दिब्रिटो यांचा देखावा !

संपादकीय

धाराशिव येथे ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चालू आहे. बराच विरोध होऊनही फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्याच अध्यक्षतेखाली हे संमेलन होत आहे. अपेक्षेप्रमाणे आणि गत काही वर्षांच्या प्रथेप्रमाणे यंदाच्याही अध्यक्षीय भाषणात अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता, देशविरोधी साम्यवादी विद्यार्थ्यांचे उदात्तीकरण, असहिष्णुता आदी सूत्रांवर जोर देण्यात आला आहे. गत काही वर्षांत या शब्दांना मोठे प्रसिद्धीवलय लाभत असल्यामुळे विशेषतः ‘बुद्धीजीवी वर्गात स्वतः किती पुढारलेलो आहोत’, हे दर्शवण्यासाठी धर्मनिरपेक्षतेचा कैवार घेतला जातो. धर्मनिरपेक्षतेवरून हिंदूंना, राष्ट्रीय एकात्मतेच्या सूत्रावरून राष्ट्रप्रेमींना चार शब्द सुनावले की, फार मोठी कामगिरी केल्याचा आव आणता येतो. ख्रिस्ती धर्मप्रचारक असलेले दिब्रिटो यांनी हिंदूंना उपदेश देण्याचे अनायसे मिळालेले हे व्यासपीठ सोडलेले नाही. संत तुकाराम महाराज यांना ‘लाडके तुकोबा’ म्हणून संबोधणारे आणि ‘माझी भूमिका धर्मप्रचाराची वाटत असेल, तर माझा नाईलाज आहे’, अशी दुहेरी भूमिका एकाच वेळी घेणारे दिब्रिटो यांना हे लक्षात येऊ शकत नाही की, संत तुकाराम महाराज यांनी त्यांच्या कित्येक ओव्यांमधून दांभिकतेवरच प्रहार केला आहे.

केवळ फुकाचे बोल !

‘आजच्या घडीला आपल्या देशाचे खरे शत्रू दुसरा धर्म, दुसरी जात, दुसरा देश नाही, तर बेरोजगारी, बेकारी, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, अतीवृष्टी, अनावृष्टी आणि दुष्काळ, ग्रामीण-शहरी भाग यांच्यातील वाढलेली दरी, धर्मांधता अन् त्यामुळे होणारे उत्पात, हे आहेत’, असे दिब्रिटो म्हणतात. देशासमोरील समस्या खर्‍या आहेत; मात्र स्वतः दिब्रिटो यांनी त्यासाठी काय केले आहे ? दिब्रिटो यांची ग्रंथसंपदा अभ्यासली, तर ‘संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची’, ‘सुबोध बायबल’, ‘परिवर्तनासाठी धर्म’ आदी त्यांच्या ग्रंथांची नावे आहेत. जर आपल्या देशाचा खरा शत्रू दुसरा धर्म नाही, धर्मांधता नाही, तर दिब्रिटो यांनी याच विषयांवर ग्रंथलेखन का केले आहे ? बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, हिंदूंचे ख्रिस्तीकरण करणार्‍या ख्रिस्ती पाद्य्रांची धर्मांधता या विषयांवर काही लिहावे किंवा किमान भाषणांतून तरी व्यक्त व्हावे, असे दिब्रिटो यांना का वाटले नाही ?

