संमेलन कि सोपस्कार ?

संपादकीय

जेव्हा करण्यासारखे पुष्कळ असते, तेवढी क्षमताही असते; मात्र प्रत्यक्षात भरीव असे काहीच केले जात नाही, उलट पुष्कळ काही केल्याचा आव आणला जातो, तेव्हा विषयाचा गाभा उपेक्षित राहतो. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची गेल्या काही वर्षांमध्ये अशी अवस्था झाल्याचे चित्र आहे, जे अर्थातच दुर्दैवी आहे. आजपासून धाराशिव येथे ९३ वे संमेलन होत आहे. सर्व निष्ठा येशूचरणी अर्पित केलेले फ्रान्सिस दिब्रिटो संमेलनाध्यक्षांच्या आसंदीमध्ये बसत असल्याचे चित्र पाहण्याची वेळ सारस्वतांवर ओढवली आहे. याच फ्रान्सिस दिब्रिटो यांनी त्यांची लेखणी मराठीतून झिजवली, ती मराठीच्या पर्यायाने भारतीय संस्कृतीच्या उत्थानासाठी नाही, तर भारतीय संस्कृतीच्या अधःपतनासाठी ! त्यांची अखिल भारतीय स्तरावरच्या संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून निवड होणे निषेधार्ह होते; पण या निवडीच्या विरोधात उठवलेल्या आवाजाची म्हणावीशी नोंद घेतली गेली नाही. ‘या शुभ्र वस्त्रा वृता’ असे म्हणून विद्येची देवता असणार्‍या सरस्वतीदेवीची आराधना केली जाते. आज मात्र शुभ्र वस्त्र म्हणजे ख्रिस्ती धर्मोपदेशकांचा झगा असे समीकरण भविष्यात जुळेल, याची कोणी कल्पनाही केली नसावी.

विशेष म्हणजे दिब्रिटो यांच्यासह वसई परिसरातील ३५ चर्चमधून १२५ पाद्री संमेलनाला उपस्थित राहणार असून त्यांच्या निवासाची आणि प्रार्थनेची सोय एका विद्यालयात करण्यात आली आहे. वास्तविक या जथ्याला संमेलनाच्या स्वागताध्यक्षांनी पायघड्या घालणे अपेक्षित नाही. याचे कारण गेल्या काही वर्षांमध्ये संमेलनाच्या भरकटलेल्या दिशेमध्ये आहे. प्रतिवर्षी मोठा गाजावाजा करून संमेलन भरवले जाते; पण त्या तुलनेत संमेलनाच्या माध्यमातून होणारे कार्य नगण्यच असते. वर्षानुवर्षे संमेलने भरवूनही मराठी भाषेसमोरची आव्हाने आज जशीच्या तशीच असून उलट त्यात भरच पडत आहे. प्रत्येक वर्षीच्या संमेलनामध्ये मागील वर्षभरामध्ये मराठीच्या संवर्धनाच्या दृष्टीने केलेल्या कार्याचा वस्तुनिष्ठ लेखाजोखा मांडला, तर संमेलनाची फलनिष्पत्ती लक्षात येऊ शकते; पण फलनिष्पत्तीविषयीच्या चिंतनाची संमेलनामध्ये वजावटच केल्याचे दिसून येते. साहित्य संमेलन भाषाविषयक भरीव कार्याविषयी लक्षात राहण्याऐवजी संमेलनाच्या अनुषंगाने होणार्‍या वादांमुळे लक्षात राहत आहे. वास्तविक साहित्य संमेलन एक मोठे आणि वलयांकित व्यासपीठ आहे; मात्र गेल्या काही वर्षांमध्ये या संमेलनाचा दर्जा खालावून त्याला एक सोपस्काराचे रूप आले आहे. म्हणून तर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलेले, प्रतिभावान कवी आणि लेखक असलेले महान क्रांतीकारक स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी काँग्रेसकडून गलिच्छ राजकारण केले गेले, तेव्हा त्याविषयी निषेधाचा सूर उमटवण्याची चर्चाही या संमेलनाच्या धुरिणांमध्ये दिसून आली नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर राजकीयदृष्ट्या एक महान नेते होतेच; पण त्याही पलीकडे एक उच्चकोटीचे लेखक, प्रतिभावान कवी होते. त्यांच्या कविता आणि त्यांची प्रेरक वाक्ये आजही वाचकांच्या मनात देशभक्तीचे तरंग निर्माण करतात. अशा व्यक्तीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात असतांना साहित्यिक या नात्याने तरी काँग्रेसींच्या वर्तनाचा संमेलनामध्ये धिक्कार होणे आवश्यक आहे.

