वाराणसी येथील श्री काशी विश्‍वनाथ मंदिरात भाविकांसाठी ‘ड्रेसकोड’

श्री काशी विश्‍वनाथ मंदिर प्रशासनाचा स्तुत्य निर्णय !

वाराणसी – येथील प्रसिद्ध श्री काशी विश्‍वनाथ मंदिरात दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांना उज्जैन येथील श्री महाकाल मंदिराच्या धर्तीवर मकरसंक्रांतीनंतर ‘ड्रेसकोड’ (एखाद्या ठिकाणी परिधान करावयाच्या पोशाखासंबंधीचे नियम) लागू करण्यात येणार आहे. यानुसार मंदिराच्या गाभार्‍यात दर्शनासाठी जातांना पुरुषांना धोतर-कुर्ता परिधान करावा लागणार असून महिलांना साडी नेसावी लागणार आहे. यासंबंधीचा निर्णय १२ जानेवारीला मंदिर प्रशासन आणि काशी विद्वत परिषद यांच्यातील बैठकीत घेण्यात आला. या वेळी उत्तरप्रदेशचे पर्यटनमंत्री नीळकंठ तिवारी हेही उपस्थित होते.

मंदिर व्यवस्थापनाने घेतलेल्या निर्णयानुसार आता जीन्स, पॅन्ट, टी-शर्ट आणि सूट परिधान केलेल्या भाविकांना दर्शन घेता येणार आहे; पण शिवलिंगाला स्पर्श करून दर्शन घेण्याची अनुमती मिळणार नाही. पारंपरिक वस्त्रे परिधान केल्यानंतरच भाविकांना शिवलिंगाला स्पर्श करून दर्शन घेता येणार आहे. स्पर्श दर्शनासाठी प्रतिदिन १ घंट्याची वेळ निश्‍चित करण्यात आली होती; पण ती मकरसंक्रांतीनंतर आता ७ घंट्यांची करण्यात येणार आहे. त्यामुळे आता पहाटेच्या मंगल आरतीपासून दुपारच्या आरतीपर्यंत प्रतिदिन देवाचे गाभार्‍यात जाऊन स्पर्श दर्शन घेता येणार आहे.