हिंदूंनो, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य समजून घ्या ! – गजानन सातार्डेकर, ग्रामपंचायत सदस्य (शिवसेना), मळगाव, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग

श्री. गजानन सातार्डेकर

३१ डिसेंबर म्हटले की, मद्य आणि मांसाहार मेजवानी (पार्टी) डोळ्यांसमोर येते. तसे पाहता हे कृत्य हिंदु बांधवांना शोभनीय नाही, तरीही आपल्या हिंदुु धर्माविषयीच्या अज्ञानामुळे कित्येक तरुण या ‘पार्टीचा’ विचित्र आनंद लुटतांना पाहायला मिळते. याचे मुख्य कारण आजपर्यंत हिंदु धर्मियांनी स्वत:चा धर्म समजून घेण्याचा कधी प्रयत्नच केला नाही. अशा दिशाहीन पिढीला योग्य मार्ग दाखवण्यासाठी काही हिंदुत्वनिष्ठ संघटना पुढे सरसावल्या आहेत. वेळीच हिंदु बांधवांतील अज्ञान दूर करून आपला हिंदु धर्म सर्वश्रेष्ठ कसा आहे, हे वेगवेगळ्या उदाहरणांसहित सांगण्याचा प्रयत्न त्या संघटना करत आहेत; परंतु सांगायला अतिशय वाईट वाटते की, या संघटनांविषयी आणि त्या संघटनांच्या कार्याविषयी अनावश्यक चर्चा केली जाते. अशा संघटनांची टिंगलटवाळी करणारी मंडळीही आहेत. यामध्ये दुसरे तिसरे कोणीही नसून धर्माविषयी योग्य ज्ञान नसलेले हिंदु बांधवच आहेत. अशा प्रवृत्तींनी अन्य पंथियांकडून शिकण्यासारखे पुष्कळ आहे.

याविषयी सांगायचे झाले, तर असा एखादा ख्रिस्ती दाखवा की, तो त्याच्या पंथाविषयी उलटसुलट बोलतो ! एकही नसणार ! खात्रीने सांगतो !

दुसरा मुसलमान समाज ! चुकूनही स्वत:च्या संस्कृतीचे किंवा रुढी परंपरांचे विडंबन करणार नाहीच. जर कोणी केले, तर सहनही करणार नाही, हे सत्य आहे. मग उशिरा का होईना, जर काही संघटना हिंदूंना हिंदु धर्माची शिकवण विनामूल्य देत असतील, तर निदान ऐकून घेण्याची मानसिकता तरी एक हिंदु म्हणून दाखवायला काहीच अडचण नाही, असे मला वाटते.

आता या हिंदुत्वनिष्ठ संघटना कोणत्या, तर हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था, तसेच दैनिक ‘सनातन प्रभात’ हे वृत्तपत्र होय; परंतु यांची नावे घेतली की, आपल्या कपाळाला आठ्या पडतात आणि प्रारंभ येथूनच होतो आपल्या पायावर दगड मारून घ्यायला ! आपण काही ऐकणार नाही आणि अनावश्यक टीका करणार, हे कुठेतरी थांबायला हवे. वेळीच जागे व्हायला हवे. नाहीतर वेळ निघून गेलेली असेल.

माझी सर्व हिंदूंना मनापासून विनंती आहे की, हिंदु राष्ट्र-जागृती सभांना उपस्थित राहा ! धर्म जाणून घ्या ! ईश्‍वर जाणून घ्या ! ती काळाची आवश्यकता आहे. सभांना उपस्थित राहून तुुमच्या मनातील शंका विचारा. तुमच्या शंकांचे नक्कीच निरसन होईल.

– श्री. गजानन सातार्डेकर, ग्रामपंचायत सदस्य (शिवसेना), मळगाव, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग.