युवकाला परिपूर्ण ज्ञान देणारे संस्कारक्षम आणि जीवन मूल्याधारित शिक्षण मिळण्यासाठी विहिंपचा आग्रह ! – मधुकर दीक्षित, केंद्रीय सचिव, विहिंप

पन्हाळा (जिल्हा कोल्हापूर), १५ जानेवारी (वार्ता.) – सध्याच्या माहिती विस्फोटाच्या युगात प्रत्येक युवकाला परिपूर्ण ज्ञान देणारे संस्कारक्षम आणि जीवन मूल्याधारित शिक्षण द्यावे अन् भविष्यात त्याची व्याप्ती वाढवावी, यांसाठी विश्‍व हिंदु परिषदेचा भविष्यात आग्रह राहील. याचसमवेत विविध सेवा कार्यातून समाजात सुसंवाद वाढीस लागावा, यासाठी विहिंप सक्रीय राहील, अशी माहिती विहिंपचे केंद्रीय सचिव सेवा विभाग श्री. मधुकर दीक्षित यांनी पत्रकारांना दिली. दोन दिवस झालेल्या पश्‍चिम महाराष्ट्र बैठकीचा आढावाही त्यांनी या वेळी विषद केला. त्यांच्यासमवेत जिल्हामंत्री अधिवक्ता रणजितसिंह घाटगे यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. मधुकर दीक्षित पुढे म्हणाले की, विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल हे बहुचर्चित समीकरण असले, तरीही मातृशक्ती, दुर्गावाहिनी, गोशाळा-गोरक्षा-प्रकल्प,  सत्संग यांसह अन्य असे १८ प्रकारची सेवा कार्य चालतात. या संदर्भाने या विभागातील २२ जिल्ह्यांतील पदाधिकारी आणि याचे विविध प्रकल्प प्रमुख यांची या दोन दिवसांत सविस्तर चर्चा झाली. या वेळी विहिंपच्या केंद्रीय कार्यकारिणीने केलेले दोन ठराव पुन्हा एकदा मांडून ते व्यापक चर्चेसह सहमत करण्यात आले. यात तिरुपती बालाजीसह हिंदूंच्या देवस्थानांच्या व्यवस्थापनात ख्रिश्‍चनांसह अन्य धर्मियांना प्रवेश देऊ नये, केरळ सरकारच्या नियोजित मौलवी आणि फादर यांच्या मानधनास विरोध करणे यांसाठी व्यापक जागरण करण्याचे ठरले. या बैठकीस पश्‍चिम महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांतील २३४ प्रतिनिधी उपस्थित होते.