मरेपर्यंत हिंदुत्व आणि भगवा सोडणार नाही ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मुंबई – काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांसमवेत सरकार स्थापन केल्याने शिवसेनेने हिंदुत्व सोडले, असे काही जण म्हणत आहेत. शिवसेनेने पक्षाचा झेंडा पालटलेला नाही. एक माणूस आणि एक झेंडा कायम आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व काय आहे, हे जगाला माहिती आहे. मला माझे हिंदुत्व सिद्ध करण्याची आवश्यकता नाही; कारण ते बाळासाहेब यांचे हिंदुत्व आहे. काही जण शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याची टीका करत असले तरी भगवा आणि हिंदुत्व मरेपर्यंत सोडणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी यांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे ९ फेब्रुवारी या दिवशी शिवसेना आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.