नवी मुंबईत झोपडपट्टी पुनर्विकास योजना लागू करणार ! – एकनाथ शिंदे, नगरविकासमंत्री

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे

नवी मुंबई, १० फेब्रुवारी (वार्ता.) – ठाणे शहराच्या धर्तीवर नवी मुंबईतील झोपडपट्ट्यांचा विकास करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्विकास योजना लागू करण्यात येणार आहे, अशी घोषणा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुर्भे येथे केली. तुर्भे स्टोअर्स येथे शिवप्रेरणा मंडळाचे महेश कुलकर्णी यांच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात तेे बोलत होते. या वेळी खासदार राजन विचारे, भाजपचे नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

शहरातील क्षेपणभूमी आणि उड्डाणपूल यांचे प्रश्‍न सुटले नसल्याने या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे; मात्र आता राज्यात महाआघाडीचे सरकार आल्याने नवी मुंबईतील सर्व विकासकामे होतील, असा विश्‍वास शिंदे यांनी व्यक्त केला.

सुरेश कुलकर्णी म्हणाले की, तुर्भे येथील क्षेपणभूमीचा प्रश्‍न उग्र झाला आहे. या क्षेपणभूमीजवळच शाळा असल्याने तेथील मुलांना नाकाला रूमाल बांधून शिक्षण घ्यावे लागत आहे. याची पालकमंत्र्यांनी नोंद घेऊन येथील क्षेपणभूमी लवकर हटवण्यात यावी. तुर्भे रेल्वे स्थानक ते तुर्भे स्टोअर असा पादचारी पूल नसल्याने ठाणे-बेलापूर रस्ता ओलांडतांना गेल्या काही वर्षांमध्ये १५ हून अधिक नागरिकांचा मृत्यू आणि ५० हून अधिक नागरिक गंभीर घायाळ झाले आहेत. त्यामुळे हा पूल लवकरात लवकर करण्यात यावा. येथील झोपडपट्टीत राहणार्‍या लोकांना झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू करून त्यांना इमारतीमध्ये हक्काचे घर मिळावे, अशी मागणी कुलकर्णी यांनी या वेळी केली.