खाकी वर्दीतील ‘आतंकवादी’ !

संपादकीय

काश्मीरमध्ये २ आतंकवाद्यांसह राष्ट्रपतीपदक विजेते पोलीस उपअधीक्षक देविंदर सिंह यांना अटक होणे, हे धक्कादायक आहे. जम्मू-काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी तर ‘देविंदर सिंह यांची ‘आतंकवादी’ म्हणून चौकशी करण्यात येणार’, हे स्पष्ट केले आहे. काश्मीरमध्ये आतंकवाद्यांना पकडण्यासाठी ‘विशेष पोलीस पथका’ची (एस्.पी.ओ.ची) स्थापना करण्यात आली आहे. या पथकामध्ये स्थानिक काश्मिरींचा समावेश केला जातो; मात्र याच पथकातील पोलीसच आतंकवादी होत असल्याच्या अनेक घटना पुढे येत आहेत. याआधीही अदिल बशीर शेख, सुलेमान खान, शबिर अहमद दर हे पोलीस पुढे आतंकवादी संघटनांमध्ये सहभागी झाले. आताही देविंदर सिंह यांच्यासह अटक करण्यात आलेला नावेद बाबूही कधीकाळी पोलीस म्हणून कार्यरत होता. जिहादसाठी एखादा ‘खान’ अथवा ‘शेख’ आतंकवादी झाल्याचे आपण वाचत असतो; मात्र आता अटक करण्यात आलेल्या पोलीस अधिकार्‍याचे नाव ‘देविंदर सिंह’ असे आहे. ‘सिंह’ नावाच्या व्यक्तीने जिहादी आतंकवाद्यांशी हातमिळवणी करणे, हे पचनी पडणारे नाही. शीख पंथाचा इतिहास हा जिहादी आणि धर्मांध यांच्याशी दोन हात करणार्‍या अनेक शीख योद्ध्यांच्या पराक्रमाने भरला आहे. अशा पंथातील ‘खाकी’ वर्दी परिधान केलेली व्यक्ती जिहादी आतंकवाद्यांच्या मांडीला मांडी लावून बसते, हे संतापजनक आहे. आतापर्यंत पोलिसांना ‘भ्रष्टाचारी’, ‘गुंड’, ‘बलात्कारी’ अशा अनेक उपमा लागल्या होत्या. देविंदर सिंह यांच्या कृत्यामुळे आता त्यात ‘आतंकवादी’ या आणखी एका उपमेची त्यात भर पडली आहे. पोलिसांनी आतंकवाद्यांशी केलेली ही हातमिळवणी, हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादाक आहे.

सन्मान कशाचा ?

देविंदर सिंह यांच्या पोलीससेवेची नोंद घेऊन त्यांना उपअधीक्षक पदावर बढती देण्यात आली होती. जम्मू-काश्मीर पोलीसदलात बराच काळ काम केल्यामुळे सिंह यांना राज्याच्या पोलीसदलाचे अनेक खाचखळगे ठाऊक झाले असतील. कोणता पोलीस ‘गळाला लागू शकतो’, ‘कोणता पोलीस राष्ट्रप्रेमी आहे’, ‘कोणत्या वरिष्ठ पोलिसांची काय बलस्थाने आणि मर्मस्थळे आहेत’, हे त्यांना पक्के ठाऊक असणार. ही सर्व इत्यंभूत माहिती आतंकवाद्यांचा पुरस्कर्ता असलेल्या पाकपर्यंत नक्कीच पोचली असणार आणि त्या माहितीचा वापरही पाककडून होत असणार. अलीकडेच आतंकवाद्यांकडून पोलिसांच्या चौक्यांवर होणारी आक्रमणे आणि अनेक पोलिसांना ठार मारण्याच्या घटना पाहता ही शक्यता नाकारता येत नाही. देविंदर सिंह यांना अटक केल्यानंतर त्यांच्या आतंकवादी कृत्यांचे अनेक किस्से समोर येत आहेत; पण आतंकवाद्यांशी मिळालेल्या एका पोलीस अधिकार्‍याविषयीची माहिती गुप्तचर यंत्रणांना का मिळाली नाही ? देविंदर सिंह यांची कसून चौकशी होईलच; मात्र सुरक्षायंत्रणांमध्ये कार्यरत असलेल्या अशा आतंकवादीप्रेमींपर्यंत पोचणे यंत्रणांना तत्परतेने का जमले नाही ? हे सर्वच सुरक्षायंत्रणांचे मोठे अपयश आहे.