कायद्याने चालणार्‍या राज्यात हिंसाचार निंदनीयच आहे; मात्र ‘विद्यार्थ्यांना एकटे गाठून मारहाण करण्यात आली. हे आम्ही सहन करणार नाही’, असे म्हणणारे दिब्रिटो ‘‘भारत तेरे तुकडे होंगे’ अशा प्रकारच्या घोषणा पुन्हा ऐकून घेणार नाही’, असे का म्हणत नाहीत ? संत तुकाराम महाराज यांनी ‘नाठाळाचे माथी हाणू काठी ।’, असे म्हटले होते. दिब्रिटो देशविरोधी घोषणा देणार्‍यांवर शाब्दिक प्रहार न करता त्यांचाच कैवार घेतात. भारतापासून ‘आझादी’ मागणार्‍या फुटीरतावाद्यांच्या घोषणा ऐकून दिब्रिटो यांना स्वप्नपूर्तीचा आनंद मिळत असतो का ? ‘राजकारण्यांनी द्वेष पसरवू नये’, असे सांगणारे दिब्रिटो हा भारतद्वेष पाठीशी का घालतात ? स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी काँग्रेसवाल्यांनी जी विद्वेषी पुस्तिका प्रसारित केली, तो द्वेष दिब्रिटो यांना चालतो का ? दिब्रिटो गोरक्षण करणार्‍यांना उपदेश देतांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वक्तव्याचा संदर्भ देतांना दिसतात; मात्र त्याच वेळी अशा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर हीन पुस्तिका वितरण करणार्‍या काँग्रेसला खडसावता आले असते. ते दिब्रिटो सोयीस्कर विसरले आहेत का ?

‘आपला प्रवास विशालतेकडून संकुचिततेकडे होत आहे’, असे जेव्हा दिब्रिटो सांगतात, तेव्हा ते एक गोष्ट विसरतात की, खरे भारतीय खर्‍या अर्थाने संकुचित झाले असते, तर आज दिब्रिटो मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवू शकले असते का? आतापर्यंत अल्पसंख्यांकांच्या दबावाखाली वावरणार्‍या हिंदूंनी स्वतःच्या धार्मिक प्रथांविषयी जागृत होणे, राष्ट्रप्रेमींनी देशविरोधी कृत्यांच्या विरोधात स्वतःची भूमिका घेणे, हे वावगे आहे का ? जोपर्यंत मुसलमान आणि ख्रिस्ती यांना त्यांच्या कारवाया करू देण्यासाठी या देशात मोकळे रान सोडले होते, तोपर्यंत विशालता होती अन् आता यासंदर्भात जागृती निर्माण होत आहे, तर संकुचितता ! हे प्रमाणपत्र देणारे दिब्रिटो कोण आहेत ? हिंसा-अहिंसा त्यांनी आम्हाला काय शिकवावी ? हिंदूंचे बळाने धर्मांतर करण्यासाठी ख्रिस्त्यांनी केलेले छळ-कपट, क्रौर्य जगाला ठाऊक नाही का ? दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्यांचा संदर्भ देऊन दिब्रिटो यांनी पुरोगामित्वाचा आव आणू नये. ‘दिब्रिटो यांचे हात ख्रिस्ती मूलतत्त्ववादाच्या मातीनेच माखलेले आहेत’, हे सर्व जाणून आहेत.

साहित्य उपेक्षितच !

स्वतःला साहित्याच्या मंदिरातील सेवक म्हणवून घेतांना दिब्रिटो यांनी त्यांच्या ५६ पानी भाषणात मराठी साहित्याचे उत्थान होण्यासाठी ते कोणते प्रयत्न करणार, संमेलनाच्या वर्षभरातील कार्याची दिशा काय असणार, याचा नामोल्लेखही केला नाही, हे मराठी सारस्वतांचे दुर्दैव आहे. दिब्रिटो यांच्या भाषणाला मिळालेला ‘टीआरपी ’ मोठा आहे; मात्र त्यांचे विचार आणि आचार यांत सुसंगती दिसून येत नाही. अशी टाळीची सूत्रे मांडून प्रसिद्धी मिळवता येते, सहानुभूती मिळवता येते; मात्र असा सहानुभूतीचा महापूर तितक्याच गतीने ओसरून जातो. वर्षभर मिरवण्यासाठी उपाधी मिळते. ‘वर्षभर तुम्ही मराठीच्या उत्थानासाठी काय काम केले’, असे कोणी विचारणार नाही, तोपर्यंत संमेलन नावाचा वार्षिक ‘इव्हेंट’ साजरा होत राहील. कोणाकोणाला प्रसिद्धी मिळत राहील. मराठी साहित्य मात्र वंचित अन् उपेक्षितच राहील.