भाववृद्धी सत्संगात सांगितल्याप्रमाणे साधनेचे प्रयत्न केल्यावर संभाजीनगर येथील सौ. सिमंतिनी बोर्डे यांना आलेल्या अनुभूती

‘माझ्यामध्ये ‘नातेवाइकांप्रती पूर्वग्रह असणे, इतरांना तुच्छ लेखणे, परिस्थिती न स्वीकारणे, व्यष्टी साधना गांभीर्याने न करणे, घरात एकटीने राहण्यास भीती वाटणे’, असे अनेक स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू आहेत. ‘भाववृद्धी सत्संग चालू झाल्यापासून प.पू. गुरुदेवांच्या संकल्पामुळे वरीलपैकी काही स्वभावदोषांवर मला मात करता आली. याविषयी मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

सौ. सिमंतिनी बोर्डे

१. सासूबाई आणि इतर नातेवाईक यांच्याविषयी मनातील पूर्वग्रह अन् प्रतिक्रिया नष्ट होण्यासाठी स्वयंसूचना सत्र करूनही म्हणावा तितका लाभ न होणे; पण भाववृद्धी सत्संगात सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ‘मनातील पूर्वग्रह आणि प्रतिक्रिया दूर करण्यासाठी प.पू. गुरुदेवांचा संकल्प झालेला आहे’, असे सांगितल्यावर दुसर्‍याच दिवशी त्यांसंबंधी विचारांवर मात करता येणे

माझ्या मनात दिवंगत सासूबाईंविषयी तीव्र पूर्वग्रह होता आणि त्यांच्याविषयी प्रतिक्रियाही माझ्या मनात येत असत. स्वयंपाकघरात काम करतांना मी त्यांच्या संदर्भातील प्रसंग आठवून त्यात गढून जात असे. याविषयीची जाणीव मला १ – २ घंट्यांनंतर होऊन पश्‍चात्ताप होत असे. मी नामजप करत स्वतःवरील त्रासदायक शक्तीचे आवरण काढून चूक लिहिली की, मी त्या प्रसंगातून बाहेर पडायचे. त्यासाठी मी स्वयंसूचना सत्रेही करत होते; परंतु त्या सत्रांचा म्हणावा तितका लाभ होत नव्हता. एका भाववृद्धी सत्संगात सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितले, ‘‘आपल्या मनात असलेले पूर्वग्रह आणि प्रतिक्रिया दूर होण्यासाठी प.पू. गुरुदेवांचा संकल्प झालेला आहे.’’ तो भाववृद्धी सत्संग झाल्यावर लगेच मी गुरुदेवांना शरण जाऊन प्रार्थना केली, ‘माझ्या मनात दिवंगत सासूबाई आणि इतर नातेवाईक यांच्याविषयी पूर्वग्रह अन् प्रतिक्रिया आहेत, त्या तुमच्या कृपेने नष्ट होऊ देत.’ नंतर मी स्वयंसूचना सत्र केले. दुसर्‍या दिवशी सकाळी स्वयंपाक करतांना माझ्या मनात सासूबाईंविषयी थोडाही पूर्वग्रह वा प्रतिक्रिया आल्या नाहीत. त्याचप्रमाणे मला एखादा जुना प्रसंग आठवला, तरी त्याच क्षणी त्याची जाणीव होऊन मला त्यावर मात करता येऊ लागली.

२. यजमान शिबिरासाठी रामनाथी आश्रमात गेले असतांना ‘प.पू. गुरुदेव आपल्या सोबतीला आहेत’, असा भाव ठेवल्यानंतर ‘घरातील भिंती आदी निर्जीव वस्तू बोलत आहेत’, असे जाणवणे आणि ‘भीती वाटणे’ या स्वभावदोषावर मात करता आल्याने प.पू. गुरुदेवांप्रती एकसारखी कृतज्ञता व्यक्त होणे

