ऑनलाईन विक्री प्रगती कि आत्महत्या ?

८ जानेवारी या दिवशी सांगलीत भ्रमणभाष विक्रेत्यांनी एक दिवसाचा बंद पुकारला होता. यामध्ये सर्व भ्रमणभाष विक्रेत्यांनी त्यांची दुकाने बंद ठेवली होती. बंदचे कारण होते ‘भ्रमणभाषची ऑनलाईन विक्री.’ ऑनलाईन विक्रीच्या विरोधात त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना विविध मागण्यांचे निवेदनही दिले. ऑनलाईन व्यवसायामुळे देशात ४० सहस्रांहून अधिक दुकाने बंद पडली आहेत. फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन, स्नॅपडील यांसारख्या मोठ्या आस्थापनांनी आकर्षक सूट देऊन भारतातील बहुतांश बाजारपेठांवर त्यांची पकड निर्माण केली आहे. जेव्हापासून केंद्रशासनाने किरकोळ विक्रीमध्ये (‘रिटेल सेक्टर’) मध्ये एफ्डीआयचा मार्ग अवलंबला आहे, तेव्हापासून रिटेल विभागांमध्ये पुष्कळ मोठी उलथापालथ झाली आहे.

सध्या भारतात भ्रमणभाष, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, घरगुती उपकरणे (दूरध्वनीसंच, शीतकपाट, कपडे धुण्याचे यंत्र इ.), औषधे, कपडे, खेळणी, नामवंत आस्थापनाचे बूट, पादत्राणे, खेळाचे साहित्य, स्टेशनरी, खाद्यपदार्थ इत्यादी सर्व वस्तू ऑनलाईन पद्धतीने विकले जात आहेत. काही नामांकित आस्थापने हिंदूंचे धार्मिक सण आणि उत्सव, ईद, नाताळ इत्यादी वेळी ऑनलाईन बाजार भरवून विक्रीचा उच्चांक गाठत आहेत. भारतात ई-कॉमर्स व्यवसायात वर्ष २०१७ मध्ये २ कोटी ६९ सहस्र ७७ रुपये ऑनलाईन व्यवसाय झाला. वर्ष २०२२ पर्यंत हा व्यवसाय १० कोटी ४८ सहस्र ३५० रुपयांपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे ‘एवढा व्यवसाय बाजारपेठेतून गेला’ असेच म्हणावे लागेल. त्यामुळे बाजारात ग्राहकांचा ओघ दिवसेंदिवस न्यून होत आहे. ऑनलाईनमुळे ग्राहकांना अल्प दरात वस्तू उपलब्ध होत आहे, हा भाग चांगला असला, तरी या मालाची निश्‍चिती देता येणार नाही. याचे उदाहरण म्हणजे देहलीमध्ये काही दिवसांपूर्वी एका मोठ्या उत्पादन आस्थापनाने स्वतःचा माल ऑनलाईन खरेदी केल्यानंतर समजले की, त्यांच्या नावे इतर काही जण माल विकत होते ! या गोष्टी ग्राहकाला ठाऊक नसतात. तसेच काही मासांपूर्वी ऑनलाईन शस्त्रविक्रीही उघडकीस आली होती. अशा फसवणुकीवर आळा बसू शकेल, अशी कोणतीही यंत्रणा शासनाकडे नाही. औषध विक्रेत्यांनीही काही दिवसांपूर्वी याविषयी संप करून लाक्षणिक बंद पाळला होता. याला काही प्रमाणात यशही आले; पण एकूणच ऑनलाईन विक्रीमुळे व्यापारी वर्ग आणि भारतातील बाजारपेठा मात्र नक्कीच अडचणीत आल्या आहेत. शासनानेही भारतात ‘ऑनलाईन विक्री’ किती आवश्यक आहे याचा अभ्यास केला पाहिजे; कारण अनावश्यक ‘ऑनलाईन विक्री’ वाढली, तर तिचा परिणाम लाखोंच्या संख्येने रोजगारावर होऊ शकतो. जी समस्या सांगलीतील भ्रमणभाष विक्रेत्यांची आहे, तीच आज देशातील लाखो विक्रेत्यांची आहे.

– श्री. भरत जैन, ईश्‍वरपूर (सांगली)