प्रत्येक जिल्ह्यातून ‘महिला सुरक्षिततेचा विश्‍वविक्रम’ व्हावा !

बीड जिल्ह्यामध्ये ‘स्त्री जन्माचे स्वागत करा’, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या राष्ट्रीय उपक्रमाच्या अंतर्गत जिल्हा रुग्णालय प्रशासन आणि जिल्हा आरोग्य विभाग यांच्या पुढाकाराने नुकताच सामूहिकरित्या ८३६ मुलींचा नामकरण सोहळा पार पाडला. यामुळे ‘स्त्री जन्माचे स्वागत करणारा जिल्हा’ म्हणून बीडची आता आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख झाली आहे. या विश्‍वविक्रमाची नोंद ‘गोल्डन बूक’ आणि ‘वंडर बूक ऑफ रेकॉर्ड’ यांमध्ये झाली आहे. बीड जिल्ह्यात १ सहस्र मुलांमागे ८१० मुली होत्या, तसेच बीड जिल्हा स्त्री भ्रूण हत्येच्या प्रकरणी प्रकाशझोतातही आला होता; मात्र आरोग्य यंत्रणेने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या उपक्रमाची कार्यवाही केल्यामुळे वर्ष २०१८-२०१९ मध्ये मुलींचा जन्मदर १ सहस्र मुलांमागे ९६१ वर पोचला आहे.

यातून एक भाग अधोरेखित होतो, तो म्हणजे एखाद्या जिल्ह्याने एखादी कृती करायची ठरवली, तर ती होऊ शकते. समाजाचे प्रबोधन करून मुलींचा जन्मदर वाढवणे, ही गोष्ट तितकी सोपीही नाही; परंतु ‘केल्याने होत आहे, आधी केलेचि पाहिजे’, या उक्तीप्रमाणे बीड जिल्ह्याने प्रयत्न करून मुलींचा जन्मदर वाढवला. मुलींची संख्या अल्प झाल्यास त्यामुळे निर्माण होणार्‍या समस्या अजून गंभीर आहेत. एका बाजूला ‘मुलींचा जन्मदर अल्प होणे’, ही समस्या, तर दुसर्‍या बाजूला ‘असलेल्या मुली सुरक्षित नाहीत’, ही समस्या आहे. दोन्ही समस्या चिंताजनकच आहेत. भारतामध्ये केवळ युवतीच असुरक्षित आहेत, असे नसून  अल्पवयीन मुली, महिला आणि वयोवृद्ध महिलाही असुरक्षित आहेत, ही गोष्ट अतिशय दुर्दैवी आहे.

बीड जिल्ह्याने राष्ट्रीय उपक्रमाच्या अंतर्गत मुलींचा जन्मदर वाढवला. त्याचप्रमाणे ‘बेटी बचाओ’ या उपक्रमाच्या अंतर्गत ‘बेटी सुरक्षित’ राहण्यासाठीचा उपक्रम प्रत्येक जिल्ह्याने राबवायला हवा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतामध्ये रामराज्यात मध्यरात्रीही महिला अंगावर भरपूर सोन्याचे दागिने घालून एकटी फिरू शकत होती. भारताची महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने असणारी ही ओळख पुन्हा निर्माण करण्याची आवश्यकता आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रशासन, पोलीस यंत्रणा, न्याययंत्रणा आणि जनता या सर्वांनी एकत्रितपणे ‘सुरक्षित महिला’ हा उपक्रम राबवणे आवश्यक आहे.  यासाठी प्रत्येकाने आपल्या घरापासून मुलांवर संस्कार करायला हवेत. गावात कोठेही मुलींची छेडछाड झाल्यास त्यांच्यावर कठोर शिक्षापद्धत अवलंबायला हवी, जेणेकरून पुन्हा मुलींची छेड काढण्याचे अश्‍लाघ्य वर्तन केले जाणार नाही. प्रत्येक जिल्ह्याने आपल्या जिल्ह्याची ‘सुरक्षित महिला’ म्हणून ओळख होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. महिला सुरक्षिततेचा विश्‍वविक्रम करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याने प्रयत्न केल्यास देशात महिला सुरक्षित राहू शकतील !’

– वैद्या (कु.) माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल.