प्रयागराज येथे कुंभस्थपर्वाच्या वेळी सेवा करतांना साधकाला आलेल्या विविध अनुभूती

१० जानेवारीपासून माघमेळ्यास आरंभ झाला आहे. त्यानिमित्ताने…

या वर्षी प्रयागराज येथे १० जानेवारीपासून माघमेळा चालू झाला असून तो ९ फेब्रुवारी २०२० पर्यंत असणार आहे. त्यानिमित्त गेल्या वर्षी प्रयागराज येथे सिंहस्थपर्वाच्या वेळी गवेगाळी, कर्नाटक येथील श्री. ज्ञानेश्‍वर गावडे यांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

१. प्रयागराज येथे कुंभमेळ्याच्या सेवेसाठी गेल्यानंतर पहिल्याच रात्री स्वप्नात गंगामातेला प्रार्थना करणे आणि तिने ‘तुमच्या पाठीशी परात्पर गुरु डॉक्टर, म्हणजे साक्षात् विष्णु असल्याने काळजी करू नकोस’, असे सांगणे

श्री. ज्ञानेश्‍वर गावडे

‘आम्ही रात्री कुंभपर्वामध्ये पोचलो. तेथे मला गंगा, यमुना आणि सरस्वती या तीनही नद्यांचे दर्शन झाले. रात्री झोपल्यावर गंगामातेने मला मांडीवर घेतल्याचे जाणवले. मी तिच्या चरणी प्रार्थना केली, ‘मला पितामह भीष्म यांच्यासारखे बुद्धीमान आणि कट्टर योद्धा बनव. तत्त्वनिष्ठ राहून अधर्माचा नाश करण्यासाठी मला बळ दे. सर्व साधकांना शक्ती दे.’ त्यावर गंगामाता म्हणाली, ‘काळजी करू नकोस. तुमच्या पाठीशी परात्पर गुरु डॉक्टर, म्हणजे साक्षात् विष्णु आहेत. ते साधकांच्या केसालाही धक्का लागू देणार नाहीत.’

२. एकदा रात्री स्वप्नात मोठा यज्ञ चालू असल्याचे दिसून यज्ञातून अनेक देवता बाहेर येत असल्याचे दिसणे

९.१.२०१९ या दिवशी मी दिवसभर आनंदाने सेवा केली. रात्री मी कुंभपर्वामध्ये गंगा नदीच्या किनारी झोपलो होतो. तेव्हा मला स्वप्नात मोठा यज्ञ चालू असल्याचे दिसले. ते यज्ञकुंड ४० x ६० फूट इतके मोठे होते. तेथे ऋषिमुनी मंत्र म्हणत असून सद्गुरु पिंगळेकाका, सद्गुरु (सौ.) बिंदाताई, सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू आणि पू. नीलेशदादा हे चार जण यज्ञात आहुती देत असल्याचे दिसले. त्या यज्ञामधून अनेक देवता बाहेर येत होत्या.

३. पर्वणीला जाण्यापूर्वी

३ अ. पर्वणीला जाण्यापूर्वी ‘सनातनचे नाव देशाच्या कानाकोपर्‍यांत आणि देश-विदेशांमध्ये सर्वत्र पोेचणार’, या विचाराने भावजागृती होणे : १४.१.२०१९ ला रात्री आम्ही दुसर्‍या दिवशी पहाटे पर्वणीला जाण्याची सिद्धता करत होतो. ‘उद्या सनातनचे नाव देशाच्या कानाकोपर्‍यांत आणि देश-विदेशांमध्ये सर्वत्र पोेचणार’, या विचाराने माझी भावजागृती होत होती. प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जादू वाहू लागली आणि आतून आमची तळमळ वाढू लागली. सकाळी ४ वाजता पर्वणीला जाण्याचे नियोजन होतेे; परंतु मला रात्रभर झोपच लागत नव्हती. ‘केव्हा एकदा पर्वणीला जाऊ ?’, हाच विचार मनात होता. सकाळी उठल्यावर आम्ही सिद्ध होऊन परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्राजवळ जाऊन प्रार्थना केली. तेव्हा मला परात्पर गुरुदेवांनी ‘झेंडूची ३ फुले घेऊन जा’, असे सूक्ष्मातून सांगितले. त्याप्रमाणे मी परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्रावरील झेंडूची ३ फुले घेऊन खिशात घातली आणि सहसाधकांसमवेत पर्वणीला निघालो.

