पाकने आतंकवाद्यांना साहाय्य करू नये ! – अमेरिकेतील पाक नागरिकांची मागणी

पाक अमेरिकेचे ऐकत नाही, आंतरराष्ट्रीय संघटनांचे ऐकत नाही, तेथे या नागरिकांचे तो ऐकणार आहे का ? स्वत:च्या नागरिकांचे न ऐकणारा पाक अन्य देशांचे कधी ऐकेल का ?

वॉशिंग्टन – अमेरिकेत राहणार्‍या पाकिस्तानी नागरिकांच्या एका गटाने पाकिस्तानी सैन्य आणि आतंकवादी गट यांच्यातील साटेलोटे असल्याविषयी जोरदार टीका केली आहे. ‘पाक सैन्याने आतंकवादी संघटनांकडून कोणत्याही प्रकारचे साहाय्य घेणे किंवा त्यांना साहाय्य करणे निंदनीय आहे. पाकने राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर या आतंकवादी संघटनांचा उपयोग करणे बंद केले पाहिजे’, अशी मागणी या नागरिकांच्या गटाने केली. तसेच त्यांनी पाकमधील नागरिकांच्या होणार्‍या मूलभूत स्वातंत्र्याच्या पायमल्लीविषयी चिंता व्यक्त केली आहे. पाक नागरिकांच्या या गटातील सदस्यांनी ‘आतंकवाद आणि मानव अधिकार’ या विषयावरील ‘दक्षिण आशियाई संमेलना’त ही मागणी केली.

या गटाने म्हटले आहे की,

१. बलुचिस्तान प्रांतात सैन्याकडून नागरिकांचा होणारा छळ थांबवावा. सहस्रो बेपत्ता व्यक्तींची नोंद सुरक्षायंत्रणांकडे असावी. या प्रकरणी उपाययोजना काढण्यासाठी पाक सरकारने आयोग नेमावा.

२. पाकमध्ये वारंवार सैन्याच्या होत असलेल्या हस्तक्षेपामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या स्वातंत्र्यात बाधा निर्माण होत आहे. पाकिस्तानी नागरिक आणि राजकीय पक्ष यांनी ‘देशात राज्यघटनेनुसार अन् कायद्यानुसार शासन असावे’, यासाठी आग्रह धरावा.

३. या संमेलनामध्ये अमेरिकेतील प्रमुख पत्रकार महंमद टकी, अमेरिकेचे माजी सिनेटर (खासदार) अफरासीब खट्टक, माजी राजदूत कामरान शफी, ‘डेली टाइम्स’ या नियतकालिकाचे माजी संपादक रहमान, पत्रकार ताहा सिद्दीकी, गुल बुखारी आणि मारवी सिरमेड हे सहभागी झाले होते. यापूर्वी वर्ष २०१६ आणि वर्ष २०१७ मध्ये लंडनमध्ये आणि वर्ष २०१८ मध्ये वॉशिंग्टनमध्ये ‘दक्षिण आशियाई संमेलन’ आयोजित करण्यात आले होते.

पाक हाच आतंकवादी संघटनांचा पोशिंदा ! – अमेरिकेच्या अहवालातील माहिती

आंतरराष्ट्रीय स्तरावरही पाकवर अनेक आरोप करण्यात आले आहेत. अमेरिकेने एका अहवालात म्हटले आहे की, गेल्या वर्षी पाकने लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-महंमद या जिहादी आतंकवादी संघटनांविरुद्ध कारवाई केली नाही. या आतंकवादी संघटना पाककडून संचालित केल्या जात आहेत. या आतंकवाद्यांना पाकमध्येच प्रशिक्षण दिले जाते. पाक सरकार आतंकवाद्यांचे पोषण करत आहे. तेथे सक्रीय असलेले हे आतंकवादी सतत सैन्य आणि तेथील नागरिक यांना लक्ष्य करत आहेत. या आतंकवादी संघटनांना पाककडून आर्थिक साहाय्य करण्यात येते. या संघटनांकडून भारताला धोका निर्माण झाला आहे. याविषयी भारताकडून व्यक्त करण्यात आलेली चिंता योग्य आहे.’