खर्‍या विवेकाचा आवाज !

संपादकीय

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी ५६ पानी भाषणांतून जुने-जाणते (?) ज्ञान पाजळल्यानंतर त्याविरुद्ध आता साहित्यिकांमधूनच निषेधाचे सूर उमटत आहेत. एवढ्या लांबलेल्या भाषणात दिब्रिटो यांनी जे.एन्.यू.च्या घटनेपासून महाराष्ट्रातील विचारवंतांच्या हत्या, शेतीचे प्रश्‍न असे अनेक विषय हाताळले; मात्र साहित्य संमेलन ज्या मराठी भाषेच्या संवर्धनासाठी होते, त्याविषयी ना काहीच उल्लेख केला ना मराठी साहित्याच्या पुढील वाटचालीविषयी सांगितले. या भाषणाचा संमेलनाच्या माजी अध्यक्षा प्रा. अरुणा ढेरे यांनी खरपूस समाचार घेतला. ‘देशात हिटलरशाही वाढत आहे’, या दिब्रिटो यांच्या विधानाचा प्रतिवाद करतांना प्रा. ढेरे यांनी ‘देश कोणत्याही हिटलरशाहीच्या उंबरठ्यावर उभा नाही. सर्व सुजाण असतांना असे शक्य नाही. असे विषय मांडून भलत्याच सूत्राकडे लक्ष वेधण्याचा दिब्रिटो यांचा प्रयत्न दिसतो’, असा घणाघात केला. एका माजी संमेलनाध्यक्षाने आजी संमेलनाध्यक्षाच्या भाषणाचा संमेलन काळातच प्रतिवाद करण्याचा असा प्रसंग विरळाच !

एरव्ही दिब्रिटो यांच्या भाषणाला कोणी विरोध केला असता, तर त्यांना ‘प्रतिगामी’, ‘कट्टर’ अथवा ‘धर्मांध’ असे हिणवले गेले असते. ‘तुम्हाला साहित्यातील काय कळते ?’, असेही प्रश्‍न विचारले गेले असते. ‘पुरोगामित्वाचा आवाज रोखण्याचा प्रयत्न’, अशीही निर्भत्सना केली असती; मात्र प्रा. ढेरे या प्रथितयश साहित्यिक. साहित्य वर्तुळात त्यांचे स्थानही मोठे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला महत्त्व आहे. साहित्य क्षेत्रातूनच असा आवाज उठणे, हा शुभसंकेत म्हणावा लागेल. एरव्ही ‘विवेकाचा आवाज’ म्हणत अविवेकी बोलण्याची आणि वागण्याची पुरोगाम्यांना सवय जडली आहे. साहित्य संमेलन म्हणजे ‘हिंदुत्वनिष्ठ वगळून उर्वरित सर्व’ असा पायंडा पडला आहे. यामुळेच तर हिंदुत्वनिष्ठ आणि भाषाप्रभुत्व असलेले पु.भा. भावे यांच्या अध्यक्षतेखाली चालू झालेले संमेलन उधळून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. हिंदुत्वनिष्ठ साहित्यिक हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच आहेत. त्यातही अशा साहित्यिकांना साहित्य संमेलनाची पायरी अजूनही चढू देण्यात येत नाही. त्यामुळे मराठी भाषेविषयी आत्यंतिक ओढ असूनही त्यांना कधी त्यांची सूत्रे मांडता येत नाहीत ना पुरोगाम्यांनी निर्माण केलेले वैचारिक प्रदूषण थांबवण्यासाठी दिशादर्शन करण्याची संधी मिळते. ही खंत हिंदुत्वनिष्ठ साहित्यिक अजूनही बोलून दाखवतात. परिणामी पुरो(अधो)गाम्यांना वाटेल ते बरळायला मैदान मोकळे मिळते. आधीच पुरोगामी, त्यात साहित्यिक आणि त्यात संमेलनाचे व्यासपीठ म्हणजे सांस्कृतिक बुरख्याखाली वैचारिक आतंकवाद प्रसारित करण्याचाच उद्योग नाही का ? अशा वेळी प्रा. अरुणा ढेरे यांनी विवेकाचा आवाज जाणून दिब्रिटो यांच्याविरुद्ध षड्डू ठोकणे, हे साहित्यप्रेमींना आश्‍वस्त करणारे वाटले. अन्य साहित्यिकांनीही विवेकाच्या आवाजाकडे लक्ष देऊन पुरोगामित्वाची झापडे दूर सारावीत; म्हणजे नेमके कोणती दिशा घ्यायची, हे त्यांना लख्ख प्रकाशाप्रमाणे अवगत होईल हे निश्‍चित !

