हिंदुविरोधी ‘हिंदी चित्रपटसृष्टी’ !

संपादकीय

जे.एन्.यू.’ प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर ‘आज तक’ वाहिनीवरील मुलाखतीत अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनी म्हटले, ‘‘मला भीती वाटते आणि दुःखही होते. आपल्या देशाची जी मूलभूत तत्त्वे आहेत, त्यात हे बसत नाही. मला राग येत आहे की, कारवाईही केली जात नाही.’’ ज्या वेळी साम्यवादी विचारसरणीचा देशद्रोह उघड होतो त्या वेळी ‘संपूर्ण देशात हिंदुत्वनिष्ठ विचारसरणीमुळे अराजक पसरत आहे’, अशा आशयाच्या प्रतिक्रिया चित्रपटसृष्टीतील तथाकथित निधर्मी मंडळी मधे मधे व्यक्त करत असतात. त्याप्रमाणेच ही एक आहे. या प्रतिक्रियेवरून चित्रपटसृष्टीतील मंडळींनी २ वर्षांपूर्वी पेटवलेल्या ‘असहिष्णु’तेच्या वादळाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आमिर खान यांच्या पत्नीला भीतीमुळे भारत सोडून जावेसे वाटत होते; परंतु प्रत्यक्षात त्या दोघांनी तसे काही केले नाही; उलट ‘महाराष्ट्रातील दुष्काळी भागात पाण्यासाठी किती साहाय्य करत आहोत’, हे दाखवण्यात ते यशस्वी झाले. ‘चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी पदुकोण यांनी जे.एन्.यू.मधील घायाळ विद्यार्थ्यांची भेट घ्यायला जावे’, हा निवळ योगायोग म्हणून कसे चालेल ? ‘कोणी कोणाला पाठिंबा द्यावा’, याचे स्वातंत्र्य सर्वांना आहेच; परंतु जेव्हा राष्ट्राचा प्रश्‍न येतो, तेव्हा मात्र तो विषय वैयक्तिक न राहता सामाजिक होतो. जे.एन्.यू.मध्ये जाऊन ‘टुकडे टुकडे’ टोळीच्या सदस्यांची भाषणे ऐकणार्‍या पदुकोण यांचे पाकिस्तान सैन्याचे प्रवक्ते आसिफ गफूर यांनी सामाजिक प्रसारमाध्यमातून केलेले कौतुक हे सर्वांत अधिक घातक नव्हे का ? ‘भारतीय चित्रपटसृष्टीचे अर्थकारण दाऊद इब्राहिम पाहतो’, असे नेहमीच सांगितले जाते. तो सध्या पाकमध्ये वास्तव्य करतो. गफूर यांच्या कृतीचे या दृष्टीकोनातूनही मोजमापन करणे आवश्यक आहे.

कलाकार सत्यताही पडताळत नाहीत !

पदुकोण या ‘प्रसिद्धीसाठी विद्यार्थ्यांना भेटायला गेल्या नाहीत’, असे जरी गृहीत धरले, तरी ‘आपण कोणाच्या बाजूने उभे राहत आहोत ?’, ‘कोणाला वैचारिक पाठिंबा देत आहोत’, याची सत्यासत्यता तरी त्यांनी पडताळून घेणे अपेक्षित होते. ‘जे.एन्.यू.मध्ये मारहाण करणारे तोंडावळे झाकलेले विद्यार्थी हे अभाविपचे होते’, असे ठामपणे गृहीत धरूनच मुंबईत मोर्चा काढण्यात आला. ‘त्याप्रमाणे हिंदुत्वनिष्ठ विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांनीच जे.एन्.यू.तील विद्यार्थ्यांवर हे आक्रमण केले आहे’, असे ठामपणे गृहीत धरूनच चित्रपटसृष्टीतील कलाकारांकडून विविध वक्तव्ये वदवून घेतली जात आहेत. हे अधिक अनाकलनीय आहे. प्रत्यक्षात ‘अभाविपचे विद्यार्थी हे तोंड लपवलेल्या साम्यवादी विद्यार्थ्यांनी केलेल्या आक्रमणात घायाळ झाले’ असे एका विद्यार्थ्याने प्रसिद्धीमाध्यमांना सांगितले आहे. त्यात जे.एन्.यू. विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आयशी घोष याही दिसत आहेत. हे वृत्त ना प्रसारमाध्यमांनी दाखवले ना ‘जे.एन्.यू.’प्रकरणी विरोध करणार्‍या वलयांकित अभिनेत्यांनी समजून घेतले. ‘कलाकार आणि लेखक यांची मुस्कटदाबी केली जात आहे. पत्रकार गप्प आहेत’ असे विधान नसिरुद्दीन शहा यांनी एका इंग्रजी वाहिनीवर मागच्या आठवड्यात केले. ‘चोराच्या उलट्या बोंबा’ यालाच तर म्हणतात; परंतु प्रसारमाध्यमांनी यावर काही भाष्य केले नाही. अभिनेत्री पायल रोहतगी यांनी मोतीलाल नेहरू यांच्याविषयीच्या लिखित पुस्तकावरून कथित आक्षेपार्ह ‘व्हिडिओ’ बनवला म्हणून काँग्रेसचे सरकार असणार्‍या राजस्थान राज्यात ८ दिवस त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले. या गोष्टीला प्रसारमाध्यमांनी विशेष प्रसिद्धी दिली नाही. येथे त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आक्रमण झाले नव्हते का ?

