२ आतंकवाद्यांसह राष्ट्रपतीपदक विजेत्या पोलीस उपअधीक्षकाला अटक

  • काश्मीरमध्ये पोलिसांनी आतंकवाद्यांशी केलेली हातमिळवणी, हे राष्ट्राच्या सुरक्षेसाठी अत्यंत घातक आहे. पैशांच्या लोभाने राष्ट्राशी प्रतारणा करणार्‍या अशांना फासावर लटकवणे आवश्यक !
  • जनतेचे रक्षक नव्हे, तर भक्षक बनलेले पोलीस ! गुन्हेगार आणि आता आतंकवादी यांच्याशी संबंध असणार्‍या पोलिसांचा भरणा असलेले पोलीसदल जनतेचे आतंकवाद्यांपासून रक्षण काय करणार ?

श्रीनगर – येथील कुलगाम येथून हिजबूल मुजाहिदीन या आतंकवादी संघटनेच्या २ आतंकवाद्यांसह जम्मू-काश्मीर पोलीसदलाचे राष्ट्रपतीपदक विजेते पोलीस उपअधीक्षक देविंदर सिंह यांना अटक करण्यात आली आहे. सुरक्षादलाच्या सैनिकांनी कुलगाम जिल्ह्यातील काजीगुंडच्या मीर बाजार परिसरात हिजबूल मुजाहिदीनचा वरिष्ठ कमांडर आसिफ राथर आणि सय्यद नवीद मुश्ताक उपाख्य नवीद बाबू या २ आतंकवाद्यांसह एका चारचाकी वाहनाने जात असतांना देविंदर सिंह यांना कह्यात घेण्यात आले. (या प्रकरणी पोलीस उपअधीक्षकांची कसून चौकशी करण्यासह त्यांनी केलेल्या अन्य अन्वेषणांचीही सखोल चौकशी करणे आवश्यक ! – संपादक)

पोलीस उपअधीक्षक देविंदर सिंह यांना गेल्या वर्षी १५ ऑगस्टला राष्ट्रपतीपदकाने गौरवण्यात आले होते. त्या वेळी ते जम्मू-काश्मीर पोलिसांच्या ‘एन्ट्री हायजॅकिंग’ पथकात कार्यरत होते. आता त्यांची नियुक्ती श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात झाली होती. ‘ते आतंकवाद्यांना काश्मीर खोर्‍यातून बाहेर पळून जाण्यास साहाय्य करत होते’, असा त्यांच्यावर आरोप आहे. सिंह यांना अटक केल्यानंतर त्यांच्या घरावर तात्काळ धाड घालण्यात आली. त्या वेळी त्यांच्या घरी ५ ग्रेनेड आणि ३ ‘एके ४७’ रायफली सापडल्या आहेत.