चीनने आक्रमण केल्यास त्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील ! – तैवानच्या राष्ट्राध्यक्षांची चेतावणी

भारताच्या तुलनेत सर्वच पातळ्यांवर अगदी नगण्य असणार्‍या देशाचे राष्ट्राध्यक्ष चीनला चेतावणी देऊ शकतात यातून भारताला बरेच काही शिकण्यासारखे आहे !

तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई ईंग वेन (डावीकड़े)

तैपेई (तैवान) – चीनने तैवानविषयीच्या कठोर धोरणांचा फेरविचार करावा. तैवान एक स्वतंत्र देश आहे. चीनने तैवानवर आक्रमण केले, तर त्याला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी चेतावणी तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई ईंग वेन यांनी दिली आहे. त्साई ईंग वेन यांनी सलग दुसर्‍यांदा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे.

तैवान हा स्वतःचा भूभाग असल्याचा चीनचा दावा आहे. चीनने त्साई ईंग वेन यांचा पराभव कसा होईल, ते पाहिले होते; कारण त्साई आणि त्यांचा पक्ष तैवानला चीनचा भाग मानत नाही. त्यांच्या दृष्टीने तैवान एक स्वतंत्र ओळख असलेला देश आहे. तैवानने स्वतःला स्वतंत्र देश घोषित केले, तर सैन्य कारवाई करण्याचाही चीनचा डाव असल्याचे म्हटले जाते. त्साई याविषयी म्हणाल्या की, अधिकृतरित्या तैवानला स्वतंत्र देश घोषित करण्याची आवश्यकता नाही; कारण तैवानचे कामकाज स्वतंत्र देशासारखेच चालते.