हिंदी चित्रपटांतील हिंदुद्वेष !

हिंदी चित्रपटसृष्टीचा इतिहासच हिंदुविरोधाकडे झुकणारा आहे, हे मागील ६ दशकांत लक्षात न आलेले ‘सत्य’ गेल्या ४-५ वर्षांत प्रकर्षाने पुढे आले आहे. अनेक हिंदी चित्रपटांतील हिंदूंच्या देवता, हिंदु धर्म, पुजारी, ऐतिहासिक व्यक्ती यांचा अवमान करणारे प्रसंग सामाजिक प्रसारमाध्यमांतून वारंवार पुढे येत आहेत. जावेद अख्तर आणि सलीम खान या लेखकांनी लिहिलेल्या प्रसिद्ध ‘शोले’ चित्रपटात ‘गावातील इमामाचा मुलगा मेल्यावर गावातील ठाकूर यांना दोषी ठरवले जाते; परंतु ठाकूर यांचे पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊनही कोणाला दुःख होत नाही.’ ‘अशा प्रकारे कळत नकळत मुसलमानांविषयी कळवळा आणि हिंदूंविषयी द्वेष प्रेक्षकांच्या मनावर कसा बिंबवला गेला आहे’, हे या छोट्या प्रसंगाच्या उदाहरणातून लक्षात येते. गेल्या काही वर्षांत ‘हिंदु साधू म्हणजे ‘ढोंगी बाबा आणि स्त्रीलंपट’ असे चित्रपटांतून सर्रासपणे पुढे आले; उलट इमाम किंवा फादर यांचे उदात्तीकरण करण्यात आले. ख्रिस्ती हा प्रेमाचा धर्म असल्याचे वारंवार दाखवण्यात आले; तर हिंदूंच्या देवता आणि श्रद्धास्थाने हा थट्टेचा विषय बनला. आमिर खान यांच्या ‘पिके’ चित्रपटाने तर हिंदूंच्या श्रद्धास्थानांची विटंबना करण्याचा कहर केला. हिंदी चित्रपटांतून ‘लव्ह जिहाद’चे उदात्तीकरण केले गेले. ज्या हिंदु प्रेक्षकांनी हिंदी चित्रपटातील ‘खाना’वळींना’ मोठे केले; तेच महाभाग हिंदु धर्म आणि राष्ट्र यांवर आघात करत आहेत, हे हिंदूंना आता लक्षात यायला लागले आहे. त्यामुळेच ‘दबंग ३’ चित्रपटातील साधूंचा अवमान थांबवण्यात हिंदुत्वनिष्ठांना यश आले. वलयांकित व्यक्तींचा जनमानसावर प्रभाव पडत असल्याने त्यांची कृती आणि उक्ती योग्य असणे अपेक्षित असते. कलाकार ती काळजी घेत नसतील, तर वरील उदाहरणातून बोध घेऊन हिंदूंनी वैध मार्गाने त्यांना योग्य कृती करण्यास भाग पाडले पाहिजे !