देहली आणि गुजरात राज्यांत आतंकवादी आक्रमणाची शक्यता

पाकच्या आय.एस्.आय.चे षड्यंत्र असल्याचे निष्पन्न !

भारतात घातपात कारवाया करण्यामागे आय.एस्.आय.चा हात असल्याचे ढीगभर पुरावे भारताकडे उपलब्ध आहेत. आता आक्रमणाच्या शक्यतेनंतर राज्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्याच्या वरवरच्या उपाययोजनेऐवजी केंद्रशासनाने पाकचा निःपात करून आतंकवादाची समस्याच समूळ नष्ट करणे आवश्यक !

नवी देहली – २६ जानेवारीपूर्वी देहली आणि गुजरात राज्यांमध्ये जिहादी आतंकवादी आक्रमण होऊ शकते, अशी शक्यता देहली पोलिसांनी वर्तवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ४ दिवसांपूर्वी देहली पोलिसांनी ३ आतंकवाद्यांना अटक केली होती. त्यांनी दिलेल्या माहितीवरून गुजरातमधून त्यांच्या एका सहकार्‍यालाही अटक करण्यात आली आहे. त्याच्या चौकशीतून या आतंकवाद्यांना आदेश देणार्‍या विदेशातील प्रमुखांनी या आतंकवाद्यांना प्रजासत्ताकदिनाच्या आधी म्हणजे २६ जानेवारीपूर्वी देहली आणि गुजरात या राज्यांमध्ये एखादे मोठे आक्रमण करण्याचा आदेश दिला होता. यात ‘लोन वुल्फ अ‍ॅटॅक’चा (एकाच व्यक्तीने शस्त्र किंवा शस्त्राविना आक्रमण करणे) समावेश होता.

कावेबाज आय.एस्.आय. यंत्रणा !

अटक करण्यात आलेल्या आतंकवाद्यांना पाकची गुप्तचर यंत्रणा आय.एस्.आय. आदेश देत होती; मात्र आदेश देतांना या यंत्रणेचे संबंधित अधिकारी स्वतःची ओळख ‘‘इस्लामी स्टेट’चे आतंकवादी’, अशी करून देत होते. असे करून आय.एस्.आय. पडद्यामागे राहून भारतात आतंकवादी कारवाया करण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे. ‘अशाने भारतात कारवाया करणारे आतंकवादी पकडले गेल्यास त्यांच्या चौकशीवरून कारवायांचे खापर इस्लामिक स्टेटवर फुटेल आणि आय.एस्.आय. नामानिराळे राहील’, हा आय.एस्.आय.चा डाव आहे.

राष्ट्रपतीपदक विजेत्या पोलीस उपअधीक्षकाने आतंकवाद्यांना देहलीत पोचवण्यासाठी लाखो रुपये घेतल्याचे पोलीस चौकशीत उघड

आतंकवादी महंमद अफझलशी असलेल्या संबंधांचेही अन्वेषण चालू

श्रीनगर – येथील कुलगाममधून हिजबूल मुजाहिदीन आणि लष्कर-ए-तोयबा यांच्या २ आतंकवाद्यांसह जम्मू-काश्मीरचे पोलीस उपअधीक्षक अन् राष्ट्रपतीपदक विजेते देविंदर सिंह यांना १२ जानेवारीला पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांनी सिंह यांचे अन्वेषण चालू केले असून त्यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. या आतंकवाद्यांना आधी चंडीगड आणि नंतर देहली येथे सुरक्षितपणे पोचवण्यासाठी सिंह यांनी १२ लाख रुपये घेतले होते. तसेच संसदेवर १३ डिसेंबर २००१ या दिवशी आतंकवादी आक्रमण करणारा आतंकवादी महंमद अफझल याच्याशी त्यांचे संबंध होते. याचसमवेत महंमद अफझल यानेही त्यांचे नाव घेतल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. (त्याच वेळी सिंह यांची सखोल चौकशी का करण्यात आली नाही ? जर त्याच वेळी चौकशी करून कारवाई केली असती, तर पुढच्या अनेक घटना टळल्या असत्या ! – संपादक)