मी विठ्ठलाच्या दर्शनाला पहाटे ४ वाजता जातो ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या पत्रकाचा परिणाम !

शरद पवार यांची जोग महाराज पुण्यतिथीला उपस्थिती

आळंदी (पुणे) – मी विठ्ठलाच्या दर्शनाला पहाटे ४ वाजता जातो; पण राजकारणाच्या प्रसिद्धीसाठी जात नाही. आळंदी, देहू येथे जाण्यासाठी कोणाची अनुमती घेण्याची आवश्यकता नाही. कोणी सांगितले की, अनुमती नाही, तर त्यांना वारकरी संप्रदायाचा विचार समजला नाही. अशा लहानसहान गोष्टी होतात. त्याकडे दुर्लक्ष करायचे असते, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. ते सद्गुरु जोग महाराज पुण्यतिथी सोहळ्याला उपस्थित वारकर्‍यांना संबोधित करत होते. त्या वेळी त्यांनी वरील स्पष्टीकरण दिले. ‘सद्गुरु जोग महाराज यांच्या पुण्यतिथी शताब्दी महोत्सवानिमित्त अशा नास्तिकतावादी विचाराला प्रोत्साहन देणार्‍या शासनकर्त्यांना निमंत्रित करणे, हे दुर्दैवी आणि संतापजनक आहे’, असे परखड मत राष्ट्रीय वारकरी परिषदेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले होते. या पार्श्‍वभूमीवर तेथे उपस्थित राहून त्यांनी वरील मत व्यक्त केले.

या वेळी पू. सोनोपंत दांडेकरमामा पूर्वी येत असलेल्या मारुतीच्या देवळाचा जीर्णोद्धार केल्याचा दाखलाही त्यांनी दिला. ते शेगावला जात असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. ‘वारकर्‍यांच्या असलेल्या बांधिलकीमुळे संतपरंपरेच्या विचाराला अनेक आक्रमणे होऊनही कोणतीही शक्ती थोपवू शकली नाही’, असेही ते या वेळी म्हणाले. या वेळी शरद पवार यांनी कपाळाला टिळाही लावला होता.

‘इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेची वारकर्‍यांनी केलेली मागणी ही समाजाच्या हिताची असल्याने ती पूर्ण करणे माझे कर्तव्य आहे. या संदर्भात संबंधित मंत्र्यांची बैठक घेऊन त्यांना तशी विनंती करीन’, असे आश्‍वासन त्यांनी या वेळी वारकर्‍यांना दिले.