बांगलादेशातील उच्च न्यायालयाने श्री सरस्वतीदेवीच्या पूजेचे विसर्जन करण्यासाठी नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची याचिका फेटाळली

शेकडो हिंदु विद्यार्थ्यांकडून ढाक्यामध्ये निदर्शने चालू !

भारतात अल्पसंख्यांकांचे सण वगैरे पाहून निवडणुका घेण्यासाठी निधर्मी राजकारणी निवडणूक आयोगावर दबाव टाकतात. याउलट बांगलादेशात अल्पसंख्यांक असणार्‍या हिंदूंच्या मागण्यांकडे लक्ष दिले जात नाही आणि तेथील इस्लामी राजकारणीही याकडे लक्ष देत नाहीत. यावरून भारतातील कथित ‘निधर्मी’ लोकप्रतिनिधी काही बोध घेतील का ?

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशमध्ये वसंत पंचमीनिमित्त श्री सरस्वतीदेवीची पूजा केली जाते. येत्या ३० जानेवारीला या पूजेचे विसर्जन करण्यात येणार आहे आणि त्या दिवशी येथील २ नगरपालिकांच्या निवडणुकाही आहेत. त्यामुळे विसर्जनाच्या निमित्ताने निवडणुका पुढे ढकलाव्यात, यासाठी येथील उच्च न्यायालयात हिंदूंच्या संघटनांनी प्रविष्ट केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. यानंतर ढाका विश्‍वविद्यालयातील शेकडोंच्या संख्येने हिंदु विद्यार्थ्यांनी शाहबाग भागात रस्त्यावर उतरून निदर्शने चालू केली. याविषयी विश्‍वविद्यालयाच्या ‘जगन्नाथ हॉल विद्यार्थी संघा’चे उपाध्यक्ष उत्पल विश्‍वास यांनी सांगितले की, जर निवडणूक आयोग १५ जानेवारीला दुपारी १२ पर्यंत आमची मागणी मान्य करणार नसेल, तर आम्ही आयोगाला घेराव घालू. या चेतावणीनंतरही आयोगाने याची नोंद न घेतल्याने १५ जानेवारीला विद्यार्थी संघाकडून येथे आंदोलन चालू होते.

१. याचिकाकर्ता अधिवक्ता अशोककुमार घोष यांनी म्हटले की, आम्ही उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे दुःखी आहोत. आम्ही याला आव्हान देणार आहोत.

२. बांगलादेश निवडणूक आयोगाने २२ डिसेंबरलाच या निवडणुकीची घोषणा केली होती आणि त्यानंतर लगेचच हिंदूंच्या संघटनांनी २९ जानेवारीला सरस्वती पूजा आणि ३० जानेवारीला विसर्जन असल्याने त्याला विरोध चालू केला होता. त्यानंतर सरकारने शाळांना

२९ जानेवारीला सुटी घोषित केल्यावर ही मागणी अजून जोर धरू लागली; मात्र आयोगाने ही मागणी फेटाळल्यावर त्या विरोधात न्यायालयात याचिका करण्यात आली आणि न्यायालयाने ती आता फेटाळून लावली.