नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी म. गांधी यांनी जे सांगितले, त्याचे आम्ही पालन केले ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

कोलकाता – देशाची फाळणी झाल्यामुळे पाकिस्तानमध्ये राहिलेल्या ज्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, धर्माच्या नावाखाली अत्याचार झाले, त्यांना भारताचे नागरिकत्व द्यायला हवे, असे म. गांधी आणि अन्य ज्येष्ठ नेते यांचे मत होते. ती पूर्तता नागरिकत्व सुधारणा कायद्याद्वारे करण्यात आली आहे. जे म. गांधी यांनी सांगितले, त्याचे आम्ही पालन केले, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. येथील बेलूर मठाला पंतप्रधान मोदी यांनी भेट देऊन स्वामी विवेकानंद यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर उपस्थित तरुणांना संबोधित करतांना ते बोलत होते. ते म्हणाले की, आजही कोणत्याही धर्माची व्यक्ती जिचा भारताच्या राज्यघटनेवर विश्‍वास आहे, ती प्रक्रियेनुसार भारतीय नागरिकत्व मिळवू शकते.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की,

१. नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी देशातील तरुणांच्या मनात अनेक प्रश्‍न आहेत. काही जणांनी तरुणांच्या मनात हेतूपुरस्सर या कायद्याविषयी शंका निर्माण केल्या आहेत; मात्र मी देशभरातील तरुणांना सांगू इच्छितो की, देशाचे नागरिकत्व देण्यासाठी सरकारने रातोरात कुठलाही कायदा बनवलेला नाही. अनेक तरुण या अफवांचे बळी ठरले आहेत. त्या तरुणांना समजावून सांगणे, हे आमचे कर्तव्य आहे.

२. नागरिकत्व कायदा हा कोणाचेही नागरिकत्व काढून घेणारा नव्हे, तर ते बहाल करणारा कायदा आहे. हा कायदा लागू झाल्यानंतर ‘स्वतःच्या भूमीत अल्पसंख्यांकांवर अत्याचार का केले ?’, याचे उत्तर पाकला द्यावे लागेल.

३. बंगालमधील सरकार केंद्र सरकार राबवत असलेल्या ‘आयुष्मान भारत’ आणि ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी’ या योजनांच्या कार्यवाहीला मान्यता देईल, त्या वेळी येथील लोकांना या योजनांचा लाभ मिळेल. या योजनांना सरकार मान्यता देईल कि नाही, हे मी सांगू शकत नाही. योजनेद्वारे ‘कट मनी’ (काम देण्याच्या बदल्यात पैसे उकळणे) मिळत नसल्याने राज्य सरकार केंद्राच्या योजना लागू करत नाही.

(यावरून ममता बॅनर्जी यांच्या सरकारच्या काळात बंगालमध्ये किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे, हेच दिसून येते ! – संपादक) त्यामुळे या योजना कोण लागू करणार ?, असा प्रश्‍न करत त्यांनी राज्य सरकारवर आरोप केला.

‘कोलकाता पोर्ट’ आता ‘डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी’ यांच्या नावाने ओळखला जाणार !

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी बंगालच्या औद्योगिकरणाचे स्वप्न पाहिले होते. ‘चित्तरंजन लोकोमोटीव्ह फॅक्टरी’, ‘हिंदुस्थान एअरक्राफ्ट फॅक्टरी’, ‘सिंदरी फर्टिलायझर’, आणि ‘दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन’ अशा अनेक मोठ्या योजनांच्या विकासामध्ये डॉ. मुखर्जी यांचे बहुमूल्य योगदान आहे. त्यामुळे ‘कोलकाता पोर्ट’ला ‘डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी पोर्ट’ असे नाव देण्यात येत आहे, अशी घोषणाही पंतप्रधान मोदी यांनी या वेळी केली.