…तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू ! – अशोक चव्हाण यांची चेतावणी

नांदेड – महाराष्ट्रात ३ पक्षांचे आणि ३ विचारांचे सरकार चालणार कसे ?, असा प्रश्‍न करत काँग्रेस नेत्या श्रीमती सोनिया गांधी यांनी ३ पक्षांच्या सरकारला (महाविकास आघाडी) विरोध केला होता; परंतु आम्ही श्रीमती सोनिया गांधी यांचे मन वळवून त्यांची संमती घेतली. ‘घटनाबाह्य काम करणार नाही’, असे शिवसेनेकडून लिहून घेतले. शिवसेनेने जर उद्देशाच्या बाहेर काम केले, तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू, अशी चेतावणी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी येथे दिली. ते २६ जानेवारीच्या ‘प्रजासत्ताकदिना’च्या कार्यक्रमात बोलत होते.

ते पुढे म्हणाले, ‘तीन विचारांच्या पक्षाचे सरकार चालणार कसे’, या प्रश्‍नावर आम्ही म्हणतो, ‘घटनेच्या आधारावर आपले सरकार चालले पाहिजे’, ही आमची भूमिका आहे. संविधानाच्या चौकटीत राहून हे सरकार चालले पाहिजे. जर असे न झाल्यास सरकारमधून बाहेर पडण्याच्या कडक सूचना श्रीमती सोनिया गांधी यांनी दिल्या आहेत. याची संपूर्ण माहिती आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली आहे. त्यामुळे ‘घटनेच्या बाहेर जाणार नाही’, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. या कारणास्तव आमचे सरकार व्यवस्थित चालू आहे.