पूर्वी मला एकटीने प्रवास करण्याची भीती वाटत असे. आता मला देवाच्या साहाय्याने एकटीला प्रवास करता येतो. पूर्वी काही दिवस घरात एकटीने राहण्याचा प्रसंग आला, तर मी माझे यजमान श्री. सुधीर यांच्याकडे चिडचिड व्यक्त करत असे आणि कुणाला तरी सोबतीला बोलावत असे. श्री. सुधीर यांनी मला अनेकवार ‘भीती वाटणे’ हा अहंचा तीव्र पैलू आहे’, याची जाणीव करून दिली होती. एक मासापूर्वी श्री. सुधीर ८ दिवस रामनाथीला शिबिरासाठी जाणार होते. तेव्हा मी ‘प.पू. गुरुदेव आपल्या सोबतीला आहेत’, असा भाव ठेवला आणि कुणालाही सोबतीला बोलावले नाही. मी यजमानांना बसस्थानकावर सोडून घरी आल्यावर कुलूप उघडले. तेव्हा मला जाणवले की, भिंती मला म्हणत आहेत, ‘तू एकटी नाहीस. आम्ही तुझ्याजवळ आहोत.’ मग ‘घरातील प्रत्येक वस्तू माझ्याशी बोलत आहे’, असे मला जाणवले. मला ८ दिवस कृष्णाच्या साहाय्याने पुष्कळ आनंदात राहता आले आणि माझ्याकडून व्यष्टी साधना गांभीर्याने केली गेली अन् मला आनंदही मिळाला. या कालावधीत मला एक क्षणही एकटे वाटले नाही. यासाठी प.पू. गुरुदेवांप्रती एकसारखी कृतज्ञता व्यक्त होत होती.

३. दक्षिण दिशेला अर्घ्य देऊन पूर्वजांना ‘तुम्ही असाल, तेथे दत्ताचा नामजप करा’, अशी प्रार्थना केल्यावर ‘सासूबाई हसतमुखाने पाहत आहेत’, असे सूक्ष्मातून दिसणे अन् मनात प.पू. गुरुदेवांप्रती कृतज्ञताभाव जागृत होणे

मी स्नान करतांना पूर्व दिशेला सूर्यनारायणाला, दक्षिणेला पितरांना आणि उत्तर दिशेला ऋषीमुनींना अर्घ्य देते. काही दिवसांपूर्वी मी दक्षिण दिशेला अर्घ्य दिले आणि पूर्वजांना प्रार्थना केली, ‘तुम्ही असाल, तेथे दत्ताचा नामजप करा.’ तेव्हा ‘सासूबाई माझ्याकडे हसतमुखाने पाहत आहेत’, असे मला सूक्ष्मातून दिसले. तेव्हा माझ्या मनात प.पू. गुरुदेवांप्रती कृतज्ञताभाव जागृत झाला.

‘गुरुदेव, आता माझ्या अंतरंगात पूर्वीपेक्षा पुष्कळ पालट झाला असल्याचे मला जाणवते. यासाठी भगवान श्रीकृष्ण, प.पू. गुरुदेव अन् सर्व साधक यांच्याप्रती कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.

निजबोधाची दिवटी लावी, देव प्रत्यक्ष नयनी दावी ।
या गुरूसी काय बा द्यावे, यासी कैसेनि उतराई व्हावे ॥

(- प.पू. कलावतीआईंच्या नित्योपासनेतील ओळी)

अर्थ : जे गुरु आपल्यातील आत्मतत्त्वाचा दीप प्रज्वलित करतात, म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष भगवंताचे दर्शन घडवतात, त्या गुरूंचे ऋण आपण कसे बरे फेडावे ? त्यांना आपण काय देऊ शकणार ?

४. प्रार्थना

‘गुरुदेव, ‘हे पालट केवळ तुमच्या संकल्पाने झाले आहेत’, याची जाणीव माझ्या अंतर्मनात अखंड राहू दे’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना करते.’

– सौ. सिमंतिनी बोर्डे, संभाजीनगर, महाराष्ट्र. (२६.१.२०१९)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहे.

• या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक