भारताचे ६० जणांचे कबड्डी पथक कथित विश्‍वचषक स्पर्धेसाठी पाकमध्ये !

केंद्रीय गृह, क्रीडा आणि पंजाब सरकार अन् गुप्तचर यंत्रणा अनभिज्ञ !

ही आहे भारतीय यंत्रणांची सतर्कता आणि दक्षता !

नवी देहली – पाकिस्तानमध्ये कबड्डीच्या विश्‍वचषक स्पर्धेसाठी भारतीय कबड्डी संघ ६० खेळाडूंच्या पथकासह अटारी सीमेवरून पाकमध्ये पोचला आहे; मात्र या पथकाला पाकमध्ये जाण्याची अनुमती कोणी दिली, व्हिसा कसा मिळाला, याविषयी केंद्रीय गृहमंत्रालय आणि क्रीडा मंत्रालय यांना कोणतीही माहिती नसल्याचे समोर आले आहे. तसेच पंजाबमधील काँग्रेस सरकार आणि पंजाबचा गुप्तचर विभाग यांनाही याविषयी ठाऊक नाही, असेही स्पष्ट झाले आहे.

१. पंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सुनील जाखड यांनी, ‘हे एक मोठे षड्यंत्र असून केंद्र सरकारने याची चौकशी केली पाहिजे. तसेच राज्य सरकारनेही याची चौकशी करावी’, अशी मागणी केली आहे.

२. सामाजिक माध्यमातून पाकच्या कबड्डी फेडरेशनचे सरचिटणीस महंमद सरवर बट्ट यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला होता. त्यात त्यांनी ‘पाक सरकारने आयोजित केलेली कबड्डी विश्‍वचषक स्पर्धा खोटी आहे. यात अनेक मोठ्या देशांनी सहभागी होण्यास नकार दिला आहे. त्यानंतर पाकने भारतातून ६० खेळाडूंना बोलवले आहे. या खेळाडूंना वेगवेगळ्या देशांच्या संघातून खेळवून या स्पर्धेला जागतिक स्तरावरील स्पर्धेचे रूप देण्याचा प्रयत्न केला जात आहे’, असे सांगितले होते. त्यानंतर भारतीय पथक पाकमध्ये गेल्याचे उघड झाले. बट्ट यांनी याविरोधात इस्लामाबाद उच्च न्यायालयात याचिकाही प्रविष्ट केली; मात्र या स्पर्धेला स्थगिती मिळालेली नाही.