जिहादी आतंकवादी हाफिज सईद याला ११ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘आम्ही आतंकवाद्यांच्या विरोधात कारवाई करतो’, हे दाखवण्यासाठी पाक अशी तोंडदेखली कृती करत आहे. सईद आणि पाक सरकार अन् पाक सैन्य यांचे साटेलोटे असल्यामुळे तो कारागृहात किती काळ राहील, हा प्रश्‍नच आहे. तसेच तो कारागृहात जरी राहिला, तरी तेथे राहून तो भारतविरोधी कारवायाच करील, हे लक्षात घ्या !

इस्लामाबाद – लाहोरच्या आतंकवादविरोधी न्यायालयाने मुंबईवरील २६/११ च्या आतंकवादी आक्रमणाचा सूत्रधार आणि जमात-उद-दवाचा प्रमुख हाफिज सईद याला आतंकवादी कारवायांसाठी अर्थपुरवठा केल्याच्या प्रकरणात दोषी ठरवून त्याला २ खटल्यांच्या प्रकरणी ११ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. (अशा कारवायांवर समाधान न मानता सईद याला भारतात आणून त्याला शिक्षा करावी, अशीच भारतियांची अपेक्षा आहे ! – संपादक)