युक्रेनचे प्रवासी विमान आम्ही चुकून पाडले ! – इराण

तेहरान (इराण) – युक्रेन एअरलाइन्सचे प्रवासी विमान आम्ही क्षेपणास्त्राद्वारे केलेल्या आक्रमणात पडले. त्यामुळे विमानातील १७६ जणांचा मृत्यू झाला, अशी स्वीकृती इराणचे राष्ट्रपती हसन रूहानी यांनी ‘ट्वीट’ करत दिली.

त्यांनी पुढे म्हटले आहे की, इराणच्या सैन्याकडून ही अक्षम्य मानवी चूक झाली असून त्यासाठी आम्ही क्षमाप्रार्थी आहोत. या आक्रमणातील उत्तरदायींवर खटला चालवून कारवाई करण्यात येईल. इराणचे परराष्ट्रमंत्री जवाद झरीफ यांनी या प्रकरणी शोक व्यक्त करत क्षमा मागितली आहे.

इराणने इराकमधील अमेरिकेच्या सैन्यतळांवर ७ जानेवारीला २२ क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण केले होते. त्यानंतर अवघ्या काही घंट्यांतच युक्रेनचे बोईंग ७३७ प्रवासी विमान दुर्घटनाग्रस्त झाले होते. मृतांमध्ये इराणी आणि कॅनेडियन नागरिकांचा समावेश होता. यामुळे युक्रेनचे विमान पाडण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही ‘इराणनेच युक्रेनचे विमान पाडले आहे’, असा दावा केला होता. याशिवाय कॅनडा आणि ब्रिटन यांनीही इराणच्या क्षेपणास्त्र आक्रमणामुळेच युक्रेनचे विमान कोसळल्याची माहिती गुप्तचरांच्या माध्यमातून मिळल्याचे म्हटले होते. इराणमधील विमान दुर्घटनेच्या चौकशीसाठी युक्रेननेही संयुक्त राष्ट्रांकडे साहाय्य मागितले होते. या सर्व घटनांनंतर इराणने विमान पाडल्याचे मान्य केले आहे.

युक्रेनच्या राष्ट्रपतींनी इराणकडे मागितली हानीभरपाई !

युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर जेलेंस्की यांनी म्हटले आहे की, इराणने या प्रकरणाची चौकशी करावी, तसेच आम्हाला हानीभरपाईही द्यावी.