पनवेल येथे सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचा जन्मशताब्दी महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

प.पू. बाबांच्या पत्नी प.पू. (श्रीमती) जिजी आणि सुपुत्र पू. नंदू कसरेकर यांची वंदनीय उपस्थिती

 

पनवेल, १२ जानेवारी (वार्ता.) – सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांचा जन्मशताब्दी महोत्सव येथील ज्येष्ठ नागरिक संघात १२ जानेवारी या दिवशी पार पडला. सकाळी ९.३० ते दुपारी ४ या वेळेत या महोत्सवाच्या अंतर्गत विविध कार्यक्रम, तसेच भजने आणि भंडारा यांचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाला ३५० हून अधिक भक्त, तसेच देवद (पनवेल) येथील सनातन संस्थेच्या आश्रमातील साधकही उपस्थित होते. महोत्सवाचे सूत्रसंचालन पनवेल येथील सौ. अश्‍विनी जोशी यांनी भावपूर्णरित्या केले.

ध्वनीचित्रचकत्यांच्या माध्यमातून भक्तांना घडले प.पू. बाबांचे दर्शन !

प.पू. भक्तराज महाराज यांचा परिचय सांगणारी ध्वनीचित्र-चकती दाखवण्यात आली. भजनांचा गर्भितार्थ सांगून भक्तांना अध्यात्म शिकवणारे प.पू. बाबांचे दर्शनही एका ध्वनीचित्र-चकतीतून भक्त परिवाराला झाले.

प.पू. भक्तराज महाराज यांचे शिष्य परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ध्वनीचित्र-चकतीद्वारे विशद केलेली प.पू. बाबांची महती !

त्रैलोक्याचे योगीराज असणारे प.पू. भक्तराज महाराज ! – परात्पर गुरु डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितले, ‘‘त्रैलोक्याचे योगीराज हे अवतरले भूवरी’ हे प.पू. बाबांचे भजन खरेतर त्यांच्या गुरूंना उद्देशून आहे; पण ते प.पू. बाबांनाही लागू पडते. गृहस्थाश्रमी असूनही प.पू. बाबा हे योगीराज म्हणून भूवरी अवतरले !’’

प.पू. बाबांनी त्यांचे गुरु श्री अनंतानंद साईश यांची गुरुसेवा कशी केली ? त्यांनी एका पायावर उभे राहून अनेक घंटे भजने कशी म्हटली ?, याविषयीची उदाहरणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी यात दिली. ‘भजन, भ्रमण आणि भंडारा’ ही प.पू. बाबांची त्रिसूत्री, भक्तांना आनंद देण्यासाठी त्यांच्याकडे जाणारे एकमेव संत असणारे प.पू. बाबा, त्यांची गुरूंवरील अढळ श्रद्धा, भक्तांना विविध माध्यमांतून शिकवणे यांविषयीही त्यांनी त्यांचे मनोगत कृतज्ञतापूर्वक कथन केले. देश-विदेशातील सनातन संस्थेच्या साधकांना प.पू. बाबांविषयी अनुभूती येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत असणार्‍या प.पू. बाबांच्या छायाचित्रात होणारे आध्यात्मिक स्वरूपाचे पालट ध्वनीचित्र-चकतीच्या माध्यमातून सर्वांना पाहता आले.

असा पार पडला महोत्सव !