३ आ. पोलिसांनी अडवून ‘सर्व मार्ग बंद आहेत’, असे सागणे आणि गंगा, यमुना अन् सरस्वती या तीनही नद्यांंना प्रार्थना करून आध्यात्मिक उपाय केल्यावर पुढील मार्ग मोकळा होणे : पर्वणीला जातांना आम्हाला २ किलोमीटर पर्यंत चारचाकी गाडीने सोडण्यात आले. नंतरचा प्रवास आम्ही चालत करत होतो. तेव्हा आम्हाला पोलिसांनी अडवले आणि ‘सर्व मार्ग बंद आहेत’, असे सांगितले. तेव्हा मी गंगा, यमुना आणि सरस्वती या तीनही नद्यांंना प्रार्थना केली. ‘देवी, आम्ही ५ जण तुझ्या सेवेसाठी येत आहोत. तुम्ही आमचा मार्ग मोकळा करून द्या.’ तेव्हा देवींनी गुरूंना शरण जाण्यास सांगितले. या वेळी प्रार्थना करून गुरुंनी सांगितलेले नामजपादी उपाय केले.

४. पर्वणीला पोचल्यावर

४ अ. परात्पर गुरुमाऊलीने मार्गावर चैतन्य प्रक्षेपित करून मार्ग मोकळा करणे : आम्ही पर्वणीला पोचलो. थोड्याच वेळात पोलीस आणि सैनिक यांची आणखी एक तुकडी आली. त्यांनी आम्हाला चांगल्या तर्‍हेने पुढे सोडले. मी आमच्या समवेत असलेल्या श्री. चेतनदादांना (श्री. चेतन राजहंस यांना) विचारले, ‘‘आपल्याला कुठल्या दिशेला जायचे आहे ? पर्वणी कुठल्या बाजूला आहे?’’ तेव्हा दादांनी मला हात वर करून दिशा दाखवली. मी परात्पर गुरुमाऊलींना शरण जाऊन प्रार्थना केली, ‘परात्पर गुरुदेव, आमचा पुढचा रस्ता मोकळा करा.’ तेव्हा परात्पर गुरुमाऊलीने आमच्या मार्गावर चैतन्य प्रक्षेपित केले. त्या वेळी मला आमच्यापुढे सुदर्शनचक्र फिरत असल्याचे दिसत होते.

४ आ. सनातनचा कापडी फलक पाहून साधू, संत आणि पोलीस यांनी वाकून नमस्कार करणे : आम्ही पर्वणीच्या ठिकाणी पोचल्यावर सनातनचा कापडी फलक (बॅनर) घेऊन उभे राहिलो. सर्व साधू संत सनातनच्या कापडी फलकाला पाहून वाकून नमस्कार करत होते. आम्ही ३ घंटे तो कापडी फलक पकडून उभे राहिलोे. नंतर देवाच्या कृपेने आम्हाला एक काठी आणि दोरी मिळाली. आम्ही त्या काठीला फलक बांधून तो उंच वर धरला. त्यामुळे दूरवर सर्वांना सनातनचा फलक दिसू लागला. सर्व साधू, संत आणि पोलीस त्याला नमस्कार करत होते. अनेक जण त्याचे छायाचित्र काढत होते.

४ इ. परात्पर गुरुदेवांनी सूक्ष्मातून सांगितल्याप्रमाणे सर्वांवर फुलांचा वर्षाव होणे : नंतर मी परात्पर गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली आणि प्रार्थना केली. तेव्हा परात्पर गुरुदेवांनी सांगितले, ‘थोड्या वेळाने तुम्हा सर्वांवर फुलांचा वर्षाव चालू होणार आहे.’ नंतर उत्तरप्रदेश शासनानेे हेलीकॉप्टरमधून ४ – ५ वेळा प्रदक्षिणा घालून गुलाबी रंगाच्या फुलांचा सर्वांवर वर्षाव केला. तेव्हा माझा भाव दाटून आला.

