‘आंदोलन आतंकवादा’च्या माध्यमातून देश अस्थिर करण्याचा प्रयत्न ! – (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

पुणे, २३ जानेवारी (वार्ता.) – देशात सध्या राष्ट्रप्रेमींना नाही, तर राष्ट्रद्रोहींना महत्त्व आले आहे. अनेक कार्यकर्ते आणि स्वयंसेवी संस्था चुकीची कामे करत आहेत. सध्या ‘आंदोलन आतंकवाद’ नावाचा नवा प्रकार आला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने हिंसक आंदोलने होत आहेत. त्याद्वारे सार्वजनिक संपत्तीची हानी केली जाते. बसगाड्या फोडल्या, पेटवल्या जातात. जी हानी शत्रूराष्ट्र थेट करू शकत नाही, ती हानी या माध्यमातून केली जाते. ‘आंदोलन आतंकवादा’च्या माध्यमातून देश अस्थिर करण्याचा प्रयत्न होत आहे. आंदोलनकर्त्यांकडून या हानीची भरपाई केली पाहिजे, असे मत (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केले. संशोधन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने २२ जानेवारी या दिवशी एस्.एम्. जोशी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन यांनी मांडलेली सूत्रे

१. आक्रमक परराष्ट्र धोरणामुळे आंतरराष्ट्रीय पटलावर भारताला यश मिळाले आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, परराष्ट्र खात्याचे मंत्री विविध देशांचे दौरे करत आहेत; पण याला अपेक्षित प्रसिद्धी दिली जात नाही. वाहिन्यांवरील चर्चांमध्ये पाकप्रेमी तज्ञ समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. ‘पाकिस्तानकडे अणूबॉम्ब असल्याने भारताने पाकिस्तानविरोधात काही कृती करायला नको’, अशी भूमिका भारताचेच विचारवंत म्हणवले जाणारे लोक घेतात, हे दुर्दैवी आहे. ‘या देशाला भवितव्य नाही’, असे चित्र सध्या माध्यमांमधून रंगवले जाते. निराशेचे वातावरण निर्माण केले जाते; पण प्रत्यक्षात वस्तूस्थिती तशी नाही.

२. पोलीस आणि अर्धसैनिकदल नक्षलवादाच्या विरोधात जेवढे आक्रमक व्हायला हवेत, तेवढे होत नाहीत. गेल्या ५ वर्षांत नक्षलवाद्यांचे प्रभावक्षेत्र अल्प झाले आहे.

३. ‘बाहेरचा शत्रू ज्यांना आतून साहाय्य मिळते, आतील शत्रू ज्यांना बाहेरून साहाय्य मिळते, बाहेरचा शत्रू ज्यांना बाहेरून साहाय्य मिळते आणि आतील शत्रू ज्यांना आतून साहाय्य मिळते, असे शत्रूंचे चार प्रकार चाणक्यांनी युद्धनीतीमध्ये सांगितले आहेत. आतील शत्रू ज्यांना आतून साहाय्य मिळते, हे महाभयंकर आहेत’, असे त्यांनी म्हटले आहे. मध्यंतरी नांदेडमधून पोलिसांनी रोहिंग्या मुसलमानाला पकडले होते. त्याला ३२-३३ लोकांनी साहाय्य केले होते. आतंकवाद्यापेक्षाही त्याला साहाय्य करणारे लोक अधिक घातक आहेत.