पाकव्याप्त काश्मीर घेण्याची आता वाट पाहू नका ! – अजमेर शरीफ दर्ग्याचे दिवाण सय्यद जैनुल आबेदीन

देशातील किती इमाम, पाद्री किंवा अन्य धार्मिक नेते असे उघडपणे बोलतात ? काँग्रेस आणि कम्युनिस्ट आदी विरोधी पक्ष तरी कधी असे म्हणतात का ?

नवी देहली – जर भारतीय सैन्य सिद्ध आहे, तर कसली वाट पाहिली जात आहे ? संसदेने पाकव्याप्त काश्मीर भारतात जोडण्याचा सैन्याला आदेश दिला पाहिजे, असे वक्तव्य अजमेर येथील ख्वाजा मोइनुद्दीन हसन चिश्ती दर्ग्याचे दिवाण सय्यद जैनुल आबेदीन यांनी केले आहे. सैन्यदलप्रमुख मनोज नरवणे यांनी ‘केंद्रशासनाने आदेश दिल्यास पाकव्याप्त काश्मीर आपले’, असे विधान केले होते. त्या पार्श्‍वभूमीवर दिवाण आबेदीन यांनी हे वक्तव्य केले.

दिवाण आबेदीन पुढे म्हणाले की, भारतीय संसदेने वर्ष १९९४ मध्ये प्रस्ताव संमत केला होता. त्यात स्पष्टपणे म्हटले होते की, पाकव्याप्त काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे. आता वेळ आली आहे की, भारताने त्याच्या अविभाज्य भागाला परत घेऊन अखंड काश्मीरचे स्वप्न पूर्ण करावे. भारतियांसाठी पाकव्याप्त काश्मीर परत भारताशी जोडला जाणे, हा ऐतिहासिक दिवस असेल. आज भारताचा प्रत्येक नागरिक सरकार आणि भारतीय सैन्य यांच्या समवेत उभा आहे. सैन्याला प्रत्येक पाऊल टाकतांना भारतीय नागरिक तिच्या समवेत उभा आहे, असे दिसेल.