आमच्यातही येऊ दे’, अशी मी परात्पर गुरुदेवांना प्रार्थना करते.’

– कु. सुषमा पेडणेकर (२२.१.२०२०)

देवाने दिलेली वाहनसेवा निष्ठेने करतांना विविध नाती सहजतेने निभावणारे चि. स्वप्नील उमेश नाईक !

‘दुचाकीपासून ते बसपर्यंत सर्वच वाहनांविषयीच्या सेवेत सक्रीय सहभागी असणारे एक अद्वितीय व्यक्तीमत्त्व म्हणजे रामनाथी आश्रमातील श्री. स्वप्नील उमेश नाईक ! अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यावर नोकरी किंवा व्यवसाय करून ऐषारामाचे जीवन जगण्याचे सोडून आश्रमात सेवा करत असल्याविषयी त्याचे मित्र त्याला विचारत होते; पण परात्पर गुरु डॉक्टरांवरील दृढ निष्ठेमुळे त्याचा त्याच्या मनावर काडीचाही परीणाम झाला नाही. ‘वाहन’ या विषयात त्याला विशेष रस असल्याने कदाचित् देवानेच त्याला ही सेवा दिली असेल आणि त्यानेही ती सेवा अत्यंत निष्ठेने पार पाडण्याचा प्रयत्न केला, आताही करत आहे आणि यापुढेही करील, यात मला कोणतीही शंका वाटत नाही.

तो आमच्यासाठी चांगला मित्र, छोट्यांसाठी अवखळ दादा, मोठ्यांसाठी साहाय्य करणारा साधक आणि वयस्करांसाठी पुत्र आहे. तो अशा सर्वच भूमिका दायित्वाने आणि योग्यरित्या सहजतेने पार पाडतो. त्यामुळे त्याचा सर्वांनाच पुष्कळ आधार वाटतो.’

– श्री. गौतम य. गडेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.२.२०२०)

उखाणे

वधू आणि वर या दोघांसाठी उपयोगी पडतील, असे उखाणे

पंढरपूरच्या वारीत भक्तांसाठी विठू नाचला ।

…. रावासंगे हा भक्तीमय सोहळा मी पाहिला ॥

हनुमान आहे रामाचा प्रिय भक्त ।

….सह संसाराला आकार देईल साधनाच फक्त ॥