(म्हणे) ‘डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचीही नावे संतांच्या सूचीत जोडता येतील; कारण त्यांनी सत्याचा अंत पाहिला !’

  • साहित्यिक धनराज वंजारी यांची बौद्धिक दिवाळखोरी !
  • संत कोणाला म्हणावे, याविषयी असे साहित्यिकच किती अज्ञानी आहेत, हे लक्षात येते. ज्यांनी सातत्याने हिंदु धर्म आणि देवता यांवर अश्‍लाघ्य भाषेत टीका केली, अंधश्रद्धेच्या नावाखाली श्रद्धेवर घाला घातला, अशांना संत म्हणणे, हा ‘संत’ या शब्दाचा अवमानच होय. यावरून साहित्य संमेलनाच्या व्यासपिठाचा कसा अपवापर केला जात आहे, हे लक्षात येते !

धाराशिव, १२ जानेवारी (वार्ता.) – संतांनी जगण्याचे मर्म सांगितले. जे सत्याचा अंत पाहतात, ते खरे संत आहेत. (असा जावईशोध लावणार्‍यांना उद्या कोणी पुरस्काराने सन्मानित केले, तर आश्‍चर्य वाटायला नको ! – संपादक) असे केल्यास डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचीही नावे संतांच्या सूचीत जोडता येतील; कारण त्यांनी सत्याचा अंत पाहिला. स्वत:वरील विश्‍वास अल्प असून ज्याची दुसर्‍यावर श्रद्धा आहे तो अंधश्रद्धेच्या आहारी जातो. बुवाबाजी केवळ धर्मामध्ये नाही, तर अन्य क्षेत्रांमध्ये वाढलेली आहे.

आसाराम बापू, राम रहिम यांच्यासारख्या भोंदूंना योग्य ती शिक्षा दिली गेली. त्यामुळे ‘दिसत तसे नसते’, हे लक्षात घेऊन अंधश्रद्धेपासून दूर राहा, असे विधान साहित्यिक धनराज वंजारी यांनी केले. वंजारी हे येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसर्‍या दिवशी ‘संत साहित्याचे सामाजिक दृष्टीने पुरेसे आकलन न झाल्यामुळे समाजात बुवाबाजीचे प्रस्थ वाढले किंवा वाढत आहे’ या विषयावरील परिसंवादात बोलत होते.

या परिसंवादात संत साहित्याचेच दाखले देत ‘संतांनीही अंधश्रद्धा आणि बुवाबाजीचा कसा विरोध केला आहे’, हे सांगून संतसाहित्याचा विषय भरकटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या परिसंवादात डॉ. मुरहरी केळे, डॉ. मार्तंड कुलकर्णी, डॉ. सचिन जाधव, डॉ. सोमनाथ कोमरपंत आणि प्रकाश एदलाबादकर यांनीही त्यांचे विचार मांडले.

… अन् मराठी साहित्य संमेलनात रंगली ‘सनातन प्रभात’विषयी चर्चा !

धाराशिव, १२ जानेवारी (वार्ता.) – येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसर्‍या दिवशी ‘संत साहित्याचे सामाजिक दृष्टीने पुरेसे आकलन न झाल्याने समाजात बुवाबाजीचे प्रस्थ वाढले किंवा वाढते आहे’ या परिसंवादात ‘आपले मन’ या दैनिकाचे संपादक डॉ. जगन्नाथ पाटील यांनी व्यासपिठावर येऊन स्वत:चे मत मांडण्याची संधी मागितली; पण त्यांना बोलण्याची संधी नाकारण्यात आली. या वेळी डॉ. जगन्नाथ पाटील हे हातात काही वृत्तपत्रे आणि न्यायालयीन लढ्याची कागदपत्रे घेऊन व्यासपिठावर आले होते. या वेळी संयोजकांनी त्यांना खाली उतरवले. त्याच वेळी संयोजक आणि तेथे उपस्थित यांच्यामध्ये ‘डॉ. पाटील त्यांच्या हातात दैनिक ‘सनातन प्रभात’ होते का ?’, अशी चर्चा झाली.
(हिंदूंच्या देवता, धर्मग्रंथ आणि परंपरा यांच्यावर आघात झाल्यास ‘सनातन प्रभात’ त्याची नोंद घेऊन त्याचे वैचारिक खंडण करतो, हे आता कथित बुद्धीजिवी, विचारवंत आणि पुरोगामी यांनाही कळून चुकले आहे. या चर्चेतून हेच सूत्र पुन्हा एकदा अधोरेखित झाले ! ‘सनातन प्रभात’मुळे हिंदुविरोधकांवर जरब बसली आहे, हेही तितकेच खरे ! – संपादक)