क्रियायोग आंतरराष्ट्रीय संस्थानचे परमहंस प्रज्ञानानंद यांचे हिंदु जनजागृती समितीच्या कार्यास शुभाशीर्वाद

हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ यांचा ओडिशा संपर्क दौरा

डावीकडून पू. निलेश सिंगबाळ आणि क्रियायोग आंतरराष्ट्रीय संस्थानचे परमहंस प्रज्ञानानंद

 राऊरकेला (ओडिशा) – क्रियायोग आंतरराष्ट्रीय संस्थानचे परमहंस प्रज्ञानानंद यांची हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ यांनी २२ जानेवारीला पुरी नजीकच्या बालेघाई येथील क्रियायोग आश्रमात भेट घेतली. या प्रसंगी त्यांनी समितीच्या राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यास शुभाशीर्वाद दिले. या वेळी समितीचे ओडिशा राज्य समन्वयक श्री. प्रकाश मालोंडकर आणि श्री. प्रेमप्रकाश कुमार हेही उपस्थित होते.

पू. नीलेश सिंगबाळ यांनी परमहंस प्रज्ञानानंद यांना समितीचे कार्य, हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी करण्यात येत असलेले प्रयत्न आणि महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे कार्य यांविषयी माहिती दिली. या वेळी त्यांनी अध्यात्म विश्‍वविद्यालयाकडून अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने करण्यात येत असलेले आध्यात्मिक संशोधन आणि शोधप्रकल्प यांविषयीही चर्चा केली. या प्रसंगी पू. नीलेश सिंगबाळ यांनी परमहंस प्रज्ञानानंद यांना सनातन संस्थेने प्रकाशित केलेला ‘गोसंवर्धन’ ग्रंथ आणि पाक्षिक ‘सनातन प्रभात’ भेट म्हणून देण्यात आला.

या वेळी पू. नीलेश सिंगबाळ आणि त्यांच्यासमवेत असलेल्या समितीच्या कार्यकर्त्यांना क्रियायोग आंतरराष्ट्रीय संस्थानचा आश्रम दाखवण्यात आला. आश्रम दाखवणार्‍या साधकांनी पू. नीलेश सिंगबाळ आणि अन्य कार्यकर्ते यांच्याकडून गायींना चारा खायला देऊन गोसेवा करवून घेतली. भेटीच्या अखेरीस परमहंस प्रज्ञानानंद यांनी पू. नीलेश सिंगबाळ यांसह अन्य कार्यकर्त्यांना आलिंगन देऊन प्रेमाने निरोप दिला.

परमहंस प्रज्ञानानंद यांची विनम्रता

१. पू. नीलेश सिंगबाळ यांनी परमहंस प्रज्ञानानंद यांना ‘गोवा येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला आपले चरणस्पर्श व्हावेत’, अशी प्रार्थना केली. त्या वेळी त्यांनी विनम्रतेने आणि सहजतेने सांगितले की, माझे चरणस्पर्श व्हावेत, यासाठी नाही, तर मलाच आश्रमातील चैतन्याचा लाभ मिळेल; म्हणून मी येणार आहे.

२. पू. निलेश सिंगबाळ यांनी परमहंस प्रज्ञानानंद यांना ‘धर्म आणि राष्ट्र यांच्या रक्षणाचे कार्य आपल्यासारख्या संतांच्या आशीर्वादाने होणार आहे, म्हणून तुमचे आशीर्वाद असावेत’, अशी प्रार्थना केली. त्यावर त्यांनी सांगितले की, राष्ट्र आणि धर्म रक्षण करण्यासाठी प्रयत्न करणारा प्रत्येक जणच संत आहे. तुम्ही सर्वजणही संतच आहात. ईश्‍वराच्या कृपेमुळे राष्ट्र आणि धर्मकार्य होणारच आहे. त्यासाठी मीसुद्धा प्रतिदिन प्रार्थना करतो.

परमहंस प्रज्ञानानंद यांचा अल्प परिचय

परमहंस प्रज्ञानानंद क्रियायोग आंतरराष्ट्रीय संस्थानचे वर्तमान प्रणेता आहेत. त्यांचे गुरु परमहंस हरिहरानंदजी यांनी संस्थानचा पाया रचत विश्‍वभर क्रियायोग ज्ञानाचा प्रसार केला. ज्याच्या मनामध्ये हे प्राचीन गुप्त आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा आहे, अशा प्रत्येक जनसामान्यापर्यंत ज्ञान पोचवण्याचे अविरत प्रयत्न परमहंस प्रज्ञानानंद करत आहेत.

परमहंस प्रज्ञानानंद यांचा जन्म ओडिशामधील बेलतल या गावात वर्ष १९६० मध्ये झाला. बालपणापासून प्रार्थना आणि युवावस्थेत ध्यान यांमध्ये रुची राखणार्‍या प्रज्ञानानंद यांनी उच्च शिक्षण प्राप्त करून अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काही काळ चाकरी केली. त्या काळात ते अनेक विद्यार्थ्यांसाठी आध्यात्मिक प्रेरणास्त्रोत बनले. ईश्‍वरप्राप्तीच्या असीम तळमळीमुळे त्यांच्या महाविद्यालयीन काळात ते अनेक हिमालयीन संत आणि आश्रम यांच्या संपर्कात आले. वर्ष १९८० मध्ये त्यांची भेट परमहंस हरिहरानंदजी यांच्याशी झाली. त्यांनी प्रज्ञानानंद यांना क्रियायोगाची दिक्षा दिली आणि वर्ष १९९८ मध्ये त्यांना ‘परमहंस’ उपाधीने सन्मानित करण्यात आले. संस्थानचे संपूर्ण विश्‍वभर अनेक आश्रम असून देशविदेशातील अनेक क्षेत्रातील उच्चशिक्षाविभूषित मान्यवर तथा सर्वसामान्य व्यक्ती त्यांचे साधक आहेत. गोसंवर्धन आणि गोरक्षा या क्षेत्रातही त्यांचे सातत्याने कार्य चालू आहे. बालेघाई येथे निसर्गरम्य समुद्रकिनारी १०० एकरपेक्षा जास्त क्षेत्रात त्यांचा क्रियायोग आश्रम आहे. परमहंस प्रज्ञानानंद आश्रमाच्या परिसरात सायकलवर अतिशय साधेपणाने आणि सहजपणे भ्रमण करतात.