५. गंगास्नान करतांना

५ अ. त्रिवेणी संगमावर स्नानास गेल्यावर ३ कलश मिळणे : आम्ही १२.३० वाजेपर्यंत सेवा केली. आम्हाला चेतनदादांनी ‘तुम्ही त्रिवेणी संगमावर अंघोळ करू शकता’, असा निरोप दिला. त्याप्रमाणे मी आणि माझ्या समवेत असलेले साधक श्री. बुधाप्पा आम्ही आमच्या सेवा आटोपून त्रिवेणी संगमावर स्नानासाठी गेलो. मी सकाळी परात्पर गुरुदेवांनी घेऊन जाण्यास सांगितलेली ३ फुले मी माझ्या समवेत त्रिवेणी संगमामध्ये घेऊन गेलो आणि तिन्ही देवींना (गंगा, यमुना आणि सरस्वती यांना) प्रार्थना करून सांगितले, ‘हे देवींनो, परात्पर गुरुदेवांनी प्रसादरूपी ही ३ फुले पाठवून दिली आहेत. त्यांचा स्वीकार करा आणि आम्हा सर्व साधकांचे अंतर्मन अन् बाह्यमन यांची शुद्धी करा.’ प्रार्थना करून त्रिवेणी संगमामध्ये पहिली आणि नंतर दुसरी डुबकी मारल्यावर मला एक कलश मिळाला अन् तिसरी डुबकी मारल्यावर पुन्हा दुसरा कलश मिळाला. अशा प्रकारे मला दोन आणि श्री. बुधाप्पादादाला एक असे आम्हाला तीन कलश मिळाले.

५ आ. सरस्वती नदीने श्रीविष्णुरूपी नारायणाचा अवतार झाला असून लवकरच हिंदु राष्ट्राची पहाट होणार असल्याचे सांगणे : सरस्वती नदीने सूक्ष्मातून मला सांगितले, ‘श्रीविष्णुरूपी नारायण यांचा कलीयुगामध्ये अवताराला आरंभ झाला आहे आणि त्यांनी आम्हाला फुले पाठवून दिली आहेत. या आनंदामध्ये आम्ही आहोत आणि आता हिंदु राष्ट्राची पहाट व्हायला वेळ लागणार नाही. सर्व सिद्धता झाली आहे. केवळ साधकांची सिद्धता चालू आहे. ‘हे राज्य पुढे कसे चालवायचे ?’, ते परात्पर गुरुदेव शिकवत आहेत. तुम्ही शिकून शिकून पुढे जा.’

५ इ. गंगास्नान करतांना प्रत्यक्षात पाणी थंड असूनही गरम वाटणे : गंगास्नान करतांना मला थंडी वाजत नव्हती. त्या वेळी प्रत्यक्षात नदीचे पाणी थंड असूनही ‘मी गरम पाण्यामध्येच स्नान करत आहे’, असे मला वाटत होते. मी हे माझ्यासमवेतच्या साधकालाही सांगितले. नंतर सरस्वती नदीसमवेतचा संवाद संपल्यावर पाणी हळूहळू थंड होऊ लागले.

६. ध्यानमंदिरात गेल्यावर परात्पर गुरुमाऊलींचे विराट रूपात दर्शन होणे, त्यांच्याभोवती पिवळा प्रकाश आणि मागे शेषनागाचा फणा दिसणे, तेव्हा प्रत्यक्ष श्रीमद्नारायण स्वरूप त्रिलोकनाथ वाराणसीत वास करत असल्याची साक्ष मिळणे

