गीताज्ञानदर्शन

सनातनचे ज्ञानयोगी संत पू. अनंत बाळाजी आठवले ह्यांच्या ‘गीताज्ञानदर्शन’ ह्या सनातनच्या ग्रंथसंपदेतील ग्रंथातील मजकूर क्रमश: प्रसिद्ध करत आहोत.

॥ श्रीकृष्णाय नम: ॥

अनंत आठवले

प्रकरण २

‘ज्ञानाचे भांडार’, तसेच अनेक गुणांची खाण असलेले ती. भाऊकाका (श्री. अनंत आठवले) !

१.  ती. भाऊकाका (श्री. अनंत आठवले) यांची त्यांच्या बंधूंनी सांगितलेली आध्यात्मिक गुणवैशिष्ट्येे

१ अ. साधनेविषयी

१.   ‘अध्यात्माची आवड असल्याने त्याने उपनिषदे, दासबोध, भगवद्गीता यांचा सखोल अभ्यास केला.

२.   तो नियमितपणे नामजप करतो. आम्ही सर्वांनी जेव्हा प.पू. भक्तराज महाराज यांच्याकडून गुरुमंत्र घेतला, तेव्हा तो म्हणाला, ‘‘मी दोन गुरु केलेलेच आहेत. एक समर्थ रामदासस्वामी आणि दुसरे भगवान् श्रीकृष्ण !’’

– (सद्गुरु) डॉ. वसंत आठवले (सद्गुरु अप्पाकाका, मोठे भाऊ)

३.   ‘आध्यात्मिक पुस्तके वाचून त्यांतील सूत्रांवर पुष्कळ मंथन करणे आणि निष्कर्ष काढणे, हे त्यांनाच जमते.

४.   प्रसिद्ध संत बर्फानी महाराज यांच्याकडे ते जात असत.’

– डॉ. विलास आठवले (धाकटा भाऊ)

२. सनातनच्या साधकांना जाणवलेली ती. भाऊकाका यांची विविध गुणवैशिष्ट्येे

२ अ. नम्रता, साधे राहणीमान आणि स्वावलंबन : ‘काका हळू आवाजात नम्रपणे बोलतात. ते उच्चशिक्षित असूनही त्यांचे राहणीमान अत्यंत साधे आहे. काका स्वतःची कामे, उदा. कपडे धुणे, देवपूजा करणे, स्वच्छता करणे, बाजारातून वस्तू आणणे इत्यादी कामे स्वतःच करतात.

२ आ. इतरांचा विचार : ‘आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये’, असा त्यांचा विचार असतो. काकांकडे त्यांच्या जेवणाचा डबा पोचवण्याच्या वेळी पाऊस येत असेल, तर काका भ्रमणभाष करून साधकांना न येण्याविषयी सांगत. तसेच ‘आम्ही आज सुका खाऊ घेऊ’, असेही सांगत.’

– श्री. सतीश बांगर आणि सौ. शर्मिला बांगर, दादर (२६.१२.२०१३)

२ इ. श्रीकृष्णमय झालेले ती. भाऊकाका !

२ इ १. श्रीकृष्णाला गुरुस्थानी मानणे आणि त्यामुळे लिखाणात ‘श्रीकृष्णांनी’, ‘श्रीकृष्णांचे’, अशा प्रकारे लिहिणे : त्यांनी संकलित केलेल्या ज्ञानाचे टंकलेखन करतांना काकांचा श्रीकृष्णाप्रती असलेला भाव अनुभवायला मिळाला. ती. काका त्यांच्या लिखाणात ‘श्रीकृष्णांनी’, ‘श्रीकृष्णांचे’, असा आदरार्थी उल्लेख करतात. ते म्हणतात, ‘श्रीकृष्ण माझ्यासाठी गुरुस्थानी आहेत.’ प्रत्येक अध्यायाच्या आरंभी ‘श्रीकृष्णाय नमः ।’ आणि शेवटी ‘श्रीकृष्णार्पणमस्तु ।’, असे त्यांनी आवर्जून लिहिण्यास सांगितले. ‘त्यानिमित्ताने तेवढ्या वेळा श्रीकृष्णाचे नाव घेतले जाते’, असा त्यांचा भाव होता. त्यामुळे माझ्याही प्रार्थना आणि कृतज्ञता होऊ लागल्या.

२ इ २. प्रसंगानुसार गीतेतील श्‍लोक आठवून प्रत्येक प्रसंगात श्रीकृृृष्णाला पाहणे : ‘श्रीमद्भगवद्गीता’ हा तर काकांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय ! गीतेवरील लिखाणाचे टंकलेखन करण्याची सेवा चालू असतांना काकांनी ते पूर्ण करण्याचा ध्यासच घेतला असल्याचे जाणवायचे. एक दिवस मी केसांत मोगर्‍याचा गजरा माळला होता. बाजूच्या दारातून येणार्‍या वार्‍यामुळे काकांना त्याचा सुगंध येत होता. तेव्हा काका गमतीने म्हणाले, ‘‘गजरा तुम्ही माळला आहे; पण सुगंधाचा लाभ मात्र मला होत आहे.’’ त्या वेळी एका श्‍लोकाचा संदर्भ देत ते म्हणाले, ‘‘श्रीकृष्ण म्हणतात, जसा सुगंधाच्या कोशाजवळून वाहणारा वारा सुगंधाला समवेत घेऊन जातो, त्याप्रमाणे माझाच अंश असलेला जीव जेव्हा शरिरात येतो किंवा शरीर सोडतो, तेव्हा सूक्ष्म इंद्रिये (आवड-नावड) आणि मन (त्यातील संस्कारांसह) यांना तो सहजपणे समवेत घेऊन जातो.’’ तेव्हा काका प्रत्येक लहान-मोठ्या प्रसंगात श्रीकृष्णालाच पाहत आहेत, याची जाणीव झाली.’

