देहलीत पुन्हा आप !

संपादकीय

देहलीमध्ये पुन्हा आम आदमी पक्ष सरकार स्थापन करणार आहे. देहलीचा रागरंग पाहता हे होणारच होते. त्यामुळे ‘हा निकाल अनपेक्षित’, असे म्हणण्याचे काही कारण नाही. ‘हा विजय म्हणजे भाजपच्या तिरस्काराच्या राजकारणाचा पराजय आहे’, ‘शाहीन बागच्या सूत्रावर जे राजकारण केले गेले, त्याचा हा पराजय आहे’ किंवा ‘हा विकासाच्या राजकारणाचा विजय आहे’, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया वृत्तवाहिन्यांतून किंवा भाजप विरोधकांकडून व्यक्त होत आहेत. आपचे यश जरी मोठे असले, तरी आपच्या विजयाची आणि भाजपच्या पराजयाची मीमांसा योग्य प्रकारे होणे आवश्यक आहे. ‘शाहीन बागमध्ये अवैध आंदोलन करणार्‍या धर्मांधांना विरोध करणे चुकीचे कसे ?’ किंवा ‘जे.एन्.यू. आणि जामिया मिलिया इस्लामिया या विश्‍वविद्यालयांमध्ये राष्ट्रघातकी विद्यार्थ्यांना विरोध करणे, हे तिरस्काराचे राजकारण कसे असू शकते ?’, या प्रश्‍नांची उत्तरेही भाजपविरोधकांनी द्यायला हवीत. एवढे मात्र खरे की, आपच्या या विजयामुळे अनेक प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. ‘देहलीची वाटचाल बंगाल आणि केरळ यांच्या दिशेने होत नाही ना ?’, अशी भीती राष्ट्रप्रेमींना वाटत आहे आणि दुर्दैवाने ती रास्त आहे.

आपचे पाप !

आपच्या विजयाचे विश्‍लेषण करतांना ‘पक्षाच्या विजयात बांगलादेशी घुसखोर आणि धर्मांध यांचा वाटा मोठा आहे’, असे मत एका राजकीय तज्ञाने वृत्तवाहिनीवर व्यक्त केले. शाहीन बागमध्ये धर्मांधांनी आंदोलन चालू केल्यावर आपने ‘मुसलमान दुखावले जातील’, अशा आशयाची प्रतिक्रिया देणे टाळले. पूर्वी काँग्रेसला मते देणारे मुसलमान देहलीत आपचा उदय झाल्यावर त्याच्या बाजूने झुकले, हे सत्य आहे. त्यामुळे ‘ते दुखावले जाणार नाहीत आणि पक्षाची साथही सोडणार नाहीत’, याची पुरेपूर काळजी आपवाल्यांनी घेतली. त्याही पुढे जाऊन ‘भाजप शाहीन बागचे सूत्र उपस्थित करून समाजात दुफळी निर्माण करत आहे’, असा भाजपविरोधी अपप्रचार केला. वास्तविक राजधानीतील एका भागात मागील २ मास रस्ता बंद करून, लोकांना वेठीस धरून आंदोलन होत असेल, तर त्याला सत्ताधारी पक्ष म्हणून आपला विरोध करावासा का वाटला नाही ? ‘आम्ही विकासाचे राजकारण केले’, असे सांगणार्‍या आपला ‘आपल्याच राज्यातील एक भाग देशाच्या मुख्य प्रवाहापासून तुटला आहे’, हे दिसत असूनही त्यावर का भाष्य केले नाही, याचे उत्तर देणे अपेक्षित आहे. याही पुढे जाऊन केंद्रातील भाजप सरकारने शाहीन बागचे आंदोलन मोडून काढले असते, तर आपवाल्यांनी भाजपवर धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप करून धर्मांधांना चुचकारले असते. ‘आम्ही विकासाचे राजकारण करतो, धर्माचे नाही’, असे सांगणार्‍या आपवाल्यांनी सातत्याने विद्वेषी वक्तव्ये करणारे अमानुल्ला खान यांना पक्षाने उमेदवारी का दिली’, याचे उत्तर प्रथम द्यायला हवे. ‘काँग्रेस आता आपल्या कामाचा राहिला नाही’, हे धर्मांधांनी पुरते ओळखले आहे. त्यामुळे आपला हाताशी धरून स्वतःचा हेतू साध्य करण्याचा धर्मांधांचा डाव आहे आणि त्यात ते यशस्वीही झाले आहेत. आपने धर्माचे राजकारण केले; मात्र ते छुप्या पद्धतीने आणि विकासाची झूल पांघरून केले. त्याचा हा धर्मांधधार्जिणा तोंडवळा लोकांच्या समोर यायला हवा. देहलीत मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोर आहेत. तेही पक्षाशी ‘प्रामाणिक’ राहावेत, यासाठी नागरिकत्व सुधारणा कायद्याला आपने विरोध केला. ‘२१ व्या शतकात देशाला संपन्न करण्यासाठी आधुनिक शाळांची आवश्यकता आहे, सीएए कायद्याची नाही’, असे वक्तव्य देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले होते. त्याचा ‘योग्य’ तो परिणाम धर्मांध आणि घुसखोर यांच्यावर झाला. आता पुढील ५ वर्षे देहलीत आपचे राज्य असेल. राष्ट्रघातक्यांना पाठिंबा देणारा आणि देशहितार्थ कायद्याला विरोध करणार्‍या या पक्षाच्या हाती देशाच्या राजधानीची सूत्रे असणे, हे अतिशय गंभीर आहे. केरळ आणि बंगाल या राज्यांमध्ये धर्मांधांच्या कारवाया हाताबाहेर गेल्या आहेत. त्याला अनुक्रमे तेथील साम्यवादी सरकार आणि तृणमूल काँग्रेस उत्तरदायी आहे. देहलीतही काही वर्षांत अशी स्थिती झाल्यास आश्‍चर्य वाटणार नाही.

राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात !

आपचा विजय हा निर्भेळ नाही. त्याला अनेक कंगोरे आहेत. असे असले, तरी भाजपच्या पराभवाचेही विश्‍लेषण करणे अपरिहार्य आहे. भाजपला भविष्यात देहली सर करायची असेल, तर प्रथम पक्षाला स्थानिक नेतृत्व सिद्ध करावे लागेल. आतापर्यंत भाजप ज्या राज्यांमध्ये जिंकला, त्या राज्यांमधील स्थानिक नेतृत्व बळकट होते. राजस्थान किंवा मध्यप्रदेश येथील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवाला तेथील सक्षम नसलेले आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेले स्थानिक नेतृत्वही उत्तरदायी आहे. भाजपमध्ये अजूनही हुकुमी एक्का म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहिले जाते. हे कुठे तरी थांबायला हवे. यातून भाजपने धडा घेऊन एकट्या मोदी यांच्यावर अवलंबून न राहता राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरांवर गुणवान नेतृत्व असणार्‍या राजकारण्यांची फळी निर्माण करणे आवश्यक आहे. स्थानिकांच्या संपर्कात असणारा, त्यांच्या समस्या सोडवणारा नेता नेहमीच लोकांना भावतो. असे सक्षम नेतृत्व भाजपने ठिकठिकाणी सिद्ध करणे आवश्यक आहे.

लोकशाहीत जनता ही केंद्रस्थानी असते. जनतेला भावणारा पक्ष सत्तास्थानी येतो. असे जरी असले, तरी आप ज्यांच्या जिवावर निवडून आला आहे, त्यांतील अनेकांच्या राष्ट्रीय निष्ठेविषयी राष्ट्रप्रेमींच्या मनात साशंकता आहे. त्यामुळे देहलीचे भविष्य काय असेल, हे येणारा काळच सांगले. ‘जेव्हा विकास कि राष्ट्रीय सुरक्षा’, असा प्रश्‍न समोर येतो, तेव्हा स्वाभाविक प्राधान्य हे राष्ट्रीय सुरक्षेलाच द्यावे लागते. या दृष्टीकोनातून आपचा विजय हा राष्ट्रप्रेमींना रूचणारा नाही !