(म्हणे) ‘आळंदीत घाण करणारे लोक पाकिस्तानातून येतात का ?’

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे अशोभनीय आणि संतापजनक वक्तव्य

असभ्य भाषेत बोलणारे आमदार जनतेसमोर काय आदर्श ठेवणार ? पवित्र नदी मृतप्राय झाल्याचे खापर नागरिकांवर फोडण्यापेक्षा नदीत मिसळले जाणारे कारखान्यांचे रासायनिक पाणी रोखण्यात काय अपयश आले, याचे चिंतन लोकप्रतिनिधींनी करायला हवे. ते केले नाही आणि अशोभनीय भाषेत इतरांनाच समादेश (सल्ले) दिले, तर असे लोकप्रतिनिधी महाराष्ट्राचे कि पाकिस्तानचे असा प्रश्‍न लोकांना पडेल !

आळंदी (जिल्हा पुणे) – स्वच्छतेचे दायित्व आपल्या सगळ्यांचे आहे. आळंदीत घाण करायला पाकिस्तानातून लोक येतात का ? वारकरी संप्रदायाने स्वच्छता मोहिमेत लक्ष घालावे. ते सर्वांचे कर्तव्य आहे. शिस्तीचे पालन सर्वांनी करायलाच हवे. येथे मोठी मोठी शौचालये आहे. त्यांची दूरावस्था झाली आहे. इंद्रायणी नदी स्वच्छ करणे आपलेच दायित्व आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी एका कार्यक्रमात केले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेही उपस्थित होते.

आमदारांच्या या वक्तव्यावर उपस्थितांनी अप्रसन्नता दर्शवत भाषण चालू असतांना त्यांना टोकले. तेव्हा ‘केवळ आळंदीकरच नाही, तर देहू आणि पिंपरी येथील नागरिकही इंद्रायणी नदी अस्वच्छ करतात’, असे म्हणत त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.