काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराची थट्टा करणार्‍या ‘शिकारा’ या चित्रपटावर बंदी घालण्याविषयी केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ आणि शासन यांना द्यावयाचे निवेदन

‘राष्ट्र आणि हिंदु धर्म यांवर होणार्‍या आघातांच्या विरोधात सामान्य हिंदु नागरिक जागृत होत आहेत. राष्ट्रीय हिंदू आंदोलनांच्या माध्यमांतून अनेकजण एक ‘हिंदू’ म्हणून एकत्र येत आहेत. ते राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होणार्‍या आघातांच्या विरोधात या आंदोलनांतून अन् निवेदने देऊन आपला आवाज यशस्वीरित्या शासनदरबारी पोचवत आहेत. नुकताच प्रदर्शित झालेला काश्मिरी हिंदूंविषयीचा हिंदी चित्रपट ‘शिकारा’ यावर काश्मिरी हिंदूंकडून टीका होऊ लागली आहे. देहलीमध्ये हा चित्रपट दाखवला जात असतांना काश्मिरी हिंदू असलेल्या एका महिलेने आरोप केला, ‘चित्रपटाचे निर्माते विधु विनोद चोप्रा यांनी या चित्रपटात हिंदूंवर झालेले अत्याचार अत्यंत मवाळपणे दाखवले आहेत. यात हिंदूंचा नरसंहार आणि महिलांवरील सामूहिक बलात्कार यांचा उल्लेखही करण्यात आलेला नाही.’ तसेच काश्मिरी हिंदु असणारे चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनीही या चित्रपटावर टीका केली आहे. हिंदूंची थट्टा करून त्यांची दिशाभूल करणार्‍या या चित्रपटाचे प्रमाणपत्र रहित करण्याविषयी केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ आणि शासन यांना द्यावयाचे निवेदन येथे देत आहोत.

दिनांक :     .२.२०२०

प्रति,

मा. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री,

भारत सरकार, नवी देहली.

विषय : वर्ष १९९० मध्ये काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अनन्वित अत्याचारांविषयी समाजाची दिशाभूल करणार्‍या ‘शिकारा’ या चित्रपटाचे प्रमाणपत्र चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने (सेन्सॉर बोर्डाने) रहित करून त्यावर बंदी घालावी !

महोदय,

७ फेब्रुवारी २०२० या दिवशी ‘विनोद चोप्रा फिल्म’ने निर्मिती केलेला ‘शिकारा’ हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट काश्मिरी हिंदूंच्या जीवनावर आधारित असल्याचे चित्रपटाच्या ‘ट्रेलर’च्या माध्यमातून सांगितले गेले होते. गेली ३० वर्षे अत्याचार पीडित काश्मिरी हिंदूंच्या संदर्भात सरकार, बुद्धीवादी, तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी आदी कोणीच आजवर बोलले नाही. पण ‘या चित्रपटाच्या माध्यमातून प्रथमच कोणीतरी काश्मिरी हिंदूंवरील अत्याचाराची दखल घेतली’, असे प्रथमदर्शनी वाटले होते. प्रत्यक्षात मात्र ‘शिकारा’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर काश्मिरी हिंदूंच्या दुःखावर फुंकर घालण्याऐवजी त्यांच्या ३० वर्षांपूर्वीच्या जखमा खोदून पुन्हा एकदा त्यावर मीठ चोळण्याचा प्रकार केल्याचीच भावना काश्मिरी हिंदूंच्या मनात निर्माण झाली आहे. काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांचा कळवळा कोणाला आला नाही, हे एकवेळ समजू शकतो; पण त्यांच्यावर झालेला भयंकर अन्याय हा ‘झालाच नाही’ अशा प्रकारे चित्रपटातून दाखवणे म्हणजे काश्मिरी हिंदूंवर मानसिक अत्याचार केल्यासारखेच आहे.