दुसर्‍या दिवशी आश्रमात पहाटे ५ वाजताच आम्ही दोघांनी अंघोळ केली. मला पाणी हातावर घेतांना बर्फासारखे वाटले; परंतु अंघोळ करतांना ते कोमट लागत होते. त्यानंतर आम्ही ध्यानमंदिरात गेल्यावर मला प्रभु श्रीरामचंद्रावतार परात्पर गुरुमाऊलींच्या विराट रूपाचे दर्शन झाले. ‘प्रत्यक्ष श्रीमद्नारायण स्वरूप त्रिलोकनाथ वाराणसीत वास करत आहेत’, याची मला त्या ठिकाणी साक्ष मिळाली. त्या वेळी माझी भावजागृती होऊन अश्रू आवरेनासे झाले. माझे संपूर्ण शरीर घामाने भिजले. तेथील चैतन्यामुळे वातावरण पिवळ्या रंगाचे झाले होते. मला परात्पर गुरुदेवांच्या भोवती संपूर्ण पिवळा प्रकाश आणि त्यांच्या मागे शेषनागाचा फणा दिसत होता.‘सर्व सृष्टीचा कर्ता करविता परात्पर गुरुमाऊलीच आहेत’, याची मला पुन्हा एकदा निश्‍चिती झाली.

७. वाराणसी सेवाकेंद्र म्हणजे चैतन्याचा साठा !

वाराणसी सेवाकेंद्रामध्ये प्रत्येक वस्तूमध्ये चैतन्य आहे. तिथले पाणी म्हणजे साक्षात गंगामैय्याच आहे; कारण ते पाणी सर्व साधकांनी हाताळल्यामुळे ‘त्यात चैतन्य निर्माण झाले आहे’, असे जाणवले. मला प्रत्येक वस्तूमधून चंदनाचा सुगंध येत होता.

८. काशीमध्ये गेल्यावर आलेल्या अनुभूती

८ अ. दैनिकाचे गठ्ठे नेतांना मनात प्रथम नकारात्मक विचार येणे आणि प्रार्थना केल्यावर ‘साक्षात गुरुमाऊलींचे विराट रूप समवेत आहे’, याची जाणीव होऊन गठ्ठ्यांंचा भार (वजन) न जाणवणे : सकाळी आम्ही काशीला जायला निघतांना आमच्या समवेत दैनिक सनातन प्रभातचे काही गठ्ठे कुंभमेळ्यामध्ये नेण्यासाठी दिले होते. त्यांचा भार (वजन) अधिक असल्याने ‘मला तो झेपेल का?’ असा विचार माझ्या मनात आला. मी परात्पर गुरुमाऊलींना प्रार्थना केल्यावर परात्पर गुरुमाऊलींनी पू. गुंजेकरमामांच्या संदर्भातील एका प्रसंगाची आठवण करून दिली. पू. गुंजेकरमामांनी ‘दैनिक म्हणजे परात्पर गुरुदेवांचे विराट रूप आहे’, असे सांगितले होते. त्या प्रसंगाची आठवण झाली आणि मी सकारात्मक होऊन सेवा स्वीकारली. दैनिकाचे गठ्ठे डोक्यावर घेऊन आम्ही पूर्ण काशी फिरलो; परंतु आम्हाला काहीच ओझे जाणवले नाही. त्या वेळी ‘साक्षात परात्पर गुरुमाऊलींचे विराट रूप माझ्यासमवेत आहे’, याची मला प्रत्येक पावलागणिक जाणीव होत होती आणि मला प्रसन्न वाटत होते.

८आ. काळभैरवामध्ये परात्पर गुरुमाऊलींचे दर्शन होणे : काशीमध्ये जाऊन आम्ही सकाळी काळभैरवनाथाचे दर्शन घेतले. तेथे असणार्‍या भटजींनी मला प्रसाद म्हणून विभूती दिली आणि माझ्या पाठीवर थाप मारून ‘घाबरू नकोस. काळभैरव तुझ्या पाठीशी आहे’, असे सांगितले. मी परत एकदा दर्शन घेतले. तेव्हा मला काळभैरवामध्ये परात्पर गुरुमाऊलींचे दर्शन झाले.

८ इ. श्री काशीविश्‍वेश्‍वराचे दर्शन घेतांना आलेल्या अनुभूती

८ इ १. नामजप करत असतांना शिवाचे विराट रूपात दर्शन होणे : आम्ही वाराणसीमध्ये श्री काशी विश्‍वेश्‍वराच्या दर्शनासाठी गेलो. सकाळी १०.३० वाजता रांगेतून आम्ही आत गेलो. आरती होईपर्यंत आम्ही नामजप करत उभे होतो. मी नामजप करत असतांना मला शिव विराट रूपात दिसत होता. मी काशी विश्‍वेश्‍वराचे चार वेळा दर्शन घेतले. प्रत्येक वेळी मला त्याच्यामध्ये परात्पर गुरुदेवांचे दर्शन होत होते. आरती चालू असतांना मी गाभार्‍याच्या बाहेर उभा होतो. तेव्हा ‘गाभार्‍याच्या भूमीपासून कळसाच्या टोकापर्यंत विराट रूपात शिव उभा आहे’, असे मला दिसत होते.