मराठीच्या अस्तित्वाचा प्रश्‍न

इंग्लिश भाषेचे आक्रमण, मराठी शाळांना लागलेली गळती, क्षीण होत चाललेला भाषाभिमान आणि मराठीविषयी वाढत असलेला न्यूनगंड अशी कितीतरी आव्हाने आज मराठीसमोर आहेत. साहित्य संमेलनाच्या व्यासपिठावरून या संकटांचा सामना करण्यासाठी रणनीती ठरवणे, उपाययोजना काढणे, त्या राबवतांना येणार्‍या अडचणींवर मार्ग काढणे, त्या दृष्टीने चिंतन होणे अपेक्षित आहे; मात्र कागदोपत्री ठराव करण्याच्या पलीकडे संमेलनात ठोस काही घडतांना दिसत नाही. संमेलनामध्ये अनेकदा सीमाप्रश्‍नी ठराव संमत झाले आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक या राज्यांमधील सीमाप्रश्‍न न्यायालयात प्रलंबित असल्याने संमेलनाच्या माध्यमातून त्याचे निराकरण होईल, असे नाही; पण या संदर्भात प्रभावी जनमत तर नक्कीच निर्माण केले जाऊ शकते; मात्र दुर्दैवाने या ठरावाला तितके वजन प्राप्त झालेले नाही. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याविषयी प्रतिवर्षी संमेलनामध्ये परिसंवाद आणि विविध व्याख्यानांमधून या मागणीचा पुनरुच्चार केला जातो. तसा तो केलाही जावा; पण मराठीविषयी मानाचा दर्जा मराठीजनांच्या मनात निर्माण करण्याच्या प्रयत्नांविषयीचे काय ? भविष्यात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळेलही; पण त्यामुळे भाषेचा होत असलेला र्‍हास थांबणार आहे का ? साहित्य संमेलनाकडून खरी अपेक्षा आहे ती ही ! आज मराठीच्या संवर्धनाचा नाही, तर अस्तित्वाचाच प्रश्‍न निर्माण झाला आहे. भाषाशुद्धीकरण, प्रमाण भाषेचा आग्रह, दर्जेदार साहित्यनिर्मिती हे महत्त्वाचे विषय आहेतच; पण तो पुढचा टप्पा झाला. आज एकीकडे दक्षिणेकडील राज्यांमध्ये टोकाचा प्रादेशिक भाषावाद पाहायला मिळतो, तर महाराष्ट्रामध्ये भाषासंवर्धनाविषयी कमालीची अनास्था दिसून येते. याचा सुवर्णमध्य गाठण्याची आवश्यकता आहे. याचे दायित्व मराठी साहित्य परिषद, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि तत्सम संस्थांकडे अधिक आहे; म्हणूनच या व्यासपिठाने ‘इव्हेंट’गिरी मधून बाहेर पडून जनमानसांत जाऊन काम करणे आवश्यक आहे.

मराठीसाठी प्रयत्न आवश्यक !

आज घटत्या वाचकसंख्येचाही ज्वलंत प्रश्‍न भाषेपुढे आहे. यामुळे अनेक प्रकाशकही चिंतित आहेत. मराठीची आवड निर्माण झाली, तर त्या भाषेतील साहित्य वाचले जाईल. ही गोडी निर्माण करण्याचे दायित्व सामूहिक आहे. मराठीरक्षणासाठी भव्य दिव्यच करायला पाहिजे असे नाही, तर दूरभाषवर बोलतांना, एकमेकांना अभिवादन करतांना ‘हॅलो’ऐवजी ‘नमस्कार’ म्हणणे, स्वाक्षरी मराठीतून करणे, शक्य त्या सर्व ठिकाणी मराठी भाषेचा उपयोग करणे, असे छोटे छोटे उपायही भाषेला उर्जितावस्था देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. मराठीविषयी तरुणांमध्ये असलेली न्यूनगंडाची भावना दूर करण्यासाठी घराघरांमधूनच प्रयत्न झाले, तर संमेलनाच्या उद्देशपूर्तीला साहाय्य होईल. साहित्य संमेलनाला ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. या संमेलनाने पूर्वीही मूलभूत कार्यही केले आहे. आजही हे व्यासपीठ मराठीचा र्‍हास रोखण्यासाठी मोलाची भूमिका बजावू शकते; मात्र त्यासाठी तत्त्व आणि दृष्टीकोन यांमध्ये जे दोष निर्माण झाले आहेत, ते दूर करायला हवेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुवर्ण महोत्सवाच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्या दृष्टीने मराठीजनांनाही ‘सोनियाचा दिनु’ पाहायला मिळावा आणि मराठीचा अमृतवेल गगनाला भिडावा, ही अपेक्षा !