गीताज्ञानदर्शन

सनातनचे ज्ञानयोगी संत पू. अनंत बाळाजी आठवले ह्यांच्या ‘गीताज्ञानदर्शन’ ह्या सनातनच्या ग्रंथसंपदेतील ग्रंथातील मजकूर क्रमश: प्रसिद्ध करत आहोत.

॥ श्रीकृष्णाय नम: ॥

अनंत आठवले

भगवद्गीतेतील काही अमूल्य रत्ने

रत्न ५

आपल्या स्वाभाविक कर्मांनीही ईश्‍वरप्राप्ती शक्य

आपल्यात ईश्‍वरप्राप्तीची योग्यता येण्यासाठी भक्ती, ध्यान, ज्ञान, ह्यांच्यासारख्या एखाद्या प्रस्थापित मार्गानेच साधना केली पाहिजे असे नाही. शिवाय, अशा साधना करण्यासाठी वेगळा वेळ काढावा लागतो. गवंडी, सुतार, शेतकरी, अशा अनेकांना प्रतिदिन कामावर जाऊन उदरनिर्वाहासाठी अर्थाजन करावे लागते. त्यांना असा नियमित वेळ काढणे शक्य होत नाही.

भगवान् श्रीकृष्ण सांगतात, ‘सहजतेने जे कर्म आपल्या वाट्याला आले आहे, ते कर्म करत राहूनही मनुष्य ईश्‍वरप्राप्तीची योग्यता प्राप्त करू शकतो’ (अध्याय १८, श्‍लोक ४५). हे कसे घडते ? भगवान् श्रीकृष्ण सांगतात, ‘ज्या ईश्‍वरापासून सर्व प्राण्यांची उत्पत्ती होते किंवा कर्मात प्रवृत्ती होते आणि ज्या ईश्‍वराने हे सर्व जग व्याप्त आहे, त्याची आपल्या कर्मांनीच पूजा करून ती योग्यता प्राप्त होते’ (अध्याय १८, श्‍लोक ४६).

आपल्या कर्मांनीच ईश्‍वराची पूजा कशी करायची ? आपली स्वाभाविक शास्त्रविहित कर्मे सचोटीने आणि ईश्‍वराची सेवा मानून करायची. कर्मे करताना आळस, स्वार्थ, लोभ, दुसर्‍याचे अहित इत्यादी दुर्भावना तर असताच कामा नयेत. सद्भावनेने ईश्‍वराप्रीत्यर्थ कर्मे करायची.                         (क्रमश:)

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

संदर्भ : सनातनचे प्रकाशन ‘गीताज्ञानदर्शन’