(म्हणे) ‘हिंदु हा धर्म नसून संस्कृती आहे !’ – ज्येष्ठ साहित्यिक(?) प्रतिभा रानडे

धाराशिव येथील मराठी साहित्य संमेलनात प्रकट मुलाखत

धाराशिव – माणसाने धर्माचा बडेजाव केला; पण संस्कृती धर्माहून श्रेष्ठ आहे. (संस्कृती ही धर्मानेच ओळखली जाते. धर्म संस्कृतीतूनच व्यक्त होत असतो. हिंदु धर्म आणि संस्कृती अभिन्न असल्यामुळे आजपर्यंत अनेक अन्य संस्कृती उदयास आल्या आणि लयास गेल्या. हिंदु संस्कृतीचे तसे झाले नाही. अविनाशी हिंदु धर्माचे अधिष्ठान असल्यामुळे हिंदु संस्कृती युगानुयुगे टिकून आहे, हे प्रतिभा रानडे लक्षात घेतील का ? – संपादक) हिंदु हा धर्म नाही तर ती संस्कृती आहे. निसर्गाची पूजा करणे हा सर्वांत मोठा धर्म आहे. आज धर्माचा वापर सत्तेवर येण्यासाठी, भांडणे करण्यासाठी, तसेच पैसा मिळवण्यासाठी केला जात आहे, असे विचार ज्येष्ठ साहित्यिका प्रतिभा रानडे यांनी मांडले. येथील मराठी साहित्य संमेलनाच्या दुसर्‍या दिवशी झालेल्या प्रकट मुलाखतीत त्या बोलत होत्या. दासू वैद्य आणि सारंग दर्शने यांनी ही मुलाखत घेतली.

या वेळी प्रतिभा रानडे पुढे म्हणाल्या, ‘‘माझा देवावर विश्‍वास नाही. हिंदु धर्मातील देव एकमेकांशी भांडले आहेत. राम आणि कृष्ण ही महाकाव्यातील माणसे आहेत, ते देव नाहीत. सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावणारा राम महापुरुष कसा असू शकतो ?’’ (प्रत्येक वाक्यातून स्वत:चे अज्ञान प्रकट करणारे आणि देवाला न मानणारे स्वत: देवतांचे श्रेष्ठत्व ठरवतात, त्यांच्याविषयी विधाने करतात याहून हास्यास्पद काही असू शकते का ? श्रीरामाला समजून घेण्यासाठी तर त्याची भक्तीच करावी लागते. तेव्हा कोठे त्याच्या अंशरूपाची ओळख होते. – संपादक) मुसलमान महिलांच्या प्रश्‍नांशी कशा जोडल्या गेल्या ?, या प्रश्‍नावर उत्तर देतांना प्रतिभा रानडे यांनी सांगितले की, काबूलमध्ये असतांना तेथे मद्यबंदी होती. त्यामुळे तेथील मंडळी आमच्या घरी येऊन मद्यपान करत होते. यासाठी मी त्यांना त्यांच्या बायकांनाही घेऊन येण्याची अट घातली. तसे त्यांनी केले, तेव्हा या मुसलमान महिलांशी हितगुज करण्याची संधी मिळाली. मी एकदा बुरखा घातला, तेव्हा मला मुसलमान महिलांचे मन समजले. (मुसलमान महिलांचे मन समजल्यावर प्रतिभा रानडे यांनी बुरख्यावर बंदी आणण्यासाठी व्यापक लढा का उभा केला नाही ? तसेच महिलांना मशिदीमध्ये प्रवेश मिळावा यासाठी त्या का बोलत नाहीत ? – संपादक)