५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला यवतमाळ येथील चि. लोकेश अरविंद आवारी (वय १ वर्ष) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. लोकेश आवारी हा एक बालसाधक आहे !

१. गर्भधारणा होण्यापूर्वी

१ अ. आरती करतांना सूक्ष्मातून परात्पर गुरुदेवांनी ‘तुला श्रीकृष्ण नको का ?’, असे विचारल्यावर होकार देणे आणि त्यानंतर मुलगी गरोदर असल्याचे समजणे : ‘एकदा मी आरती करत होते. तेव्हा सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले मला म्हणाले, ‘तुला काय हवे ?’ त्यावर मी म्हणाले, ‘मला आनंद हवा.’ गुरुदेवांनी मला विचारले, ‘तुला श्रीकृष्ण नको का ?’ त्या वेळी ‘मला श्रीकृष्ण हवा आहे’, असे मी म्हणाले. त्यानंतर तिसर्‍या दिवशी ‘सौ. सारिकाला दिवस राहिले आहेत’, असा निरोप मला मिळाला.’ – सौ. मंदा पारखी (चि. लोकेशची आजी)

१ आ. एका आधुनिक वैद्यांनी दिवस गेले नसल्याचे सांगणे आणि दुसर्‍या आधुनिक वैद्यांकडे तपासणी केल्यावर दिवस गेल्याचे निश्‍चित झाल्यावर मनोमन कृतज्ञता व्यक्त होणे : ‘आरंभी एका आधुनिक वैद्यांनी ‘मला दिवस गेले नाहीत’, असे सांगितले. तेव्हा दुसर्‍या आधुनिक वैद्यांकडे तपासणी केल्यावर मला दिवस गेल्याचे निश्‍चित झाले. त्या वेळी ‘आपल्यावर ईश्‍वराची कृपा झाली आहे’, असे वाटून माझ्याकडून मनोमन कृतज्ञता व्यक्त झाली.

२. गर्भधारणेनंतर

२ अ. धार्मिक ग्रंथांचे वाचन करणे : मला पहिल्या मासापासून ९ व्या मासापर्यंत कुठलाही त्रास झाला नाही. मी सनातनचा ‘माझे बाळ’ हा ग्रंथ, तसेच श्रीमद्भगवद्गीता, ग्रामगीता आणि नवनाथ ग्रंथसार या ग्रंथांचे वाचन मनोभावे करत होते.

२ आ. भजने गातांना उच्चार चुकीचा केला, तर बाळाची हालचाल बंद होणे आणि उच्चार योग्य झाल्यावर पुन्हा हालचाल चालू होणे : बाळ पोटात असतांना मला भजने ऐकण्याची आणि गाण्याची आवड निर्माण झाली होती. मी भजने गातांना उच्चार चुकीचा केला, तर बाळाची हालचाल बंद व्हायची आणि उच्चार योग्य झाल्यावर पुन्हा हालचाल चालू व्हायची.

२ इ. पाचव्या मासात ‘पाणी पितांना मी तुळशीच्या मंजिरीचे पाणी पित आहे’, असे मला वाटायचे.

३. जन्माच्या वेळी

प्रसूतीच्या वेळी मला त्रास होऊ लागला; म्हणून शस्त्रकर्म करायचे ठरले. त्या वेळी सतत प्रार्थना, नामजप आणि श्रीकृष्णाचा धावा चालू होता. जेव्हा बाळाच्या रडण्याचा आवाज आला, तेव्हा आधुनिक वैद्य मला म्हणाले, ‘‘तू एका गोंडस बाळाला जन्म दिला आहेस.’’ तेव्हा श्रीकृष्णाच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.

४. जन्म ते २ मास

४ अ. सहनशील : जन्मानंतर बाळाला ‘इंजेक्शन’ देतांना ते थोडे रडले; परंतु नंतर त्याला एका दिवसात तीन ‘इंजेक्शन्स’ दिली, तरी ते रडले नाही.

४ आ. जन्मानंतर तिसर्‍या दिवशी त्याने ‘आई’ म्हटले आणि मी आश्‍चर्यचकित झाले.

४ इ. तो झोपेतून हसत-हसत उठतो. अनेकदा तो श्रीकृष्णाप्रमाणे दिसतो.

४ ई. अनेकदा झोपेत किंवा जागेपणी त्याच्या हातांच्या बोटांच्या मुद्रा होतात.

४ उ. भजने लावल्यावर शांत झोपणे : तो झोपतांना रडत असेल, तेव्हा भजने, भक्तीगीते किंवा हनुमानचालिसा लावल्यावर तो शांत झोपतो.

५. वय ४ मास ते १ वर्ष

५ अ. लोकेश साडेचार मासांचा असतांना त्याचा नामकरण विधी करून कान टोचले. त्या वेळी तो शांत होता.

५ आ. दात येतांना त्रास न होणे : त्याला ५ व्या मासात दात आले, तरी ईश्‍वराच्या कृपेने त्याला कुठलाही त्रास झाला नाही.

५ इ. रडत असतांना श्रीरामाचा नामजप किंवा ‘जय श्रीराम’ असे म्हटल्यावर हसू लागणे : प्रथम त्याला ‘ॐ त्र्यंबकं यजामहे.. ’ हा मंत्रजप लावल्यावर आनंद व्हायचा; परंतु आता त्याला ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ नामजप म्हटल्यावर आनंद होतो. तो रडायला लागल्यावर श्रीरामाचा नामजप किंवा ‘जय श्रीराम’ असे म्हटल्यावर तो आनंदाने हसायला लागतो.

५ ई. दूरचित्रवाहिनीवरील ‘श्रीकृष्ण’ या मालिकेत श्रीकृष्णाला बासरी वाजवतांना पाहिल्यावर तो आनंदी होतो.

५ उ. लोकेश १ वर्षाचा झाला, तरी तो ईश्‍वरी कृपेने कधीही आजारी पडला नाही. त्याला एक-दोनदा सर्दी झाली; पण त्याचा त्रास झाला नाही.

५ ऊ. लोकेशला डमरू, टाळ, बासरी, भक्तीगीते, भजने, श्रीरामाचा जप ऐकायला आणि गायीसमवेत खेळायला आवडते.

६. स्वभावदोष

मोठ्याने ओरडणे आणि हट्टीपणा’

– सौ. सारिका अरविंद आवारी (चि. लोकेशची आई), यवतमाळ (डिसेंबर २०१९)

‘मी चि. लोकेशविषयीच्या वरील सूत्रांचे टंकलेखन करत होतो. तेव्हा ‘माझा उत्साह वाढला आहे’, असे मला जाणवले.’

– श्री. लहू खामणकर, यवतमाळ (डिसेंबर २०१९)