बॉलिवूड चित्रपटसृष्टी तशी हिंदूंच्या भावनांसंदर्भात संवेदनशील नाही, हे सर्वश्रुत आहेच. यापूर्वीही अनेक चित्रपटांच्या पटकथा, संवाद, पात्रे, गाणी आदींतून इतिहासाची मोडतोड करणे, हिंदु देवतांची टिंगल करणे, अन्य धर्मीय सहिष्णु आणि हिंदू असहिष्णू दाखवणे, इतिहासातील मुसलमान वा ख्रिस्ती आक्रमक यांचा खरा इतिहास न दाखवता त्यांचे उदात्तीकरण करणे आदी अनेक प्रकार यापूर्वीही चित्रपटसृष्टीत घडलेले आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी वाद निर्माण होतील, अशी जाहिरात करून अथवा तशी चित्रपटात कथानके घेऊन चित्रपटाची प्रसिद्धी करण्यासाठी प्रयत्न करणे असेही हिणकस प्रयत्न चित्रपट निर्मात्यांकडून होतात, हेही आतापर्यंत अनेकदा समाजाने पाहिले आहे. तरी नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘शिकारा’ या चित्रपटात याही पुढे जाऊन काश्मिरी हिंदु समाजाचा झालेला वंशविच्छेद, काश्मिरी हिंदूंच्या झालेल्या क्रूर हत्या, सहस्रो काश्मिरी हिंदु माता-भगिनींवर झालेले बलात्कार, सहस्रो मंदिरांची झालेली मोडतोड आणि लाखो काश्मिरी हिंदूंचे झालेले विस्थापन हा सर्व भयंकर इतिहास दडपण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न निर्माता विधु विनोद चोप्रा यांनी केला आहे. या चुकीला भारतीय समाज कधीही माफ करणार नाही.

या चित्रपटाचे प्रमोशन करतांना ‘शिकारा – द अनटोल्ड स्टोरी ऑफ काश्मिरी पंडितस्’ असे प्रत्येक ‘पोस्टर’वर दिले गेले होते; मात्र चित्रपट प्रदर्शित होण्याच्या दिवशी त्याची जाहिरात करतांना त्याचा उपमथळा (सबटायटल) पालटून ‘शिकारा – अ टाइमलेस लव्ह स्टोरी इन द वर्स्ट ऑफ टाइम’ असे करण्यात आले.

‘शिकारा’ या चित्रपटात वास्तव लपवून खोटारडेपणा कसा केला आहे, याची काही उदाहरणे पुढे देत आहोत.

१. चित्रपटातील दृश्य : काश्मिरी हिंदु स्त्रियांवर बलात्कार झालाच नाही !

घडलेले वास्तव : प्रत्यक्षात सहस्रो काश्मिरी हिंदु स्त्रियांवर काश्मिरी मुसलमानांनी बलात्कार केले आहेत !

२. चित्रपटातील दृश्य : हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच काश्मिरी हिंदू या ठिकाणी मारले गेले !

घडलेले वास्तव : प्रत्यक्षात ९० सहस्रांहून अधिक काश्मिरी हिंदूंच्या हत्या केल्या गेल्या आहेत !

३. चित्रपटातील दृश्य : एकही मंदिर धर्मांध मुसलमानांनी तोडले नाही !

घडलेले वास्तव : सहस्रो हिंदु मंदिरे तोडली गेली, मूर्तीभंजन करण्यात आले. आजही भग्नावस्थेतील अनेक मूर्ती आणि ओसाड झालेली अनेक मंदिरे काश्मीरमध्ये पाहायला मिळतात !

४. चित्रपटातील दृश्य : तत्कालीन भारत सरकारने काश्मीरमध्ये ‘कलम १४४’ लागू केल्याने तेथील मुसलमान मारले गेले आणि त्यामुळेच मुसलमानांची मुले ही अतिरेकी बनली !

घडलेले वास्तव : ‘जिहादी मानसिकता, पाकिस्तानप्रेम आणि काश्मीर भारतापासून तोडणे’ हे ध्येय, ही मुसलमान अतिरेकी बनण्याची मूळ कारणे आहेत. ही मूळ कारणे न सांगता, ‘सरकारने मुसलमानांना मारले’, असे दाखवून भारत सरकारची मानहानी करण्याचा प्रयत्न केला आहे.

५. चित्रपटातील दृश्य : काश्मिरी हिंदूंना धर्मांध मुसलमानांनी काश्मीर सोडून भारतात सुरक्षित जाण्यास साहाय्य केले !

घडलेले वास्तव : प्रत्यक्षात काश्मिरी मुसलमानांनी मशिदींतून बांग देत, वृत्तपत्रांत विज्ञापने छापून, हिंदूंच्या घरांवर भीत्तीपत्रके लावून ‘मुसलमान व्हा, चालते व्हा किंवा मरायला सिद्ध व्हा’ अशा धमक्या काश्मिरी हिंदूंना दिल्या होत्या !

६. चित्रपटातील दृश्य : काश्मिरी मुसलमानांच्या मनात काश्मिरी हिंदु मित्रांविषयी अत्यंत जिव्हाळा होता !

घडलेले वास्तव : असे असते, तर गेल्या ३० वर्षांत या मुसलमानांनी काश्मिरी हिंदूंना परत आणण्यासाठी प्रयत्न केले असते ! पण तसे झालेले नाही. मुळात काश्मिरी हिंदूंना मुसलमानांनी लूटमार करून हाकलले, या वस्तूस्थितीलाच विधु विनोद चोप्रा यांनी बगल दिली आहे.