– सौ. राघवी कोनेकर, घाटकोपर, मुंबई. (२६.१२.२०१३)

२ ई. ग्रंथ किंवा दैनिक ‘सनातन प्रभात’ यांमधील लिखाणाविषयीचा दृष्टीकोन

२ ई १. ग्रंथ किंवा दैनिक ‘सनातन प्रभात’ यांमध्ये चुका आढळल्यास त्वरित कळवणे : ‘ग्रंथ भाषांतरित करतांना किंवा पडताळतांना एखादा चुकीचा शब्द असल्यास ते त्यात लगेच पालट करत. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये व्याकरणदृष्ट्या एखादा चुकीचा श्‍लोक किंवा अमराठी शब्द आल्यास ते त्वरित पत्राद्वारे कळवत. यासंदर्भात ते म्हणायचे, ‘‘दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि ग्रंथ समाजातील ज्ञानी लोकही वाचतात. त्यांनी सनातनला नावे ठेवता कामा नये. त्यांच्यापर्यंत योग्य आणि परिपूर्ण ज्ञानच गेले पाहिजे.’’

– कु. स्नेहा ननावरे, वडाळा, मुंबई (२८.१२.२०१३)

२ उ. अहं अल्प असणे

२ उ १. अनेक विषयांचा अभ्यास असूनही त्याचा अहं नसणे : ‘विद्या विनयेन शोभते ।’ म्हणजे ‘विद्या नम्रतेमुळे शोभते’, या उक्तीचा भाऊकाकांच्या सहवासात वारंवार अनुभव येतो. त्यांचा अनेक विषयांचा अभ्यास आहे, तरीही त्याविषयीचा थोडासाही अहंभाव त्यांच्या बोलण्यात जाणवत नाही. गीतेविषयीच्या टंकलेखनाची सेवा झाल्यावर काका हात जोडून ‘आज झालेल्या सेवेविषयी कृतज्ञ आहे’, असे म्हणत.’ – सौ. राघवी कोनेकर, घाटकोपर, मुंबई. (२६.१२.२०१३)

२ उ २. स्वतःकडून झालेल्या चुकांविषयी खंत वाटणे : ‘गीताज्ञानदर्शन’ या ग्रंथाचे लिखाण करतांना ती. भाऊकाका त्यांना सुचलेले पालट भ्रमणभाषवरून अधे मधे कळवत. २७.१२.२०१३ या दिवशी त्यांनी भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘माझ्याकडून एक चूक झाली. एका परिशिष्टातील एक वाक्य अनेकवचनी हवे होते, ते मी एकवचनी केले आहे. माझी चूक झाली. तुम्ही पालट करून घ्या.’’ त्या वेळी त्यांच्या बोलण्यात पुष्कळ खंत जाणवत होती. दुसर्‍या दिवशीही एक सुधारणा सांगितल्यावर त्यांनी ‘माझी चूक झाली’, या वाक्यापासूनच बोलायला प्रारंभ केला.’ – सौ. मनीषा पानसरे, सनातन आश्रम, गोवा.

२ ऊ. प्रत्येक कृतीतून साधकत्व जाणवणे : ‘ती. काकांच्या अनेक लहान-लहान कृतींमधून त्यांच्यातील साधकत्व जाणवत राहते. त्यांच्या घरी गेल्यावर काका अत्यंत गोड हसून आपले स्वागत करतात. त्यांचा तोंडवळा कधीच उदास किंवा गंभीर असलेला मी पाहिला नाही. खरेतर मी त्यांच्या नातीच्या वयाची आहे; पण त्यांनी मला एकेरी नावाने आतापर्यंत कधीच हाक मारली नाही. आम्ही सेवा करत असतांना कधीकधी ती. सौ. काकू त्या (सेवा करत असलेल्या) खोलीत आल्या, तर ती. काका त्यांनाही ‘बसायला आसंदी (खुर्ची) आणून देऊ का ?’, असे विचारतात.’

– सौ. राघवी कोनेकर, घाटकोपर, मुंबई.  (समाप्त)

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

संदर्भ : सनातनचे प्रकाशन ‘गीताज्ञानदर्शन’

(टीप : हे लिखाण पू. अनंत आठवले हे संत होण्यापूर्वीचे असल्याने  लिखाणात त्यांचा उल्लेख ‘ती. भाऊकाका’ किंवा ‘श्री. अनंत आठवले’ असा करण्यात आला आहे.)