८ इ २. भगवान शिवाने ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यात सर्व तीर्थक्षेत्रे असून काशी नगरी रामनाथी आश्रमातच आहे’, याची जाणीव करून देणे : मी नमस्काराची मुद्रा करत असतांना मला भगवान शिवाच्या छातीमध्ये साक्षात परात्पर गुरुदेव दिसत होते. मी त्यांना प्रश्‍न विचारला, ‘हा काय प्रकार आहे ?’ तेव्हा शंकराने सांगितले, ‘परात्पर गुरु डॉक्टर आठवले हे प्रत्यक्ष त्रिलोकनाथच आहेत. ते चराचरातील प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूमध्ये सामावलेले आहेत. त्यांच्या ठिकाणीच काशी आणि सर्व तीर्थक्षेत्रे आहेत.’ त्या वेळी ‘काशी नगरी रामनाथी आश्रमात आहे’, याची भगवान शिवाने मला जाणीव करून दिली.

८ इ ३. एका अज्ञात भटजींनी एक वाटी दूध विनामूल्य आणून देणे आणि पिंडीवर अभिषेक करण्यासाठी सांगणे, त्या वेळी रामनाथी आश्रमामध्ये संतांच्या सत्संगाच्या वेळी येतो, तसा चंदन आणि कापूर यांचा पुष्कळ सुगंध येणे : श्री काशीविश्‍वेश्‍वराची आरती चालू असतांना एका अज्ञात भटजींनी मला एक वाटी दूध विनामूल्य आणून देऊन पिंडीवर अभिषेक करण्यास सांगितले. प्रत्यक्षात मी तीन वेळा दर्शन घेऊनही पिंडीवर दुधाचा अभिषेक केला नव्हता. भटजींनी मला दूध आणून दिल्यावर माझी भावजागृती झाली. मी आरती झाल्यावर शिवपिंडीवर दूध वाहत असतांना गाभार्‍यामध्ये सुगंध येऊ लागला. रामनाथी आश्रमामध्ये संतांच्या सत्संगाच्या वेळी चंदन आणि कापूर यांचा जसा पुष्कळ सुगंध येतो, तसा तो वाटत होता.

८ इ ४. मंदिराच्या गाभार्‍यातून बाहेर येतांना पुन्हा शिवाचे विराट रूपात दर्शन होणे आणि शिवाने सांगितल्याप्रमाणे गुणवृद्धीसाठी प्रयत्न केल्यावर ‘नामजप आणि प्रत्येक विचार परात्पर गुरुमाऊलींकडे जात आहे’, याची जाणीव होणे : मी श्री काशीविश्‍वेश्‍वराच्या गाभार्‍यातून बाहेर येतांना मला शिवशंकराने एका हातात त्रिशूळ आणि एका हातात डमरू, असे विराट रूपात दर्शन दिले. ‘न भूतो न भविष्यति ।’ अशा प्रकारचे ते दर्शन झाल्यावर माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली. शिवाने मला ‘सेवा स्वीकारणे, जिद्द, तळमळ आणि चिकाटी’ हे गुण वाढवण्यास सांगितले. मी त्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरवले. तेव्हापासून ‘माझा नामजप आणि प्रत्येक विचार परात्पर गुरुमाऊलींकडे जात आहे’, याची मला जाणीव होऊ लागली. मला प्रत्येकामध्ये परात्पर गुरुमाऊलीच दिसत आहेत.

