मडकई (गोवा) येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. उमेश नाईक यांना रुग्णालयात शस्त्रकर्माच्या वेळी ‘गुरुकृपा कशी कार्यरत असते ?’, याविषयी आलेल्या अनुभूती

‘बर्‍याच दिवसांपासून माझ्या पोटात दुखत असल्याने मी डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी माझी तपासणी करून मला ‘अल्ट्रासाऊंड’ चाचणी करण्यास सांगितले. नंतर मी ‘अल्ट्रासाऊंड’ चाचणी करणार्‍या डॉक्टरांच्या सांगण्यानुसार ‘सिटी स्कॅन’ करून घेतले. त्यामध्ये ‘अ‍ॅपेंडीक्युलर मास’ नावाचा दोष आढळला. हा अहवाल पाहून शल्यविशारदांनी मला शस्त्रकर्म करण्यास सांगितले. पुढे शस्त्रकर्माच्या काळात ‘गुरुकृपा कशी कार्यरत असते ?’, याविषयी मला आलेल्या अनुभूती पुढे देत आहे.

श्री. उमेश नाईक

१. शस्त्रकर्मासाठी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात जाण्याच्या आदल्या दिवशी ‘तेथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले वर्गमित्र डॉ. उसगावकर भेटल्यास चांगले होईल’, असा विचार मनात येणे आणि दुसर्‍या दिवशी रुग्णालयात जाताच त्यांची भेट होऊन सर्व गोष्टी एका मागोमाग सहजपणे घडणे अन् गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त होणे

शनिवार, १२.१०.२०१९ या दिवशी मी बांबोळी (गोवा) येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील शल्यविशारद (सर्जन) डॉ. अवदी यांना भेटल्यावर त्यांनी माझी तपासणी केली. नंतर त्यांच्या सांगण्यानुसार मी पुन्हा १४.१०.२०१९ या दिवशी सकाळी त्यांच्याकडे गेलो. त्या वेळी त्यांनी माझी पुन्हा तपासणी करून लगेच सर्व चाचण्यांचे अहवाल आणि ‘सिटीस्कॅन’ची ‘सीडी’ बघितली अन् त्यांनी माझे शस्त्रकर्म करण्याचा निर्णय घेतला. नंतर मी ‘रेडिओलॉजी’ विभागाच्या बाहेर उभा असतांना तेथे मला माझे वर्गमित्र आणि सध्या वैद्यकीय महाविद्यालयात ‘प्राध्यापक’ म्हणून कार्यरत असलेले डॉ. उगम उसगावकर भेटले. त्यांनी माझी विचारपूस केली आणि मला रुग्णालयात येण्याचे कारण विचारले. नंतर त्यांनी डॉ. अवदी यांना ‘वर्गमित्र’ म्हणून माझी ओळख करून दिली आणि त्यांना ‘श्री. नाईक यांना आवश्यक ते साहाय्य करा’, अशी विनंतीही केली. एक दिवस आधी माझ्या मनात सहज विचार आला होता, ‘डॉ. उगम उसगावकर भेटले, तर चांगले होईल’ आणि दुसर्‍याच दिवशी ते मलाच भेटण्यासाठी आल्याप्रमाणे देवाने त्यांना माझ्या समोर उपस्थित केले. त्या वेळी माझा भाव जागृत झाला.

२. रुग्णालयात शस्त्रकर्मासाठी गेल्यावर तेथील ‘वॉर्ड’ रुग्णांनी पूर्ण भरलेला असणे आणि तेथील डॉक्टरांनी विशेष खोली उपलब्ध करून दिल्याने रुग्णालयातही प्रार्थना आणि नामजपादी आध्यात्मिक उपाय करणे मला सोयीचे होणे

डॉ. अवदी यांनी २२.१०.२०१९ या दिवशी माझे शस्त्रकर्म करण्याचे निश्‍चित केले आणि मला त्यापूर्वी दोन दिवस अगोदर रुग्णालयात भरती होण्यासाठी बोलावले. २०.१०.२०१९ या दिवशी सकाळी ९.२० वाजता मी रुग्णालयात भरती होण्यासाठी गेलो. त्याच वेळी डॉ. अवदी यांच्याशी माझी भेट झाली आणि लगेच त्यांनी तेथील एका कनिष्ठ डॉक्टरांना माझी कागदपत्रे तयार करून मला ‘वॉर्ड’मध्ये भरती करून घेण्यास सांगितले. तो ‘वॉर्ड’ रुग्णांनी पूर्ण भरला होता. त्याच वेळी ‘वॉर्ड’मधील विशेष खोलीतील एका रुग्णाला ‘डिस्चार्ज’ देण्यात आला होता. डॉ. अवदी यांनी तेथील परिचारिकेला सांगितले, ‘‘ही खोली श्री. नाईक यांना द्या.’’ त्यामुळे मला विशेष खोली मिळाली. त्यामुळे रुग्णालयातही प्रार्थना, नामजप आदी उपाय करणे मला सोयीचे झाले. अशा प्रकारे देवाने रुग्णालयात माझी सर्व प्रकारे काळजी घेतली.

