कृतज्ञताभावाचे मूर्तीमंत रूप असणार्‍या सनातनच्या ३६ व्या संत पू. (श्रीमती) शालिनी नेनेआजी यांचा देह पंचतत्त्वांत विलीन !

पू. नेनेआजी यांचे पार्थिव

देवद (पनवेल), १२ जानेवारी (वार्ता.) – पू. (श्रीमती) शालिनी नेनेआजी (वय ९६ वर्षे) यांनी पौष पौर्णिमा, म्हणजेच १० जानेवारी या दिवशी येथील सनातनच्या देवद आश्रमात देहत्याग केला. ११ जानेवारी या दिवशी देवद येथील स्मशानभूमीत २ वाजून २५ मिनिटांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हस्तस्पर्श केलेला पुष्पहार पू. नेनेआजी यांना अर्पण करतांना सद्गुरु राजेंद्र शिंदे

पू. (श्रीमती) शालिनी नेनेआजी यांच्या देहत्यागानंतर सनातनच्या देवद आश्रमातील सद्गुरु राजेंद्र शिंदे, पू. (सौ.) अश्‍विनी पवार, पू. रमेश गडकरी, पू. गुरुनाथ दाभोलकर, पू. दत्तात्रेय देशपांडे, पू. बलभीम येळेगावकर, पू. सुदामराव शेंडे, पू. शिवाजी वटकर, तसेच पू. (श्रीमती) शालिनी नेनेआजी यांच्या कन्या श्रीमती अनुपमा देशमुख, स्नुषा श्रीमती जयश्री नेने आणि डॉ. (सौ.) कुंदाताई आठवले यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. या वेळी पू. आजींचे नातू श्री. ऋषिकेश नेने, पुतणी श्रीमती हेमा करमरकर, नात सौ. शीतल मुंगी, नातजावई श्री. आनंद मुंगी हेही उपस्थित होते. पू. (श्रीमती) नेनेआजी यांच्या पश्‍चात मुलगी श्रीमती अनुपमा देशमुख, १ मुलगा, २ सुना, १ नात आणि नातजावई, ४ नातू, २ नातसुना आणि ५ पतवंडे असा परिवार आहे.

पू. आजींच्या निर्वाण यात्रेची गाडी झेंडूच्या फुलांनी सजवली होती. त्यामध्ये झेंडूच्या फुलांनी सजवलेल्या पलंगावर त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. निर्वाण यात्रेच्या वेळी प.पू. भक्तराज महाराज यांची चैतन्यदायी भजने लावण्यात आली.

अंत्यसंस्काराची जागा फुलांनी सजवलेली आणि शेणाने सारवलेली होती. अंत्यविधी भावपूर्ण वातावरणात करण्यात आले. अंतिम क्षणी सनातनचे सद्गुरु, संत आणि पू. आजींचे नातलग यांनी त्यांच्या पार्थिवावर चंदनाच्या लाकडाचे तुकडे ठेवून अन् त्यांना चरणस्पर्श करून त्यांचे दर्शन घेतले. सनातनचे साधक श्री. शशांक जोशी यांनी त्यांना मंत्राग्नी दिला.

९६ वर्षीय पू. आजींचे गेली ६ वर्षे देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्य होते. त्यांच्या आनंदी आणि प्रेमळ स्वभावामुळे सर्व साधकांना त्यांच्या सहवासात आनंद मिळत असे.

पू. (श्रीमती) नेनेआजी यांची निर्वाणयात्रा आणि अंत्यसंस्कार या वेळची क्षणचित्रे

  • पू. आजींचे पार्थिव उचलतांना सर्वांनी प.पू. भक्तराज महाराज यांंचा जयघोष केला.
  • निर्वाणयात्रेच्या वेळी ‘चला जाऊ नाथ सदनाला’, ‘मंगलात झाले मंगल ।’ आणि ‘शेवटी तुम्हा दीन विनवणी ।’ ही संतांच्या आवाजातील भजने लावण्यात आल्याने चैतन्यात अधिक भर पडून साधकांचा भाव जागृत झाला.
  • स्मशानभूमीत प.पू. भक्तराज महाराज आणि श्रीकृष्ण यांचा जयघोष करून नंतर पू. आजींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
  • पू. आजींचा अंत्यविधी चालू असतांना रस्त्यावरून ये-जा करणार्‍या गाड्यांमधील व्यक्ती नमस्कार करून पुढे जात होत्या.
  • ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे सनातनचे साधक श्री. विनायक आगवेकर यांनी पू. आजींच्या नातेवाइकांना या वेळी अंत्यविधीतील विविध कृतींची माहिती दिली.
  • निर्वाणयात्रेच्या वेळी, तसेच स्मशानभूमीच्या ठिकाणीही वातावरण उत्साही आणि चैतन्यमय जाणवत होते.
  • ‘पू. आजींच्या चितेच्या ज्वाळांची भगभग न होता त्या शांतपणे वर जात आहेत’, असे साधकांना जाणवले.
  • ‘सगळीकडच्या ज्वाळा एकत्रित येऊन एका रेषेत वर जात होत्या’, असेही अंत्यसंस्कारांच्या वेळी साधकांच्या लक्षात आले.
  • पू. आजींचे अंत्यसंस्कार होत असतांनाही वातावरण शांत होते आणि सर्वत्र थंडावा जाणवत होता.

