सनातनची मानहानी करण्यासाठी चालू असलेल्या सनातनद्वेष्ट्यांच्या षड्यंत्रापासून सावध व्हा !

साधकांसाठी महत्त्वाची सूचना

‘सनातनची मानहानी करण्यासाठी सनातनचे विरोधक विविध मार्गांनी प्रयत्न करत आहेत. सनातनची मानहानी करण्यासाठी विरोधक कोणत्याही थराला जाऊन खोटेपणा करण्याची शक्यता आहे, असे खात्रीलायक सूत्रांकडून समजले आहे.  त्या दृष्टीने केवळ आश्रम, सेवाकेंद्रे आणि परिसरात राहाणारेच नव्हे, तर स्वत:च्या निवासस्थानी राहणार्‍या साधकांनीही सतर्कता बाळगावी.

१. आश्रमात किंवा साधकांच्या घरी येऊन सनातनद्वेष्टे छायाचित्रण करण्यासाठी छुपा व्हिडिओ कॅमेरा किंवा संभाषण ध्वनीमुद्रित करण्यासाठी ध्वनीमुद्रक यांचा वापर करून त्या माहितीचा उपयोग सनातनची मानहानी करण्यासाठी करू शकतात. सनातनच्या साधकांचा कोणत्याही अयोग्य कृत्यांत सहभाग नसतो; पण साध्या चित्रीकरणाचा वापर मानहानीसाठी केला जातो, असा पूर्वानुभव आहे. अशाच प्रकारे एका वाहिनीने काही वर्षांपूर्वी आश्रमात चालणार्‍या आरतीचे छुप्या पद्धतीने चित्रीकरण करून ते अयोग्य वार्तांकनासह दाखवले होते. त्यामुळे आश्रमात किंवा घरी कोणी अशा पद्धतीने चित्रीकरण करत नाही, याकडे लक्ष ठेवा.

२. विरोधकांचे हस्तक जिज्ञासू असल्याचा अथवा सनातनच्या कार्यात रस असल्याचा दिखावा करून सनातनचे आश्रम, सेवाकेंद्रे किंवा साधकांचे निवासस्थान येथे येऊ शकतात आणि काही आक्षेपार्ह वस्तू तेथे ठेवून पोलिसांकडे तक्रार करू शकतात. यामुळे संस्था आणि साधक अडचणीत येऊ शकतात. सनातनचे आश्रम आणि सेवाकेंद्रे यांना भेट देऊन सनातनचे कार्य जाणून घेणे, उत्पादने खरेदी करणे आदींचे निमित्त करून किंवा वाट चुकून आश्रमात आल्याचे सांगून आश्रम किंवा सेवाकेंद्र येथे येण्याचा प्रयत्न होऊ शकतो. साधकांनी त्यांच्या निवासस्थानी येणार्‍या अनोळखी व्यक्तींविषयी दक्षता बाळगावी आणि त्यांच्याशी सावधपणे व्यवहार करावा. एखाद्या अविश्‍वासार्ह व्यक्तीने आश्रम, सेवाकेंद्र अथवा साधकांचे निवासस्थान येथे काही काळासाठी स्वतःचे वैयक्तिक साहित्य ठेवण्याची विनंती केल्यास त्यास नम्रपणे नकार द्यावा. तसेच कोणी नजर चुकवून एखादी वस्तू लपवणार नाही, याकडे सतर्कतेने लक्ष द्यावे.

अशी संशयित व्यक्ती आढळल्यास त्याविषयी त्वरित संबंधित साधकांना माहिती द्यावी. तसेच त्या व्यक्तीच्या हालचालींचे स्वतःकडील छायाचित्रकाद्वारे (कॅमेर्‍याद्वारे) किंवा भ्रमणभाषमधील कॅमेर्‍याद्वारे छायाचित्रण (रेकॉर्डिंग) करून ठेवावे आणि त्याचे छायाचित्रही काढावे. जेणेकरून या माहितीचा उपयोग त्या व्यक्तीविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्यासाठी होईल.’

– श्री. वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय विश्‍वस्त, सनातन संस्था. (१२.२.२०२०)