(म्हणे) ‘रामदासस्वामी शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते !’ – शरद पवार

अनेक इतिहासतज्ञ आणि संशोधक यांनी समर्थ रामदासस्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु असल्याचे सोदाहरण अनेकदा सांगितले आहे. असे असतांना मूळ प्रश्‍नाला बगल देऊन वितंडवाद निर्माण करणारे विधान करून समाजात दूही माजवण्याचा हा प्रकार आहे, असे शिवप्रेमींना वाटल्यास चूक ते काय ?

सातारा – मला ‘जाणता राजा म्हणा’ असे मी कोठेही, कोणालाही म्हटलेले नाही. (पण लोक म्हणत असतांना त्यांना थांबवलेही नाही, म्हणजेच मूकसंमती दिली, हेच यातून लक्षात येते ! – संपादक) छत्रपती यांची उपाधी ‘शिवछत्रपती’ होती, ‘जाणता राजा’ हे बिरुद रामदासस्वामींनी शिवरायांना दिले आणि मी हेही सांगतो की, रामदासस्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते, तर त्यांच्या गुरु राजमाता जिजाऊ होत्या. ‘शिवरायांचे व्यक्तिमत्त्व जिजाऊंनी घडवले आहे’, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा येथील सभेत केले. (‘शिवरायांचे व्यक्तीमत्त्व जिजाऊंनी घडवले आहे’, हे जसे सत्य आहे, तसेच समर्थ रामदासस्वामी छत्रपतींचे आध्यात्मिक गुरु होते, याचे अनेक दाखले इतिहासकारांनी दिलेले आहेत ! – संपादक)

भाजपच्या एका नेत्याने प्रकाशित केलेल्या एका पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याने वाद निर्माण झाला आहे. यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज तथा माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी ‘जाणता राजा केवळ छत्रपती शिवाजी महाराज हेच होते’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. या विधानावर पवार यांनी वरील प्रत्युत्तर देतांना त्यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्याविषयीही  विधान करून ‘या प्रकरणाला जातीय रंग दिला जात आहे का ?’, असा प्रश्‍न शिवप्रेमींना पडला आहे.

एखाद्या बिअर बारला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव असेल, तर अशा सर्व गोष्टींवर बंदी घाला ! – आमदार सुधीर मुनगंटीवार, भाजप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आजके शिवाजी : नरेंद्र मोदी’ हे पुस्तक स्वत: लिहिले नव्हते आणि ‘माझी तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करा’, असेही सांगितले नव्हते. मी तर मुख्यमंत्र्यांना असे पत्र पाठवले आहे की, ज्या पुस्तकांत कोणा नेत्याची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली असेल, त्या सर्वच पुस्तकांवर बंदी घाला. एखाद्या बिअर बारला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव असेल, तर अशा सर्व गोष्टींवर बंदी घाला, असे प्रतिपादन माजी अर्थमंत्री तथा भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.