७. चित्रपटातील दृश्य : काश्मिरी हिंदूंच्या हत्या केल्याबद्दल धर्मांध मुसलमानांना अत्यंत दुःख झाले. त्यामुळे ते मरतांना त्यासाठी काश्मिरी हिंदूंची क्षमाही मागतात, असे दाखवण्यात आले आहे !

घडलेले वास्तव : प्रत्यक्षात दोन मासांच्या (महिन्यांच्या) मुलांना आणि गर्भवती हिंदु महिलांना देखील नराधम मुसलमानांनी सोडलेले नाही !

८. चित्रपटात केलेली दिशाभूल : भारताकडून मिळणार्‍या सापत्न वागणुकीमुळे ‘रणजी’ क्रिकेटपटू अतिरेकी बनतो !

वास्तव : आजवर साडेचार लाख हिंदूंना हाकलल्यानंतरही, घरदार लुटल्यानंतरही त्यांतील एकही काश्मिरी हिंदु अतिरेकी बनला नाही, यातून वरील प्रकारे अतिरेकी बनण्याची कारणे ही खोटी असल्याचे दिसून येते !

९. चित्रपटातील दृश्य : काश्मिरी मुसलमान स्वतःचे घर बांधण्यासाठी राखून ठेवलेले दगड काश्मिरी हिंदूंचे घर बांधण्यासाठी फुकट देतात. इतके काश्मिरी मुसलमान दानशूर आहेत !

घडलेले वास्तव : जिहादी मुसलमानांनी काश्मिरी हिंदूंच्या घरादाराची राखरांगोळी केली ! असे मुसलमान हिंदूंना घर बांधण्यासाठी दगड देऊन साहाय्य करतात, हा त्यांच्या अपराधांना झाकण्याचाच प्रयत्न आहे.

१०. चित्रपटातील दृश्य : काश्मिरी हिंदू त्यांच्यावर आलेले संकट दूर करण्यासाठी भारत सरकारला कधीच सांगत नाहीत, याउलट २५०० हून अधिक पत्रे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला लिहितात ! अर्थात काश्मिरी हिंदू भारताला आपली मातृभूमी मानत नाहीत !

घडलेले वास्तव : तत्कालीन मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला (नॅशनल कॉन्फरन्स पक्ष) आणि तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी. सिंह (काँग्रेस पक्ष) या दोन्ही नेत्यांनी काश्मिरी हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून त्यांची उपेक्षाच केली. जर काश्मिरी हिंदूंनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना पत्रे लिहली असतील, तर हा अब्दुल्ला आणि सिंह यांच्या नाकर्तेपणाचा परिणाम आहे, पण चित्रपटात काश्मिरी हिंदूंवर आरोप करतांना दाखवणे, हे निंदनीय आहे.

११. चित्रपटातील दृश्य : निर्वासित झालेल्या काश्मिरी हिंदूंच्या तंबूमध्ये लहान मुले ‘मंदिर वही बनाएंगे’ या घोषणा देतात. तेव्हा ‘लीडर जोडनेका काम करते है, तोडनेका नहीं !’ अशी समज या मुलांना द्यावी लागते.

घडलेले वास्तव : ‘पाकिस्तान झिंदाबाद’ आणि ‘भारत तेरे टुकडे होंगे’ अशा घोषणा देणारे काश्मिरी मुसलमान न दाखवता राममंदिराविषयी कपोलकल्पित घटना दाखवून हिंदूंना असहिष्णू दाखवणार्‍या चोप्रा यांचा कितीही निषेध केला तरी अल्पच आहे !

१२. चित्रपटातील दृश्य : आपल्या आयुष्यभराची ठेव साचवून हिंदूने मोठ्या प्रेमाने बांधलेले घर काश्मीरमधील मुसलमान बळकावतो. मुसलमान हिंदूला घर विकण्याचा सल्ला देतो. तेव्हा त्या हिंदूची पत्नी ‘आम्ही परत येऊच. आमच्या अस्थीसुद्धा इथेच विसर्जित होतील; पण आम्ही घर विकणार नाही’ असे म्हणते. त्या काश्मिरी हिंदू स्त्रिला जीवघेणा आजार जडतो आणि कोणत्याही परिस्थितीत घर न विकणारा हिंदू औषधोपचाराच्या नावाखाली पंचतारांकीत हॉटेलमध्ये आपल्या बायकोसमवेत राहण्यासाठी घर एका मुसलमानाला विकतो. शेवटी ती स्त्री प्राण सोडते आणि तो हिंदू तिच्या अस्थी घेऊन काश्मीरमधील विकलेल्या घरी येतो !