९. परात्पर गुरूंच्या छायाचित्रामध्ये पालट झाल्याचे जाणवणे

प्रयागराज कुंभस्थपर्वामध्ये सेवा करतांना मला माझ्याकडील परात्पर गुरुमाऊलींच्या छायाचित्रामध्ये पालट झालेला जाणवला. परात्पर गुरुमाऊलींच्या ओठांवर गुलाबी रंग आला होता आणि तोंडवळा गोरा, मऊ आणि प्रसन्न दिसून केस हलल्यासारखे दिसत होते. असे दृश्य मला प्रतिदिन प्रार्थना करतांना दिसत होते.

१०. सूक्ष्मातून गुरुदेवांकडून आनंदाच्या लहरी अधिक प्रमाणात येत असल्याचे जाणवणे आणि श्री. मालोंडकरकाकांची ६१ टक्के पातळी घोषित झाल्यावर त्याचे कारण कळणे

५.२.२०१९ या रात्री मला परात्पर गुरुदेव हसतमुख दिसत होते आणि ‘त्यांच्याकडून आनंदाच्या लहरी माझ्याकडे येत आहेत’, असे मला सूक्ष्मातून जाणवत होते. त्याच रात्री ११ वाजता श्री. मालोंडकरकाकांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले. तेव्हा मला ‘प्रतिदिनपेक्षा आज आनंदाच्या लहरी अधिक प्रमाणात का येत आहेत ?’, हे लक्षात आले. हा आनंद परात्पर गुरुमाऊलींनी दिला.

श्री. मालोंडकरकाकांकडून मला ‘स्वीकारणे, आज्ञापालन करणे, विचारून कृती करणे, नीटनेटकेपणा, इतरांचा विचार करणे’, हे गुण शिकायला मिळाले. श्री. मालोंडकरकाका प्रत्येक सेवा देतांना आम्हाला सांगतात, ‘संतांच्या संकल्पाने, आशीर्वादाने आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार सेवा केली की, ती सेवा परिपूर्ण अन् चुकांविरहित होते. संतांच्या मार्गदर्शनानुसार सेवा केली की, आपले अंतर्मन आणि बाह्यमन यांची शुद्धी होते.’                                

११. सद्गुरु पिंगळेकाका आणि संत पू. नीलेश सिंगबाळ यांच्या संदर्भातील अनुभूती

११ अ. सद्गुरु पिंगळेकाकांनी पाठीवर हात ठेवून प्रकृतीची विचारपूस केल्यावर सेवेचा ताण न्यून होऊन ती स्वीकारली जाणे : मी आरंभी तंबूमध्ये सेवा करत असतांना मला पुष्कळ ताण आला होता. मला वातावरणाशी जुळवून घेता येत नव्हते. तेव्हा मला सद्गुरु पिंगळेकाकांचे दर्शन झाले. त्यांच्यामध्ये मला प्रभु श्रीरामचंद्रांचे दर्शन होऊन ‘प्रभु श्रीराम आशीर्वाद देत आहे’, असे मला दिसले. तेव्हा मी प्रार्थना केली, ‘हे भगवंता, तुझा आशीर्वाद सदैव आमच्यावर असू दे आणि मला तुझा ध्यास अखंड असू दे’, अशी प्रार्थना केल्यावर प्रत्यक्षात सद्गुरु काकांनी माझ्या पाठीवर हात फिरवून माझ्या प्रकृतीची विचारपूस केली आणि ‘सेवा छान चालू आहे’, असा आशीर्वाद दिला. त्यानंतर मला आलेला सेवेचा ताण दूर होऊन मी सकारात्मक राहून चांगल्या प्रकारे सेवा करण्याचा प्रयत्न केला.

११ आ. सद्गुरु पिंगळेकाकांनी वापरलेल्या छोट्या कुंकवाच्या रिकाम्या डबीला सुगंध येणे : सद्गुरु पिंगळेकाकांनी वापरलेल्या छोट्या कुंकवाच्या डबीतील कुंकू संपले होते आणि ती कुंकवाची डबी सद्गुरु काकांनी आरशाजवळ ठेवली. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘ती डबी मला मिळाली, तर मी तिचा आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घेईन.’ तेवढ्यात सद्गुरु काकांनी ती डबी उचलून मला दिली. मी ती प्रसाद म्हणून स्वीकारली. त्या डबीला आता सुगंध येत आहे.

