७० वर्षांनंतर बलुचिस्तानमधील प्राचीन मंदिर हिंदूंना सोपवले !

सोब (पाकिस्तान) – पाकच्या बलुचिस्तान प्रांतामधील सोब जिल्ह्यातील २०० वर्ष प्राचीन असलेले एक मंदिर ७० वर्षांनंतर हिंदूंना सोपवण्यात आले. गेल्या ३० वर्षांपासून येथे एक शाळा चालवण्यात येत होती. आता तिला दुसरीकडे हालवण्यात आले आहे. एका समारोहाद्वारे मंदिराची चावी हिंदु नेत्यांना देण्यात आली. या वेळी मोठ्या संख्येने हिंदू उपस्थित होते.

१. येथील उपायुक्त ताहा सलीम यांनी गेली ७० वर्षे हे मंदिर हिंदूंना देण्यात न आल्यामुळे हिंदूंची क्षमा मागितली. ते म्हणाले की, मंदिराला त्याचे मूळ रूप देण्यात येईल. मंदिराचा जीर्णोद्धार केल्यानंतर हिंदू येथे पूजाअर्चा करू शकतील.

२. हिंदू पंचायतीचे अध्यक्ष सलीम जान म्हणाले की, काही दिवसांपूर्वी बलुचिस्तान उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जमाल खान मंडोखेल येथे आले होते. तेव्हा हिंदूंनी त्यांना हे मंदिर परत देण्याची मागणी केली होती. त्यावर त्यांनी मंदिर परत देण्याचे आश्‍वासन दिले होते.

३. जान म्हणाले की, येथे एक गुरुद्वाराही असून तेथेही शाळा चालवण्यात येत आहे. येथील शिखांसाठी कोणतेही प्रार्थनास्थळ नाही.