‘…मग राहुल गांधीनाच प्रथम अंदमान येथील कारागृहात पाठवावे लागेल !’ – रणजीत सावरकर आणि विनोद तावडे यांच्याकडून संजय राऊत यांचे समर्थन

मुंबई – स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यास विरोध करणार्‍यांना २ दिवसांसाठी अंदमान येथील कारागृहात डांबायला हवे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचे भाजपचे नेते विनोद तावडे आणि सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी स्वागत केले आहे. ‘खासदार राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचे मी स्वागत करत असून राऊत यांनी म्हटल्याप्रमाणे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनाच अंदमानातील कारागृहात पाठवावे लागेल’, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते विनोद तावडे यांनी व्यक्त केली आहे.

संजय राऊत यांचे वक्तव्य योग्य आहे ! – रणजीत सावरकर

संजय राऊत यांचे वक्तव्य योग्य आहे. खरेतर राऊत यांनी राहुल गांधी यांनाच सल्ला दिला आहे; कारण राहुल गांधी जे काही बोलतात, त्याचीच ‘री’ काँग्रेसचे इतर नेते आणि कार्यकर्ते ओढतात. राऊत यांनी राहुल गांधी यांना अंदमानला पाठवण्याविषयीचे विधान करून धाडस दाखवले आहे. त्यांच्या वक्तव्यातून बरेच काही सूचित होते.