पू. (श्रीमती) शालिनी नेनेआजी यांच्या निर्वाण यात्रेपूर्वी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हस्तस्पर्श केलेला पुष्पहार त्यांना अर्पण केला. पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांनी पू. आजींना तुळशीचा हार अर्पण केला. त्यानंतर सनातनच्या आश्रमातील साधकांनी पू. (श्रीमती) शालिनी नेनेआजी यांचे भावपूर्ण दर्शन घेतले, तसेच चैतन्याचा लाभ होण्यासाठी प्रार्थना केली. निर्वाणानंतरही पू. आजींचे मुखमंडल आनंदी आणि सजीव वाटत होते.

 पू. (श्रीमती) नेनेआजी यांच्या देहत्यागाच्या वेळची वैशिष्ट्यपूर्ण क्षणचित्रे

१. पू. आजींनी १० जानेवारीला दुपारी २ वाजून ५३ मिनिटांनी देह ठेवला. देह ठेवण्यापूर्वी काही वेळ आधी पू. आजींनी दोन वेळा ‘राम’नामाचे उच्चारण केले.

२. देह ठेवल्यावर संध्याकाळी ५.३० वाजता त्यांच्या खोलीबाहेर मोगर्‍याचा सुगंध दरवळू लागला.

३. सायंकाळी ५ वाजता पू. आजींच्या अनाहतचक्रावर ‘ॐ’ चे शुभचिन्ह आल्याचे लक्षात आले.

बुद्धीअगम्य घटना !

देहत्यागानंतर १९ घंटे उलटूनही पू. नेनेआजी यांच्या शरिराचा लवचिकपणा टिकून होता !

पू. नेनेआजींनी १० जानेवारीला दुपारी २.५३ वाजता देहत्याग केला होता. त्यांना दुसर्‍या दिवशी, म्हणजे ११ जानेवारीला सकाळी ९.३० वाजता त्यांना आसंदीत बसवून अंघोळ घालण्यात आली. देहत्यागानंतर १९ घंटे उलटूनही त्यांचे शरीर पुष्कळ लवचिक होते. सामान्यतः मृत व्यक्तीचे शरीर २ ते ३ घंट्यांत कडक होते; पण पू. आजींच्या संदर्भात तसे झाले नाही.

पू. आजींच्या संतत्वाची प्रचीती देणारी उदाहरणे !

निर्वाणयात्रा चालू असतांना देवद येथील स्मशानभूमीकडे जाणार्‍या एका दुचाकीस्वाराने गाडी थांबवली आणि २ मिनिटे हात जोडून तेे उभे राहिले. ‘ही निर्वाणयात्रा पाहिल्यानंतर मला काहीतरी वेगळे जाणवले म्हणून मी येथे हात जोडून थांबलो होतो’, असे ते म्हणाले. एका चारचाकी चालकानेही लांबूनच चितेकडे पाहून भावपूर्ण नमस्कार केला. पू. आजींविषयी माहिती नसूनही त्यांच्या चैतन्याची अनुभूती गावकर्‍यांनी घेतल्याचे त्यांच्या कृतीतून लक्षात आले.

अग्नीसंस्कारानंतर पू. (श्रीमती) नेनेआजी यांच्याविषयी सद्गुरु आणि संत यांनी काढलेले गौरवोद्गार !

१. पू. नेनेआजी यांचा आदर्श सर्वांनी घ्यायला हवा ! – सद्गुरु राजन शिंदे

१ अ. व्याधीग्रस्त असूनही सतत आनंदी असणार्‍या पू. नेनेआजी ! : पू. नेनेआजी यांच्यामध्ये पुष्कळ प्रीती होती. त्यांना भेटण्याचा मला अनेक वेळा योग आला. त्या वेळी पू. आजींच्या तोंडवळ्यावर नेहमी गोड हास्य दिसायचे. त्यांना अनेक व्याधी असतांनाही ‘त्या सतत आनंदी आहेत’, असे जाणवायचे. वयोमानानुसार अनेकांना विविध समस्या असतात; मात्र पू. नेनेआजी दुःखी असल्याचे अथवा त्या झोपून राहिल्याचे मी कधीही पाहिले नाही. त्यांचा तोंडवळा नेहमी हसरा असे, तसेच तो अत्यंत तेजस्वीही झाला होता.

१ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अखंड कृतज्ञताभावात असणार्‍या पू. आजी ! : पू. आजी सतत परात्पर गुरु डॉ. आठवले यांची आठवण काढून नामजपही करायच्या. त्यांनी आतापर्यंत किती वेळा कृतज्ञता व्यक्त केली असेल, याला मर्यादाच नाही ! ‘मला प.पू. डॉक्टरांनी आश्रमात आणले, हे छान झाले’, असे त्या म्हणायच्या. त्यांच्या खोलीत आणि स्नानगृहात विविध सुविधा उपलब्ध करून दिल्याविषयी त्यांनी ‘प.पू. डॉक्टरांच्या कृपेने मला सुविधा मिळतात’, असे म्हणून अनेकदा पुष्कळ प्रमाणात कृतज्ञता व्यक्त केली. त्या नेहमी कृतज्ञताभावात असायच्या.

१ इ. उत्तम स्मरणशक्ती : त्यांचे वय अधिक असले, तरी त्यांची स्मरणशक्ती पुष्कळच चांगली होती. त्यांचा आवाज उत्तम असल्याने त्या भावगीते, भक्तीगीते उत्तम म्हणायच्या. त्यांना वाचनाचीही आवड होती. धार्मिक ग्रंथ हातात धरून वाचता येत नसतांनाही त्या भिंतीला ग्रंथ टेकवून पाने पालटून ग्रंथवाचन करत होत्या. त्यांचा आदर्श आपण सर्वांनी घ्यायला हवा. त्यांनी येथे देह सोडला, तरी सूक्ष्मातून त्या आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत.

२. पू. रमेश गडकरी

‘परिस्थिती कशीही असो, ती कशी स्वीकारायची ? वृद्धावस्था असतांना परिस्थिती स्वीकारून आनंदी कसे राहायचे ?’, हे पू. आजींकडून शिकायला मिळाले.

पू. (श्रीमती) नेनेआजी यांची मुलगी आणि पुतणी यांनी व्यक्त केलेले मनोगत

१. ‘आई (पू. आजी) नावाप्रमाणेच गुणवान होती !’ – श्रीमती अनुपमा देशमुख (पू. (श्रीमती) नेनेआजी यांची मुलगी)

आई रूपवान होती, तसेच नावाप्रमाणे शालीनही होती. आम्ही लहान असतांना शाळेतील स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या वेळी माझ्या मैत्रिणी ‘सुधा नेनेची (श्रीमती अनुपमा यांचे पूर्वाश्रमीचे नाव) आई आली’, असे म्हणून आईला पाहण्यासाठी यायच्या. आईच्या सहवासात असतांना मला तिचे अनेक गुण शिकायला मिळाले. तिने नावाप्रमाणे तसे सिद्ध करून दाखवले. माझ्या मुलांना ती श्रीकृष्णाच्या गोष्टी सांगायची. मला अशी आई मिळाल्याविषयी मी अत्यंत भाग्यवान आहे. माझी मुले आणि नातवंडे यांचे आजीवर प्रेम होते अन् आजीचेही त्यांच्यावर प्रेम होते. माझ्या यजमानांचे निधन झाल्यावर आई माझ्याकडे अनेक वर्षे राहत होती. मला आईचा पुष्कळ सहवास मिळाला. या काळात मला तिच्याकडून भरपूर शिकायला मिळाले. आई सनातनच्या आश्रमात आल्यामुळे ती पुष्कळ भाग्यवान ठरली आणि मी तिची मुलगी असल्यामुळे मीही पुष्कळ भाग्यवान आहे.

२. ‘पू. आजींप्रमाणे आजची स्त्री ही ‘शिकवणारी’ असायला हवी !’ – श्रीमती हेमा करमरकर (पू. (श्रीमती) नेनेआजी यांची पुतणी) 

पू. आजींनी सर्वांना जोडलेले होते. त्यांना आम्ही लहानपणी ‘बाई’ अशी हाक मारत होतो. त्या आमच्यासाठी ‘बाई’च (शिक्षिका) होत्या. पू. आजींप्रमाणे आजची स्त्री ही ‘शिकवणारी’ असायला हवी. लहानपणापासून आम्हाला त्यांच्याकडून ‘विविध पदार्थ कसे करायचे ?’ हेही शिकायला मिळाले.

या वेळी पू. आजींच्या उपस्थित नातेवाइकांनी नामजप केला. पू. आजींच्या नातेवाइकांनी अंत्यविधीतील विविध कृती आस्थेने जाणून घेतल्या. साधकांनी पू. आजींच्या अंत्यविधीची केलेली सिद्धता पाहून त्यांना गहिवरून आले.