३. नियोजित दिवशी स्वतःचे शस्त्रकर्म निर्विघ्नपणे पूर्ण झाल्यावर काही कारणाने उर्वरित ३ जणांची शस्त्रकर्मे करण्याचे रहित केले जाणे आणि गुरुकृपेने दीपावलीच्या एक दिवस अगोदर रुग्णालयातून घरी परतता आल्याने गुरुदेवांच्या चरणी शरणागतभावाने कृतज्ञता व्यक्त होणे

२२.१०.२०१९ या दिवशी सकाळी ८ वाजता आमच्या ‘वॉर्ड’मधील ६ रुग्णांना शस्त्रकर्म करण्यासाठी ‘शस्त्रकर्म खोलीत (‘ऑपरेशन थिएटर’मध्ये) नेण्यात आले. माझ्या अगोदर २ जणांचे शस्त्रकर्म करण्यात आले. त्यानंतर माझे शस्त्रकर्म झाले. उर्वरित तीन जणांचे त्या दिवशी होणारे शस्त्रकर्म काही कारणाने रहित झाल्याचे नंतर मला कळले. त्या वेळी ‘गुरुकृपेनेच कुठल्याही अडथळ्याविना माझे शस्त्रकर्म ठरल्याप्रमाणे पार पडले’, असे मला वाटले.

२६.१०.२०१९ या दिवशी डॉ. अवदी यांनी मला तपासले. तोपर्यंत माझा शस्त्रकर्माचा घाव (जखम) ईश्‍वरी कृपेने बर्‍यापैकी भरून आला होता. २७.१०.२०१९ या दिवशी दीपावली होती. डॉक्टरांनी मला विचारले, ‘‘दीपावलीला घरी जाणार ना ?’’ लगेच त्यांनी त्यांच्या सहकारी डॉक्टरला मला ‘डिस्चार्ज’ देण्यास सांगितले. अशा प्रकारे देवानेच मला दीपावलीच्या एक दिवस अगोदर रुग्णालयातून घरी आणले होते. त्या वेळी माझ्याकडून गुरुदेवांच्या चरणी शरणागतभावाने कोटीशः कृतज्ञता व्यक्त झाली.

४. अनेक रुग्णांना बांबोळी येथील रुग्णालयात शस्त्रकर्मासाठी प्रतीक्षेत राहावे लागत असूनही स्वतःचे शस्त्रकर्म करण्याचे ८ दिवसांत निश्‍चित होणे आणि त्या अंतर्गत सर्व गोष्टीही एका मागोमाग एक सहजपणे घडल्याने गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त होणे

बांबोळी येथील रुग्णालयात शस्त्रकर्म करवून घेण्यासाठी रुग्णांना वाट पाहावी लागते; परंतु ईश्‍वराच्या कृपेने ८ दिवसांच्या आत माझे शस्त्रकर्म करण्याचे निश्‍चित झाले. नंतरही गुरुकृपेनेच शस्त्रकर्माच्या अंतर्गत सर्व गोष्टी एका मागोमाग एक सहजपणे घडल्या. अशा प्रकारे माझ्या शस्त्रकर्माच्या काळात ‘गुरुकृपा कशी कार्यरत असते ?’, हे माझ्या लक्षात आले आणि माझ्याकडून गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त झाली.

वरील अनुभूतीचे टंकलेखन पूर्ण होताच माझ्या संगणकाच्या ‘डेस्कटॉप’वर परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र दिसले. माझ्या दृष्टीने ‘त्यांनीच ही अनुभूती माझ्याकडून लिहून घेतली’, याची ही पोचपावतीच होती. त्यामुळे माझ्या मनात त्यांच्याप्रती कृतज्ञताभाव जागृत झाला.’

– श्री. उमेश नाईक, गोवा (४.१२.२०१९)

• या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक