राष्ट्र, धर्म आणि संस्कृती रक्षणासाठी हिंदु राष्ट्र स्थापनेची संधी गमावू नये ! – पुष्पेंद्र कुलश्रेष्ठी

खेड – आज राष्ट्र धर्मासमोर अनेक आव्हाने उभी आहेत. ही आव्हाने समजून घेतली पाहिजेत. आपण नेहमी सत्ता पालटतो; परंतु देशाची व्यवस्था पालटली जात नाही. औरंगजेबाच्या काळात जेवढा विध्वंस झाला नाही, तेवढा विध्वंस स्वतंत्र देशात काश्मीरमध्ये झाला आहे. हिंदूंवर अत्याचार झाले, स्त्रियांवर बलात्कार केले. हिंदूंना स्वत:च्या भूमीतून परागंदा व्हावे लागले. आजही देशात संसदेने संमत केलल्या कायद्याच्या विरोधात जाळपोळ, हिंसक आंदोलन करून शासनावर आणि हिंदूंवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. राष्ट्राला वाचवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गाने चालावे लागेल. धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणाच्या दृष्टीने निर्णय घेण्याची संधी प्राप्त झाली आहे. नाहीतर पुन्हा सहस्रो वर्षे जातील. हिंदु राष्ट्र स्थापनेची ही संधी गमावू नये, असे प्रतिपादन हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते श्री. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठी यांनी केले.

श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने मधुमकरंदगड ते रसाळगड अशी ८ ते १२ जानेवारी या कालावधीत धारातीर्थ यात्रा (गडकोट मोहीम) आयोजित केली आहे. या गडकोट मोहिमेत कांदोशी गावात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. रावसाहेब देसाई, अधिवक्ता पुष्कर दुर्गे, कांदोशी गावचे सरपंच अधिवक्ता वामन गांजेकर उपस्थित होते. या व्याख्यानाचा लाभ सहस्रो युवक आणि राष्ट्रप्रेमी यांनी घेतला. पू. संभाजी भिडेगुरुजी व्यासपिठासमोर धारकर्‍यांमध्ये भूमीवर बसले होते.

श्री. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठी पुढे म्हणाले की, गेल्या ७० वर्षांत देशात निर्माण झालेल्या देशद्रोही वृत्तीला बाहेर काढण्याची हीच वेळ आहे. पू. भिडेगुरुजींच्या मार्गदर्शनाखाली लाखो राष्ट्रप्रेमी तरुण संघटित झाला आहे. वर्ष २०१४ ला देशातील जनतेच्या विचारांची दिशा पालटली. नुसते पाणी, वीज, रस्ते बनवण्यासाठी आपण सरकारला निवडून दिलेले नसून हिंदूंसमोरील समस्या दूर करून सनातन हिंदु धर्माला वाचवण्यासाठी निवडून दिले आहे. धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी आपण कटीबद्ध व्हायचे आहे.

ज्यांनी नालंदा, तक्षशिला विद्यापीठे जाळली, अत्याचार केले आणि अजूनही ते करत आहेत. त्या सेक्युलरवाद्यांची प्रशंसा केली जाते. देशाचा इतिहास पाहा. हिंदु कधीच असहिष्णू नव्हते. वर्ष १९४७ मध्ये मुसलमानांनी आमची संस्कृती, विचारधारा वेगळी आहे असे सांगून देशाची फाळणी केली. आजही तीच विचारधारा आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांचे अपूर्ण राहिलेले कार्य पू. भिडेगुरुजी करत आहेत ! – नितीन चौगुले, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सांगली

छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांचे अपूर्ण राहिलेले कार्य पू. भिडेगुरुजी करत आहेत. आज देशात फुटीरतावादी काश्मीर, केरळ, पूर्वेकडील राज्ये स्वतंत्र राष्ट्राची मागणी करत आहेत. त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार ठाऊक आहे का ? पू. भिडेगुरुजींवर कोरेगाव-भिमा हिंसाचार प्रकरणी आरोप झाले; मात्र पू. भिडेगुरुजींचे कार्य शेकडो पटींनी वाढले.