आरोपीला शिक्षा दिल्याविना मी स्वस्थ बसणार नाही ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मुंबई – हिंगणघाट येथे घडलेली घटना महाराष्ट्रासाठी अश्‍लाघ्य आहे. या घटनेचे अन्वेषण जलदगतीने करण्यात येईल. हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आरोपीला फाशी देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करील. आरोपीला शिक्षा दिल्याविना मी स्वत: स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, महाराष्ट्राला पुरोगामी परंपरा आहे. माता-भगिनींचा सन्मान करणारा प्रदेश म्हणून आपली ओळख आहे. या प्रतिमेला तडा देणार्‍या अशा गोष्टी कदापि खपवून घेतल्या जाणार नाहीत. स्त्री सन्मानाच्या आपल्या संस्कृतीची घराघरांत उजळणी करावी लागेल. मृत्यू झालेल्या भगिनीचे कुटुंबीय आणि ग्रामस्थ यांची मानसिक अवस्था आपण समजू शकतो. थोडासा धीर धरा. आरोपींना शिक्षा केली जाईलच.