११ इ. सद्गुरु पिंगळेकाका आणि पू. नीलेशदादा यांच्या माध्यमातून गुरुदेवांनी सेवेसाठी चैतन्य दिल्याचे जाणवणे : सद्गुरु पिंगळेकाका आणि पू. नीलेशदादा हे आमची सेवा चालू असतांना आमच्या जवळून जात असत, तेव्हा मला ‘साक्षात परात्पर गुरुमाऊली आम्हाला सेवेसाठी चैतन्य देत आहे’, असे जाणवत असे. पू. नीलेशदादा आल्यावर ‘प्रत्यक्ष सूर्यनारायणच माझ्याजवळ येत आहेत’, असे मला जाणवायचे. ते बोलत असतांना त्यांचे मुख आणि हात यांतून सुगंध येत होता. सेवा जलद गतीने आणि नामजपासह होत होती अन् मला सेवा करतांना पुष्कळ प्रमाणात आनंद मिळत होता.

११ ई. पाऊस पडण्याची चिन्हे दिसू लागताच संतांनी सांगितलेले आध्यात्मिक उपाय करतांना सूक्ष्मातून सर्व देवता आणि सनातनचे सर्व संत आकाशात जाऊन वरुणदेवाला प्रार्थना करतांना दिसणे अन् उपाय केल्यावर पाऊस न येणे : कुंभपर्वामध्ये सेवा करत असतांना पाऊस पडण्याची चिन्हे दिसू लागली. तेव्हा संतांनी दिलेले मंत्र लावून सेवा चालू झाली. मला अग्निहोत्रातील विभूती तंबूमध्ये फुंकरण्यास सांगण्यात आले. मी ती विभूती घेऊन शुद्धी करत असतांना मला सर्व देवता आणि सनातनचे सर्व संत सूक्ष्मातून आकाशात जाऊन वरुणदेवाला प्रार्थना करतांना दिसत होते. नंतर मी विभूती चारही दिशांना फुंकरली आणि लगेचच संदेश आला, ‘आता पाऊस येणार नाही.’ प्रत्यक्षात तसेच झाले. पाऊस आला नाही. ‘संतांच्या संकल्पानेच सर्व काही होत जाणार’, असे परात्पर गुरुमाऊलींनी सांगितले होते, त्याची मला त्यादिवशी अनुभूती आली.

११ उ. पू. नीलेशदादांचे मार्गदर्शन चालू असतांना अचानक सूर्यदेवाचे दर्शन होऊन भावजागृती होणे : एकदा पू. नीलेश सिंगबाळ यांचे मार्गदर्शन चालू होते. तेव्हा अचानक मला पू. नीलेशदादांच्या छातीवर सात घोड्यांच्या रथावर विराजमान झालेले सूर्यदेव दिसले. पू. नीलेशदादांमध्ये सूर्यदेवाचे दर्शन झाल्याने माझी भावजागृती झाली. मी सूर्यदेवाला प्रार्थना केली, ‘मला मायेमध्ये ठेवू नकोस. मला सतत परात्पर गुरुदेवांच्या चरणांखालची धूळ म्हणून राहाता येऊ दे.’ अशी प्रार्थना केल्यावर सूर्यदेवाने पू. नीलेशदादांच्या माध्यमातून स्थुलातून मान हालवून ‘तुझी इच्छा पूर्ण होईल’, असा मला आशीर्वाद दिल्याचे मला जाणवले.

‘हे परात्पर गुरुमाऊली, आपण या घनघोर आपत्काळात प्रयागराज कुंभमेळ्यामध्ये या जिवाला अनमोल अशी सेवा करण्याची संधी दिलीत, यासाठी आम्ही आपल्या चरणी शरणागतभावाने कृतज्ञता व्यक्त करतो.’

‘हे श्रीकृष्णा, हे श्रीमद्नारायणा, हा जीव सतत चैतन्यामध्ये तुझ्या अनुसंधानात राहू दे. तुझ्या कृपेच्या वर्षावाने या जिवाचा उद्धार होऊ दे’, अशी तुझ्या कोमल चरणी कोटीशः प्रार्थना करतो.’                                             (समाप्त)

– श्री. ज्ञानेश्‍वर गावडे, गवेगाळी, कर्नाटक. (१९.२.२०१९)