महत्त्वाचे म्हणजे अशी कृत्ये करणार्‍यांना ‘राष्ट्रपती पदक’ म्हणून सन्मानित केले गेले. ही या पदकाची मोठी विटंबना आहे. कर्तव्यतत्पर, सदाचारी आणि जनताभिमुख पोलिसांऐवजी जनतेच्याच मुळावर उठलेल्यांना मानाचे पुरस्कार मिळणार असतील, तर असे पुरस्कार देण्यामागे जे काही राजकारण चालले असेल, त्याच्यावरील पडदाही हटायला हवा.

दायित्वशून्य सरकारी व्यवस्था !

देविंदर सिंह यांचे आतंकवादी संघटनांशी असलेले संबंध वर्ष २००१ मध्ये प्रथम उजेडात आले. ‘संसदेवर आक्रमण करणारा महंमद अफझल याने देविंदर सिंह यांनी संसदेवर आतंकवादी आक्रमण करणार्‍या आतंकवाद्यांना साहाय्य करण्यासाठी माझ्यावर दबाव आणला होता’, असे सांगितले होते. त्या वेळी त्याच्याकडे कोणी लक्ष दिले नव्हते. तसे पाहिले, तर एका आतंकवाद्याच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवण्याची आवश्यकता नाही; मात्र खबरदारीची उपाययोजना म्हणून त्याने दिलेले संदर्भ पडताळून पाहणे आवश्यक होते. सुरक्षायंत्रणेचे ते कामच असते; मात्र तशी पडताळणी का केली गेली नाही ? सुरक्षायंत्रणांची ही घोडचूकच म्हणावी लागेल. त्याच वेळी सिंह यांची चौकशी करून त्यांच्या मुसक्या आवळल्या असत्या, तर जम्मू-काश्मीरच्या पोलीसदलाची जी हानी झाली, ती टाळता आली असती. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे देविंदर सिंह हे लाचखोर अधिकारी म्हणून कुप्रसिद्ध होते. त्यांची चौकशी केल्यानंतर अनेक आतंकवाद्यांच्या निवासाची व्यवस्था तेच करत असत. त्यासाठी ते लाखो रुपये घेत असत. सेवा बजावत असतांना त्यांना लाच घेतांना अटकही करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचे निलंबन करण्यात आले; मात्र नंतर त्यांना परत बोलावून त्यांची अन्य ठिकाणी नियुक्ती करण्यात आली. त्याच वेळी त्यांच्या बेहिशोबी संपत्तीची चौकशी केली असती, तर पुढचा अनर्थ टळला असता; मात्र आपल्याकडील व्यवस्थाच इतकी कूचकामी आहे की, कितीही भ्रष्टाचार करा, त्याची चौकशी होऊन खटला चालू होईपर्यंत भ्रष्टाचारी बिनधास्त असतो. व्यवस्थेतील या अक्षम्य त्रुटींमुळे भ्रष्टाचार्‍यांचे फावतेच; मात्र आता देविंदर सिंह यांच्यासारख्या राष्ट्रघातक्यांनाही राष्ट्रविरोधी कृती करण्याचे बळ मिळते. देविंदर सिंह विविध आतंकवाद्यांशी वेगवेगळ्या माध्यमांद्वारे संपर्कात होते, त्यांच्या जेवण्या-खाण्याची, राहण्याची व्यवस्था करायचे, त्यांना आतंकवादी आक्रमण करण्यास साहाय्य करायचे, ‘एवढे सगळे चालू असतांना त्यांचे साथीदार आणि वरिष्ठ अधिकारी यांना कुणकुण लागली नसेल’, असे म्हणणे धाडसाचे वाटते. या सर्व घटनांचा आढावा घेता जम्मू-काश्मीर पोलीसदलाचे ‘हिरवेकरण’ रोखायचे असेल, तर सरकारी व्यवस्थेला धाडसी निर्णय घ्यावेच लागतील !