सैन्यप्रमुखांना पाकव्याप्त काश्मीर घेण्याचे आदेश द्या !

‘दैनिक सामना’मधून शिवसेनेची केंद्राकडे मागणी

मुंबई – देशाचे सैन्यदलप्रमुख जनरल नरवणे यांनी पदभार स्वीकारताच मराठी बाणा दाखवून दिला आहे. जनरल नरवणे यांनी ‘पाकव्याप्त काश्मीर आमचेच आहे. केंद्र सरकारने आदेश दिल्यास पाकव्याप्त काश्मीर कह्यात घेऊ’, असे सांगितले आहे. भाजपचे केंद्रातील सरकार धाडसी आहे. त्यांचा ‘जे.एन्.यू.’तील ‘तुकडे तुकडे गँग’वर रोष आहे. त्यामुळे देशविरोधी घोषणा देणार्‍यांविरुद्ध प्रतिघोषणाबाजी करण्यापेक्षा ‘तुकडे तुकडे गँग’च्या कानशिलाखाली अखंड भारताचा जाळ उठवला पाहिजे. त्यासाठी जनरल नरवणे यांनी आदेश मागितले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी तसे आदेश द्यावेत, अशी जनभावना आहे, असा घणाघात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

या अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, पाकव्याप्त काश्मीरमध्येच सर्वाधिक आतंकवादी तळ आणि प्रशिक्षण केंद्रे आहेत. पाकचे सैन्य आणि आय.एस्.आय.च्या पाठिंब्याने ते चालवले जात आहेत. ‘सर्जिकल स्ट्राईक’ होऊनही पाकड्यांचे शेपूट वाकडे ते वाकडेच आहे. त्यांच्या कुरापती काही थांबलेल्या नाहीत. काश्मीर खोर्‍यात आजही आमच्या सैनिकांचे रक्त सांडले जात आहे. प्रतिदिन बलीदान होत आहे. ‘पाकव्याप्त काश्मीरसह संपूर्ण जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे’, असा संसदेचा ठराव आहे. त्या ठरावाची कार्यवाही करण्याचा आदेश सैन्यप्रमुखांनी मागितला असल्याने केंद्र सरकारने आता माघार घेऊ नये. ‘तुकडे तुकडे गँग’ला धडा शिकवण्यासाठी हाच उत्तम मार्ग आहे.