‘शिकारा’ची शिकार !

संपादकीय

काश्मिरी हिंदूंनी भोगलेल्या अत्याचारांना वाचा फोडणारा ‘शिकारा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि तो पाहिल्यावर हिंदूंचा हिरमोड झाला. हिंदूंनी त्याविषयीच्या भावना सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे अथवा चित्रपटाचे निर्माते विधु विनोद चोप्रा यांना प्रत्यक्ष भेटून व्यक्त केल्या आहेत. १९९० च्या दशकात धर्मांधांनी हिंदूंच्या केलेल्या वंशविच्छेदामुळे लाखो काश्मिरी हिंदूंना त्यांचे घर सोडावे लागले. त्या वेळी हिंदूंनी जे अत्याचार भोगले, ते ऐकले, तरी अंगावर काटा येतो. इतक्या वर्षांत त्यांनी जे काही भोगले, ते सत्य दडपण्याचाच प्रयत्न अधिक झाला. या आधी निष्पाप हिंदूंना ‘खलनायक’, ‘असहिष्णु’, ‘धर्मांध’ किंवा ‘दंगलखोर’ दाखवणारे अनेक चित्रपट आले; मात्र हिंदूंनी जे काही भोगले किंवा त्यांना न्याय देणारे चित्रपट तसे विरळच. त्यामुळेच ‘शिकारा’ प्रदर्शित होणार; म्हणून या चित्रपटाविषयी हिंदूंमध्ये उत्सुकता होती; मात्र त्यावर पाणी फिरले. या चित्रपटात धर्मांधांनी जे हिंदूंवर अत्याचार केले आहेत, त्यावर वस्तूनिष्ठ चित्रांकन केलेले नाही, तसेच चित्रपटाच्या शेवटी मेहबूबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला या राष्ट्रघातकी नेत्यांचे आभार मानले आहेत, असे सांगण्यात येत आहे. हे हिंदू कदापि सहन करणार नाहीत; कारण त्या वेळी झालेल्या नरसंहाराला या दोन्ही नेत्यांचे वडील आणि ते कार्यरत असणारे पक्ष उत्तरदायी आहेत. त्यामुळे हा एकप्रकारे हिंदूंच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.

मागील १ सहस्र वर्षांहून अधिक काळ हिंदूंनी अन्याय सहन केला; मात्र तोे समोर आणण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत, हे वास्तव आहे. याला हिंदूंची सर्वधर्मसमभावी मानसिकता कारणीभूत आहे. आताही चित्रपटाचे निर्माते विधु विनोद चोप्रा यांनी चित्रपटाविषयी स्पष्टीकरण देतांना ‘हा चित्रपट माहितीपट नसून प्रेमकथा आहे’, असे वक्तव्य केले आहे. व्यावसायिक हेतूसाठी चित्रपट करतांना ‘मसाला’ घालावा लागतो, हे समजून घेण्यासारखे आहे; मात्र त्या चौकटीत राहूनही वस्तूनिष्ठ चित्रीकरण करणे दिग्दर्शक किंवा निर्माते यांना का जमत नाही ? धर्मांधांची धर्मांधता लोकांच्या समोर आणली, तर ‘त्यांना वाईट वाटेल’, ‘सामाजिक सलोखा बिघडेल’, अशी खुळचट कारणे सांगितली जातात. हिंदूंच्या याच वृत्तीमुळे ‘आम्ही काहीही केले, तरी ते खपून जाणार’, हे धर्मांधांना ठाऊक असल्यामुळे ते अधिकाधिक हिंसाचार करण्यास धजावतात, हे लक्षात घ्या. विधु विनोद चोप्रा यांना हे ठाऊक नाही, असे नाही; पण त्यांच्यातील सद्गुण विकृतीमुळे त्यांच्याकडून कृती होत नाही आणि स्वतः घेतलेल्या चुकीच्या भूमिकेविषयी त्यांना शल्यही वाटत नाही, हे दुर्दैवी आहे. त्याही पुढे जाऊन बॉलीवूडध्ये एकाही चित्रपट दिग्दर्शकाला किंवा निर्मात्याला हिंदूंवर झालेल्या अत्याचारांवर आधारित चित्रपट बनवावासा वाटत नाही, यासारखे दुर्दैव ते कोणते ? ही स्थिती हिंदूंना विचार करायला लावणारी आहे. गंभीर विषयावर केवळ मनोरंजनासाठी चित्रपट बनवून स्वतःची तुंबडी भरणार्‍यांच्या किती आहारी जायचे, हे हिंदूंना आता ठरवावे लागेल.