गीताज्ञानदर्शन

सनातनचे ज्ञानयोगी संत पू. अनंत बाळाजी आठवले ह्यांच्या ‘गीताज्ञानदर्शन’ ह्या सनातनच्या ग्रंथसंपदेतील ग्रंथातील मजकूर क्रमश: प्रसिद्ध करत आहोत.

अनंत आठवले

॥ श्रीकृष्णाय नम: ॥

भगवद्गीतेतील काही अमूल्य रत्ने

रत्न ४ : तपश्‍चर्या

‘तप’ म्हटले की, मुख्यत: शरीराला त्रास देऊन केलेल्या घोर तपश्‍चर्यांच्या जुन्या कथा आठवतात. कोणी निराहारी राहून, कोणी केवळ पाणी पिऊन राहून, कोणी एक हात वर करून, कोणी एका पायावर उभे राहून, कोणी पंचाग्नीसाधन करून, कठोर तप केल्याचे आठवते. अशा तपांनी वरदान मिळाल्याचे किंवा काही ऐहिक लाभ झाल्याचेही आपण कथांमध्ये वाचतो, पण कोणालाही मोक्ष मिळाल्याचा उल्लेख नसतो.

भगवान् श्रीकृष्णांना असे तप मान्य नाही. ते म्हणतात, ‘घोर तपाने शरीरात असणार्‍या पंचमहाभूतांना (शरीररूपाने असणार्‍या पंचमहाभूतांना) कृश करणे आणि जीवात्मारूपाने शरीरात असलेल्या त्यांनाच (श्रीकृष्णांनाच, ईश्‍वरालाच) क्लेश देणे, हे अज्ञान्यांचे आसुरी विचार आहेत’ (अध्याय १७, श्‍लोक ६).

तपाला श्रीकृष्णांनी योग्यच मानले आहे. त्यांनी सांगितले आहे की, तप बुद्धीवान् मनुष्यांना पावन करते (चित्तशुद्धी करते) (अध्याय १८, श्‍लोक ५); पण त्यासाठी श्रीकृष्णांनी पुढीलप्रमाणे तीन वेगळ्या प्रकारची तपे सांगितली आहेत.

१.   शारीरिक तप : देवता, ब्राह्मण (ब्रह्मज्ञ), गुरु (वयाने मोठे, तसेच अध्यापक) आणि ज्ञानी लोक, यांचा आदर करणे; शुद्धता (बाह्य आणि आंतरिक); ब्रह्मचर्य; अहिंसा पाळणे (अध्याय १७, श्‍लोक १४).

२.   वाचिक तप : दुसर्‍यांना उद्वेेग न होईल असे, खरे, रुचणारे आणि हितकारक बोलणे; शास्त्रांचा अभ्यास (अध्याय १७, श्‍लोक १५).

मन प्रसन्न ठेवणे, शांत असणे, मौन, मनाचा संयम, अंत:करणाची शुद्धी (मनात वाईट विचार न येऊ देणे) (अध्याय १७, श्‍लोक १६).

श्रीकृष्ण पुन्हा सांगतात, ‘अशा प्रकारचे तप कसल्याही लाभाची इच्छा न ठेवता केले, तर ते ‘सात्त्विक’ तप; लोकांनी आपल्याला मान द्यावा म्हणून केवळ दाखवण्यासाठी केले, तर ते ‘राजसी’ तप आणि हट्टाने स्वत: ला त्रास करून घेऊन किंवा दुसर्‍यांचे अहित करण्यासाठी केले, तर ते ‘तामसी’ तप असते.’ (अध्याय १७, श्‍लोक १७, १८, १९).

बारकाईने पाहिल्यास लक्षात येईल की श्रीकृष्णांनी सांगितलेल्या तपांमध्ये वेगळी काही कर्मे सांगितलेलीच नाहीत. केवळ आचरण शुद्ध आणि सात्त्विक ठेवण्यास सांगितले आहे.

श्रीकृष्णांनी सांगितलेल्या कायिक, वाचिक आणि मानसिक तपश्‍चर्येची वैशिष्ट्ये

१.   स्वत: तप करणार्‍याला आणि दुसर्‍यांना त्रास नाही.

२.   स्वत:च्या मनाची शांती आणि प्रसन्नता. संपर्कात येणार्‍यांनाही असा लाभ मिळू शकतो.

३.   चित्तशुद्धी होते. स्वभावदोषनिर्मूलन, षड्रिपुनिर्मूलन होते.

४.   मोक्षप्राप्ती सुगम होते.

(क्रमश:)

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

संदर्भ : सनातनचे प्रकाशन ‘गीताज्ञानदर्शन’