सर्वप्रथम सौ. मानसी दाते यांनी गणेशवंदन सादर केले. त्यानंतर प.पू. बाबांच्या भक्त आणि भुसावळ येथील कु. धनश्री जोशी यांचे भारूड झाले. त्यात त्यांनी समाज आणि महिला यांची सद्यस्थिती, तसेच ‘देव कसा ओळखावा ?’, यांविषयी भाष्य केले. त्यानंतर त्यांनी ‘भक्तराज वेडा रे वेडा, भवदुःखाचा पार केला वेढा ।’ हे भारूड सादर करून त्यात भजनांच्या माध्यमातून प.पू. बाबांचे जीवनचरित्र आणि त्यांचा आध्यात्मिक प्रवास उलगडून दाखवला. या भारूडाच्या वेळी सभागृहातील वातावरणही भावमय झाले होते. कु. धनश्री यांनी शेवटी श्री अनंतानंद साईश, प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामजीदादा यांचा जयघोष केला. भारूडाच्या वेळी श्री. दर्शन गुजराथी यांनी तबल्यावर संगीतमय साथ दिली. भारताचार्य सु.ग. शेवडे यांचे प्रवचन झाले. त्यानंतर सर्वांनी ‘हरि ॐ तत्सत्’चा सामूहिक नामजप ५ माळा केला. प.पू. बाबांची भजने म्हणण्यात आली. सर्वच भक्त भजनानंदात तल्लीन झाले. नंतर भंडारा होऊन सांगता झाली.

संत सन्मान !

प.पू. (श्रीमती) जिजी यांचा सत्कार करतांना सौ. समीक्षा ताम्हनकर

प.पू. भक्तराज महाराज यांच्या सर्वच शिष्यांवर प्रीती करणार्‍या त्यांच्या पत्नी प.पू. (श्रीमती) सुशीला कसरेकर (जिजी) यांचा सत्कार सौ. समीक्षा ताम्हनकर यांनी केला. मुंबई येथील प.पू. जोशीबाबा यांचा सन्मान श्री. संजय आणि सौ. सविता सामंत यांनी केला. प.पू. बाबांचे सुपुत्र पू. नंदू कसरेकर यांचाही सन्मान करण्यात आला.

वंदनीय उपस्थिती !

सोहळ्याला उपस्थित असलेले डावीकडून प.पू. जोशीबाबा आणि पू. नंदूदादा कसरेकर
सोहळ्याला उपस्थित असलेल्या डावीकडून डॉ. (सौ.) कुंदा आठवले आणि प.पू. (श्रीमती) जीजी

कांदळी येथील प.पू. (श्रीमती) जिजी (प.पू. भक्तराज महाराज यांच्या पत्नी), पू. नंदू कसरेकर (प.पू. बाबांचे सुपुत्र), परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पत्नी डॉ. (सौ.) कुंदा आठवले, मुंबई येथील प.पू. जोशीबाबा, तसेचसनातन संस्थेचे पू. शिवाजी वटकर आणि पू. (सौ.) अश्‍विनी पवार, तसेच भारताचार्य सु.ग. शेवडे

सत्कार सोहळा

  • प.पू. अच्युतानंद महाराज यांचे सुपुत्र श्री. दीपक बिडवई आणि प.पू. रामजीदादा यांचे सुपुत्र श्री. राजू निरगुडकर यांचा सत्कार प.पू. बाबांच्या भक्तांनी केला.
  • भक्त श्री. शशिकांत ठुसे यांचे या वेळी स्वागत करण्यात आले, तर इंदूर येथील भक्तवात्सल्याश्रमाचे विश्‍वस्त श्री. अनिल जोग यांचाही सत्कार करण्यात आला.
  • प.पू. बाबांच्या भक्त कु. प्रियांका लिगाडे यांची न्यायाधीशपदी नियुक्ती झाल्याने त्यांचा सत्कार प.पू. जिजी यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
  • सर्वांनाच ज्यांच्या मार्गदर्शनाची उत्सुकता होती, असे भारताचार्य सु.ग. शेवडे यांचा सत्कार त्यांच्या मार्गदर्शनापूर्वी प.पू. बाबांचे भक्त श्री. दीपक कुबल यांनी केला.

क्षणचित्रे

१. सभागृहात प्रवेश करण्यापूर्वी प.पू. बाबांचे छायाचित्र आणि भजनाच्या ओळी असलेले पदक उपस्थितांना देण्यात आले.
२. महोत्सवात प.पू. बाबांच्या अस्तित्वाची प्रचीती येऊन संपूर्ण वेळ वातावरण चैतन्याने भारलेले असल्याचे जाणवत होते.

वेदांचे पालन करणे, हे आपले कर्तव्य आहे ! – भारताचार्य सु.ग. शेवडे

विज्ञान म्हणजे विपरीत ज्ञान. यथार्थ ज्ञान प्राप्त होईपर्यंत जे अज्ञान असते, ते ज्ञान वाटते, याला विज्ञान म्हणतात. विज्ञानातून नव्हे, तर वेदांमधून ज्ञानाचे भांडार मिळते. भारताजवळ ज्ञान आहे, वेद आहेत. वेद म्हणजे ईश्‍वर ! वेदांचा सिद्धांत आजपर्यंत कधीच खोटा ठरला नाही. वेदांनुसार योग्य कर्म केल्यास कल्याण होते. वेदांचे पालन करणे हे आपले कर्तव्य आहे, असे मार्गदर्शन भारताचार्य सु.ग. शेवडे यांनी या सोहळ्यात केले.

सु.ग. शेवडेे पुढे म्हणाले की,

१. भारताला राजकीय परंपरेपेक्षा मोठी अशी संतपरंपरा लाभलेली आहे. नावे घ्यावी, तर ती संत आणि देव यांची !

२. हिंदु धर्माचा इतिहास लाखो वर्षांपूर्वीचा आहे. ‘आर्य हे उत्तर ध्रुवावरून आले’, असे सांगणार्‍यांना खरेतर ही चपराकच आहे. आपण म्हणतो की, युगे २८ विटेवरी उभा । या युगांच्या अंतर्गत कृत, त्रेता, द्वापर आणि कलि अशी ४ युगे असतात. प्रत्येक युगाची मिळून ४३ लाख वर्षे होतात. मग ४३ लाख गुणिले २८ युगे असे गणित मांडल्यास हिंदु धर्म किती पूर्वापारपासून चालत आलेला आणि महान आहे, हे लक्षात येते.

३. प्रत्येक कर्म करतांना धर्माचा आधार घेऊन जीवन जगावे. जो धर्माचे रक्षण करतो, त्याचेच धर्म रक्षण करतो.

४. अमेरिकेत आज ६०० हिंदु मंदिरे आहेत. प्रत्येक रविवारी तेथील नागरिक मंदिरात एकत्र जमून वेदाभ्यास करतात. हे भारतियांनी शिकण्यासारखे आहे.

सद्गुरूंचा प्रत्यय देणारे प.पू. भक्तराज महाराज म्हणजे मोठे व्यक्तिमत्त्व ! – भारताचार्य सु.ग. शेवडे

‘प.पू. भक्तराज महाराज यांच्या माध्यमातून मला सद्गुरूंचा ओतप्रोत प्रत्यय येतो. जेव्हा माझी त्यांच्याशी ओळख झाली, तेव्हा मला प.पू. बाबा म्हणजे इतके मोठे व्यक्तिमत्त्व आहे, हे ठाऊक नव्हते. आता त्यांची प्रचीती येते’, असे भावोद्गार भारताचार्य सु.ग. शेवडे यांनी त्यांच्या मार्गदर्शनाच्या प्रारंभीच काढले.

वयाच्या ८५ व्या वर्षीही पुष्कळ उत्साही असणारे सु.ग. शेवडे !

११ जानेवारीला सु.ग. शेवडे हे सहस्रो फूट उंचीवर असणार्‍या रसाळगड (रत्नागिरी) येथे ४०० पायर्‍या चढून प्रवचन देण्यासाठी गेले होते. रात्री विलंबाने ते तेथून घरी परतले आणि दुसर्‍या दिवशी म्हणजे, १२ जानेवारीच्या प.पू. बाबांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या सोहळ्याला ते सकाळी वेळेत उपस्थित राहिले. वयाच्या ८५ व्या वर्षीही त्यांचा असणारा उत्साह वाखाणण्यासारखाच होता !