संतांची शिकवण !

‘संत साहित्याचे सामाजिक दृष्टीने पुरेसे आकलन न झाल्याने समाजात बुवाबाजीचे प्रस्थ वाढले का ?’ हा साहित्य संमेलनातील परिसंवादाचा एक विषय होता. हा विषय मुळातच चुकला. संत साहित्याचे सामाजिक आकलन म्हणणे ‘रसायनशास्त्राचे भौतिकदृष्ट्या आकलन होणे’, असे म्हणण्यासारखे आहे. संत साहित्याचा प्रांत अध्यात्म लिखाणाचा. त्यात भावार्थ महत्त्वाचा असतो. संत स्वत: साधना करून अध्यात्मातील पुढील अनुभूती घेऊन आत्मज्ञानाने लिखाण करत असतात. त्याला सामाजिक जाणीव, सामाजिक अंगाच्या चष्म्यातून कसे पाहता येईल ? इथेच तथाकथित विवेकवाद्यांची चूक होते. संतांच्या लिखाणाचा स्वत:ला हवा तसा अर्थ काढून समाजाचा बुद्धीभेद करणे, वैचारिक गोंधळ घालणे असे विवेकवाद्यांकडून केले जाते. सोयीस्कर अभंग निवडून ‘स्वत: किती संत विचारांचा पुरस्कर्ता आहे’, हे दाखवले जाते; मात्र अनुभूतीचा भाग येतो, तेव्हा मात्र यांची पाचावर धारण बसते. त्यामुळे ‘संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले’ अशी भाविकांची श्रद्धा असतांना  ‘त्यांचा खून झाला’, असा अपसमज पसरवण्यात येतो. संतांनी केलेले चमत्कार खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला जातो. अंनिसने तर कायदाच करून घेतल्यामुळे खरेतर संतांचे साहित्य प्रसिद्ध करण्यास मर्यादा येऊ शकते.

या पार्श्‍वभूमीवर ‘आपले मन’ या वृत्तपत्राचे संपादक डॉ. जगन्नाथ पाटील यांनी पुढाकार घेऊन स्वत:चे म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला, तर त्यांचे म्हणणे समजून घेण्याची तसदी तरी आयोजकांनी घेतली पाहिजे होती. उलट त्यांना गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणून पोलिसांच्या कह्यात देण्यात आले. संबंधित संपादकाने या विषयाची कागदपत्रेही समवेत आणल्याचे समजते. त्यामुळे ती काय आहेत, हेसुद्धा पडताळता आली असती.

बुवाबाजीचा विषय आला म्हणून येथे सांगावेसे वाटते की, ख्रिस्ती पाद्य्रांकडून जगभरात सहस्रो मुलांचे आणि नन्सचे लैंगिक शोषण झाले आहे. त्यांनी या प्रकरणी क्षमा मागितली आहे. अजूनही प्रकरणे बाहेर येत आहेत. भारतातही ख्रिस्ती धर्मगुरूंकडून ननवरील बलात्काराची आणि शोषणाची प्रकरणे उघडकीस येत आहेत. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ख्रिस्ती धर्मगुरु आहेत, तर हा विषय घेऊन प्रबोधन करावेसे त्यांना का वाटले नाही ? ‘मऊ लागले म्हणून कोपराने खणले’, असे झाले का ? संतांच्या साहित्याविषयीच्या परिसंवादात कोणा अधिकारी संतांना बोलावले का नाही ? सर्वसामान्य साहित्यिक या विषयावर मत कसे मांडू शकणार ? या प्रश्‍नांची उत्तरे आयोजकांनी देणे अपेक्षित आहे. संतांची शिकवण समजण्यासाठी संतांनी केलेली साधना करायला हवी. ‘ती केल्यावर बुवाबाजीच काय, समाजातील अनेक प्रश्‍न सुटतील’, हे आयोजकांनी लक्षात घ्यावे !