हिंगणघाट येथील जळीतकांडातील पीडितेचा रुग्णालयात मृत्यू

दारोडा ग्रामस्थांकडून ‘रस्ता बंद’ आंदोलन करून आरोपीला कह्यात देण्याची मागणी

हिंंगणघाट (जिल्हा वर्धा) – ७ दिवसांपूर्वी पेट्रोल ओतून जाळण्यात आलेल्या हिंगणघाट येथील महाविद्यालयीन शिक्षिकेचा १० फेब्रुवारीला सकाळी ६.५५ वाजता मृत्यू झाला. नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात तिच्यावर उपचार चालू होते. ३ फेब्रुवारी या दिवशी आरोपी विकी नागराळे याने तिच्यावर पेट्रोल ओतून तिला पेटवले होते. यामध्ये ती ३५ ते ४० टक्के भाजली होती. पीडित तरुणी दारोडा गावची रहिवासी होती. संतप्त दारोडा ग्रामस्थांनी जुना नागपूर-हैद्राबाद महामार्ग रोखून धरला आणि आरोपीला त्यांच्या कह्यात देण्याची मागणी केली. पीडितेचा मृतदेह हिंगणघाट येथून तिच्या गावी नेतांना लोकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्येत गर्दी केली होती. पीडितेच्या अंत्ययात्रेला सहस्रो लोक उपस्थित होते. अत्यंत शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

संतप्त ग्रामस्थांकडून पोलिसांवर दगडफेक

पीडितेचा मृतदेह हिंगणघाट येथून दारोडा गावात आणल्यावर संतप्त ग्रामस्थांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. या वेळी पीडितेला आणलेल्या रुग्णवाहिकेचीही ग्रामस्थांनी तोडफोड केली. त्यामुळे पोलीस आणि ग्रामस्थ यांच्यात काही काळ धुमश्‍चक्री उडाली. ‘आरोपीला आमच्या कह्यात द्या’, अशी भूमिका या ठिकाणी ग्रामस्थांनी घेतली होती.

पीडितेच्या घराबाहेर शेकडो ग्रामस्थ जमा झाले होते आणि पीडितेच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावात तणावपूर्ण वातावरण होते. ‘मुलीला जसे जाळून मारण्यात आले, तसेच आरोपीचे करावे अथवा त्याला तात्काळ फाशी द्यावी’, अशी प्रतिक्रिया येथे उपस्थित ग्रामस्थांनी प्रसारमाध्यमांकडे व्यक्त केली.

असे कृत्य करण्याचे कोणाचे धाडस होणार नाही, असा कायदा करू ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हिंगणघाटसारखे कृत्य करण्याचे कोणाचे धाडस होणार नाही, असा कायदा करू, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी सांगितले. या वेळी त्यांनी ‘लोकांनी संयम बाळगावा’, असे आवाहन केले.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘पीडितच्या खटल्याची सुनावणी जलदगती न्यायालयात करण्यात येईल आणि अधिवक्ता उज्ज्वल निकम हा खटला लढवतील. पीडितेच्या भावाला सरकारी नोकरी देण्यात येईल’, असे सांगितले.