यातून निर्मात्यांना द्यावयाचा संदेश (?) :  यातून काश्मिरी हिंदूंना यापुढेही काश्मीरमध्ये जाता येणार नाही किंवा जायचेच असेल, तर त्यांच्या अस्थीच तेथे जातील, हाच अनाहुत धमकीवजा संदेश चोप्रा यांना या चित्रपटाच्या माध्यमातून काश्मिरी हिंदूंना द्यायचा नाही ना, अशी शंका येते !

वरील प्रसंग चित्रपटात दाखवून विधु विनोद चोप्रा यांनी काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अत्याचारांची थट्टाच केली आहे. काश्मिरी हिंदू स्वार्थासाठी अर्थात घर-पैसा-भूमी (जमीन)-पत्नी यांना वाचवण्यासाठी धर्म बदलून मुसलमान होऊ शकले असते; पण त्यांनी आपला धर्म वाचवण्यासाठी सर्वस्व सोडून ते काश्मीरमधून निघून आले. त्यांचा रक्तरंजित इतिहास न दाखवता, मुसलमानांचा भाईचारा, भारताविषयी द्वेष आणि काश्मिरी हिंदूंना पुन्हा काश्मीरमध्ये येण्याची आशा न दाखवणे, अशा अत्यंत अयोग्य भूमिकेतून चित्रपट बनवला आहे. कोणत्याही इतिहासाची मोडतोड करणे, हा एकप्रकारे गुन्हाच असतो. तो विधु विनोद चोप्रा यांनी केला आहे. धर्मनिरपेक्ष भारतात धर्माच्या नावाखाली लाखो हिंदूंना विस्थापित व्हावे लागले असतांना त्याचे वास्तव मांडणे तर दूरच, त्याचा विपर्यास करूनच तो मांडला जात आहे. हे अतिशय वेदनादायी आहे. अद्यापही काश्मिरी हिंदू निर्वासितांचे जीवन कंठत आहेत. लाखोंच्या संख्येतील हे हिंदू निर्वासितांच्या छावण्यांत न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. असे असतांना त्यांच्यावर अशा प्रकारे चित्रपटाच्या माध्यमातून खोटा इतिहास दाखवून पुन्हा एकदा केलेला अत्याचार अक्षम्य आहे.

विधु विनोद चोप्रा यांनी यापूर्वीही ‘पीके’ या चित्रपटातून हिंदू देवदेवतांचे विडंबन करत अनेक धार्मिक गोष्टींवर टीका केली होती. हे करतांना हेतूतः अन्य धर्मीयांच्या श्रद्धा आणि प्रथा-परंपरा यांविषयी भाष्य करणे टाळले होते. ‘संजू’ नामक चित्रपटातून एका कुख्यात अभिनेत्याच्या प्रतिमेचे उदात्तीकरण करत समाजात अयोग्य संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपट हे माध्यम समाजावर मोठा प्रभाव निर्माण करते. त्यामुळे चित्रपटांतून चुकीचा संदेश, चुकीचा इतिहास दाखवल्यास त्याचा परिणाम पुढच्या काही पिढ्यांवर तसाच राहतो. अयोग्य किंवा समाजविघातक गोष्टी अशा प्रकारे प्रदर्शित करणे, हा गंभीर अपराध असून त्याला समाज, राष्ट्र आणि धर्म कधीही क्षमा करणार नाही. याची विधु विनोद चोप्रा यांना जाणीव व्हायलाच हवी ! त्यामुळे केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने (सेन्सॉर बोर्डाने) या चित्रपटाला दिलेले प्रमाणपत्र त्वरित रहित करावे आणि या चित्रपटावर बंदी घालावी, तसेच केंद्र सरकारनेही या चित्रपटात दाखवलेल्या अयोग्य चित्रणाबद्दल निर्मात्यांवर कारवाई करावी, अशी आम्ही मागणी करत आहोत.

आपला नम्र,

(व्यक्ती / संघटनेचे नाव घालावे.)

संपर्क :

प्रत :

१. मा. केंद्रीय गृहमंत्री, भारत सरकार, नवी देहली.

२. मा. अध्यक्ष, केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ

हिंदु धर्माभिमान्यांना आवाहन !

या निवेदनाची प्रत हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि धर्माभिमानी हिंदू आपल्या शहरातील लोकप्रतिनिधी अथवा प्रशासकीय अधिकारी यांना देऊ शकतात. हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळावर https://www.hindujagruti.org/hjs-activities/rashtriya-hindu-andolan या मार्गिकेवर मराठी भाषेतील निवेदन उपलब्ध आहे. हे निवेदन शासनदरबारी दिल्यावर त्याची माहिती दैनिक ‘सनातन प्रभात’च्या जवळच्या कार्यालयाला पाठवल्यास त्यास प्रसिद्धीही दिली जाईल.